सफिना हुसैन : २० लाखांहून अधिक मुलींना शिक्षणाचे बळ देणारी एज्युकेटेड गर्ल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
सफिना हुसैन
सफिना हुसैन

 

राजस्थानमधील एका दुर्गम खेड्यात एक लहान मुलगी वर्गाच्या बाहेर उभी होती. वर्गातील इतर मुलांना शिकताना ती डोळे भरून पाहत होती. तिलाही शिकायचे होते, पण गरिबी, सामाजिक रूढी-परंपरा आणि परिस्थिती यांमुळे तिला शाळा सोडावी लागली होती. भारतातील कोट्यवधी मुलींसाठी ही केवळ एक गोष्ट नाही, तर ते त्यांचे वास्तव होते. अशा वेळी एक महिला पुढे आली. कोणत्याही मुलीला स्वप्न पाहण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ नये, असा ठाम निश्चय त्यांनी केला.

त्या महिला म्हणजेच सफिना हुसैन! त्या एक शिक्षिका, सामाजिक उद्योजक आणि समाजसुधारक आहेत. त्यांच्या या मोहिमेने आज लाखो मुलींचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. 'एज्युकेट गर्ल्स' या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी भारतातील सर्वात मोठी तळागाळातील चळवळ उभी केली आहे. जेव्हा एक मुलगी शाळेच्या वर्गात प्रवेश करते, तेव्हा संपूर्ण समाज बदलण्यास सुरुवात होते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
 

साफिना यांचा हा प्रवास अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील आहे. बालपणीच्या आर्थिक अडचणी आणि स्वतःच्या शिक्षणात आलेले खंड याबद्दल त्यांनी अनेकदा उघडपणे सांगितले आहे. या परिस्थितीचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. आपल्या कुटुंबात परदेशात जाऊन शिकणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.
 
सॅन फ्रान्सिस्कोमधील सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. देशातील शिक्षण व्यवस्थेने ज्या मुलींना वाऱ्यावर सोडले होते, त्यांच्यासाठी काम करण्यासाठी त्या भारतात परतल्या.

वर्ष २००७ मध्ये त्यांनी 'एज्युकेट गर्ल्स' या संस्थेची स्थापना केली. भारतातील अत्यंत मागासलेल्या आणि वंचित भागातील शाळाबाह्य मुलींचा शोध घेणे आणि त्यांना शाळेत दाखल करणे, हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. राजस्थानमधून सुरू झालेल्या या छोट्याशा उपक्रमाचे पुढे एका राष्ट्रीय चळवळीत रूपांतर झाले. यामागील विचार अगदी साधा पण अत्यंत प्रभावी होता. प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे यासाठी कुटुंब, शाळा, समुदाय आणि स्थानिक स्वयंसेवकांना एकत्र घेऊन काम करणे आवश्यक होते.
 

मुलींच्या शिक्षणातील सर्वात मोठे अडथळे हे केवळ आर्थिक नसून सामाजिक आहेत, या विश्वासावर या उपक्रमाचा पाया रचला गेला आहे. अनेक गावांमध्ये मुलींनी घरातील कामे करावीत, धाकट्या भावंडांची काळजी घ्यावी किंवा लवकर लग्न करावे, अशीच अपेक्षा असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, हे सपिना यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांच्या संस्थेने थेट पालकांशी आणि गावातील नेत्यांशी संवाद साधला. मुलींना शिकवण्याचे महत्त्व समजून घेण्यास त्यांना मदत केली.

'एज्युकेट गर्ल्स'चे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लोकचळवळीवर आधारित मॉडेल आहे. 'टीम बालिका' म्हणून ओळखले जाणारे हजारो स्थानिक स्वयंसेवक दारोदारी फिरतात. ते शाळा सोडलेल्या किंवा कधीही शाळेत न गेलेल्या मुलींचा शोध घेतात. हे स्वयंसेवक आपापल्या समाजात मुलींच्या हक्कांचे रक्षक, मार्गदर्शक आणि आदर्श बनतात. स्थानिक पातळीवर या मोहिमेची जबाबदारी सोपवून सपिना यांनी एक अशी चळवळ उभी केली, जी कोणत्याही एका संस्थेच्या मर्यादेपलीकडे जाऊन काम करत आहे.

या कार्याचे परिणाम अत्यंत थक्क करणारे आहेत. अवघ्या ५० प्रायोगिक शाळांमधून सुरू झालेले 'एज्युकेट गर्ल्स'चे कार्य आज भारतातील ३० हजारांहून अधिक दुर्गम गावांमध्ये पोहोचले आहे. संस्थेने आतापर्यंत २० लाखांहून अधिक मुलींना पुन्हा शाळेत आणण्यात यश मिळवले आहे. तसेच २४ लाखांहून अधिक मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला मदत केली आहे.
 
