जम्मू
जम्मू-काश्मीरमधील सरकारी ग्रंथालयांना आणि शाळांना फुटीरतावादी नेत्यांचे उदात्तीकरण करणारी पुस्तके पुरवल्याप्रकरणी जम्मू न्यायालयाने तीन प्रकाशकांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रातील वादग्रस्त मजकुराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
जम्मूमधील 'काउंटर इंटेलिजन्स युनिट'ने रविवारी ही अटक केली. ओबेरॉय बुक सर्व्हिसचे इंद्रपाल आणि नोएडास्थित डोमिनंट पब्लिशर्सचे अमरदीप सिंग व गिरीश अरोरा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 'पर्सनॅलिटीज अँड लेजेंड्स ऑफ जे-के' आणि 'ग्रेट पर्सनॅलिटीज ऑफ जम्मू अँड काश्मीर' या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने हा तपास सुरू करण्यात आला आहे.
शासकीय कारवाई आणि गुन्हा
वादग्रस्त पुस्तकांमध्ये 'अत्यंत अयोग्य मजकूर' असल्याचे लक्षात आल्यानंतर नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शिक्षण विभागातील आठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका कंत्राटी कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
जम्मूमधील काउंटर इंटेलिजन्स युनिटने ४ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या (UAPA) विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला होता. यामध्ये देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणे, शत्रुत्व भडकावणे आणि चुकीच्या माहितीचा प्रसार करणे अशा गंभीर कलमांचा समावेश आहे. याआधीच संबंधित प्रकाशकांना काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात आले असून, ६ जुलै रोजी त्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या.