जागतिक बॉक्सिंग रँकिंगमध्ये भारताचा डंका; जैस्मिन लँबोरिया ठरली जगातील नंबर वन बॉक्सर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
 जैस्मिन लँबोरिया
जैस्मिन लँबोरिया

 

जागतिक बॉक्सिंग मंचावर भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर देशाचे नाव उंचावले आहे. ताज्या जागतिक बॉक्सिंग रँकिंगमध्ये (World Boxing Rankings) विद्यमान विश्वविजेती जैस्मिन लँबोरिया हिने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात जगातील अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, आशियाई चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक विजेती प्रिया घंघास (६० किलो) आणि विश्वनाथ सुरेश (५० किलो) यांनी आपापल्या वजनी गटात पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. या रँकिंगनुसार, महिलांच्या १० पैकी ९ वजनी गटात आणि पुरुषांच्या १० पैकी ८ वजनी गटात भारतीय बॉक्सर्सनी अव्वल १० मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

महिला विभागात मीनाक्षीने ४८ किलो वजनी गटात आपले जगातील पहिल्या क्रमांकाचे (World No. 1) स्थान कायम राखले आहे, तर प्रीती पवारने ५४ किलो वजनी गटात थेट पाच स्थानांची झेप घेत तिसरे स्थान गाठले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या जैस्मिनने एका स्थानाची प्रगती करत आपल्या वजनी गटात अव्वल मानांकन मिळवले आहे. याशिवाय, वर्ल्ड कप पदक विजेती अरुंधती चौधरी (७० किलो), पूजा राणी (८० किलो) आणि नुपूर (+८० किलो) या तिघीही आपापल्या वजनी गटात जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन वेळची विश्वविजेती निकहत जरीन (५१ किलो) हिची एका स्थानाने घसरण झाली असून ती चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन (७५ किलो) सातव्या स्थानावर कायम आहे.

पुरुषांच्या क्रमवारीतही भारतीयांची मोठी झेप
पुरुषांच्या वजनी गटात सचिन सिवाच (६० किलो) आणि आशियाई खेळांमधील पदक विजेता नरेंद्र बेरवाल (९०+ किलो) यांनी पहिल्या ५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ल्ड कप सुवर्णपदक विजेता हितेश गुलिया (७० किलो) एका स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर आला आहे, तर अविनाश जामवाल (६५ किलो) आठव्या क्रमांकावर आहे. आकाश (७५ किलो) आणि लोकेश (८५ किलो) यांनीही अव्वल १० मध्ये प्रवेश केला असून दोघेही आठव्या क्रमांकावर आहेत.

जागतिक स्तरावर अव्वल १० मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंच्या संख्येचा विचार केला तर भारत सध्या जगात तिसऱ्या स्थानावर आहे. विशेषतः महिला बॉक्सिंगमध्ये भारताने स्वतःला एक मोठी ताकद म्हणून प्रस्थापित केले असून भारतीय महिला संघ जगात दुसऱ्या स्थानावर आहे, तर पुरुष संघ चौथ्या स्थानावर आहे.

अव्वल १० खेळाडूंव्यतिरिक्त भारताचे इतरही अनेक बॉक्सर्स रँकिंगमध्ये चांगल्या स्थानावर आहेत. महिलांमध्ये परवीन (६० किलो) १३ व्या तर अंकुशिटा बोरो (६५ किलो) ११ व्या स्थानावर आहे. पुरुषांमध्ये अंकुश (८० किलो) ११ व्या, दीपक (७० किलो) १२ व्या आणि जुगनू (८५ किलो) १४ व्या क्रमांकावर आहे. हर्ष चौधरी (९० किलो) १० व्या स्थानावर असून सुमित (७५ किलो) आणि कुमार नवीन (९० किलो) हे दोघे जगात १८ व्या स्थानावर आहेत.