 
शाळेतील मुलींचे टिकून राहण्याचे प्रमाणही अत्यंत कौतुकास्पद आहे. योग्य पाठबळ मिळाल्यास मुली शाळेत टिकून राहतात आणि प्रगती करतात, हे यावरून स्पष्ट होते. परंतु, हे आकडे या संघर्षाची संपूर्ण कहाणी सांगू शकत नाहीत.

प्रत्येक आकड्याच्या मागे एका मुलीचे बदललेले सुंदर भविष्य दडलेले आहे. कधीकाळी बालविवाहाच्या उंबरठ्यावर उभी असलेली मुलगी आज शिक्षिका बनण्याचे स्वप्न पाहत आहे. कुटुंबातील पहिलीच शिकणारी मुलगी आपल्या लहान भावंडांना शाळेत जाण्याची प्रेरणा देत आहे.
 
एक तरुण मुलगी स्वतःचा आत्मविश्वास, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आयुष्यातील निर्णयांचे स्वातंत्र्य मिळवत आहे. सपिना हुसैन यांना समाजात नेमका हाच बदल घडवून आणायचा होता. केवळ साक्षर मुली तयार करणे नव्हे, तर समाज बदलण्याची ताकद असलेले सक्षम नागरिक घडवणे हे त्यांचे ध्येय होते.

त्यांच्या या कार्याने समाजातील लिंगभेदाच्या जुन्या कल्पनांना मोडीत काढले आहे. अनेक समुदायांमध्ये पूर्वी मुलींचे शिक्षण निरुपयोगी मानले जात होते. सततचा संवाद आणि यशस्वी मुलींच्या यशोगाथा यांमुळे लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत झाली. मुलींच्या शिक्षणात केलेली गुंतवणूक ही कुटुंब, समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करते, हे या उपक्रमाने दाखवून दिले. समुदाय, सरकार आणि नागरी संस्था एकत्र येऊन कसा मोठा सामाजिक बदल घडवू शकतात, याचे हे उत्तम मॉडेल ठरले आहे.

या कार्याची दखल आता जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे. वर्ष २०२६ मध्ये सपिना हुसैन यांचा समावेश 'टाइम' मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत करण्यात आला आहे. जगातील सर्वात कठीण आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांच्या या यादीत त्यांना स्थान मिळाले. लाखो मुलींना शिक्षणाची दारे खुली करून देणारे त्यांचे नेतृत्व आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची त्यांची जिद्द यांचे 'टाइम'ने विशेष कौतुक केले आहे.

याहून अधिक ऐतिहासिक क्षण तेव्हा आला, जेव्हा 'एज्युकेट गर्ल्स' ही संस्था आशियातील सर्वोच्च नागरी सन्मान मानल्या जाणाऱ्या 'रेमन मॅगसेसे पुरस्कारा'ची मानकरी ठरली. हा बहुमान मिळवणारी ती भारतातील पहिलीच सामाजिक संस्था ठरली आहे. मुलींना निरक्षरतेच्या शापातून मुक्त करणे, सांस्कृतिक अडथळ्यांना आव्हान देणे आणि तरुण मुलींना स्वतःचे भविष्य घडवण्याचा आत्मविश्वास देणे या कार्यासाठी या संस्थेचा गौरव करण्यात आला.

अनेक मोठे पुरस्कार मिळूनही सफिना यांचे लक्ष अजूनही अपूर्ण राहिलेल्या कार्यावरच केंद्रित आहे. जगात अजूनही लाखो मुली शाळेबाहेर आहेत, याची आठवण त्या नेहमी करून देतात. केवळ मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करणे हे त्यांचे ध्येय नाही, तर या कामाची व्याप्ती वाढवून पुढील दशकात १० दशलक्ष म्हणजेच १ कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे.

सफिना हुसैन यांची कहाणी केवळ पुरस्कार किंवा वैयक्तिक यशापुरती मर्यादित नाही. ही कहाणी आहे चिकाटीची आणि जिद्दीची! प्रत्येक मुलगी महत्त्वाची आहे, या विश्वासावर ही कहाणी आधारलेली आहे. प्रगतीच्या वाटा रोखणाऱ्या जुन्या परंपरांना नाकारून नवीन संधींची दारे खुली करण्याची ही धडपड आहे.

ज्या मुलींचे आयुष्य शिक्षणामुळे बदलले आहे, त्यांच्यासाठी साफिना हुसैन या केवळ एक समाजसेविका नाहीत. एखादी दृढनिश्चयी व्यक्ती ठरवली तर नशिबाची रेषा कशी बदलू शकते, याचा त्या जिवंत पुरावा आहेत.

त्यांनी जगाला दिलेला सर्वात मोठा धडा हाच आहे: जेव्हा तुम्ही एका मुलीला शिक्षित करता, तेव्हा तुम्ही केवळ एक आयुष्य बदलत नाही, तर तुम्ही येणाऱ्या अनेक पिढ्या बदलून टाकता.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter