महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा नवा विक्रम: देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर, शरद पवार यांना टाकले मागे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 15 h ago
देवेंद्र फडणवीस ठरले महाराष्ट्राचे तिसरे दीर्घकाळ सेवा देणारे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस ठरले महाराष्ट्राचे तिसरे दीर्घकाळ सेवा देणारे मुख्यमंत्री

 

मुंबई

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे अध्यक्ष शरद पवार यांना मागे टाकत फडणवीस हे आता राज्याचे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. विधिमंडळाच्या नोंदीनुसार, १२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी तीन कार्यकाळांत एकूण २,४३० दिवस मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. शरद पवार यांनी चार कार्यकाळांत एकूण २,४१२ दिवस हे पद सांभाळले होते.

नाईक आणि देशमुख आघाडीवर

राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान वसंतराव नाईक यांच्याकडे असून, त्यांनी ४,०९६ दिवस (११ वर्षे ७८ दिवस) राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यानंतर विलासराव देशमुख हे २,६८६ दिवस (सुमारे ७ वर्षे १२९ दिवस) मुख्यमंत्री पदावर होते. फडणवीस आता या यादीत तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

फडणवीस आणि पवार यांचा प्रवास

देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी तीन दिवसांसाठी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, परंतु बहुमताअभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ५ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारली आणि १२ जुलैपर्यंत त्यांनी या कार्यकाळातील ५८५ दिवस पूर्ण केले आहेत. शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवले असले, तरी त्यांना कधीही पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ लाभला नव्हता.

संजय राऊत यांची टीका

दरम्यान, या विक्रमावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी वसंतराव नाईक यांच्या हरित क्रांतीचा आणि शरद पवार यांच्या औद्योगिक विकासाचा संदर्भ देत, फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी नेमके काय केले, असा प्रश्न उपस्थित केला. 'लाडकी बहीण' योजना ही केवळ मते मिळवण्यासाठी आणल्याचा आरोपही त्यांनी केला.