लंडन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याविषयी सुरू असलेल्या चर्चा आणि टीकेवर भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १३८ धावांची शानदार खेळी केल्यानंतर रोहितने स्पष्ट केले की, जोपर्यंत तो क्रिकेट खेळत आहे, तोपर्यंत बाहेरील चर्चा आणि आवाज सुरूच राहणार आहेत, मात्र त्याकडे लक्ष न देता त्याचे संपूर्ण लक्ष संघासाठी धावा करण्यावर आहे.
बीसीसीआय डॉट टीव्हीशी बोलताना ३९ वर्षीय रोहित शर्मा म्हणाला, "माझ्या पदार्पणापासूनच हा कोलाहलाचा आवाज सुरू आहे. जोपर्यंत मी इथे खेळत राहीन, तोपर्यंत तो सुरूच राहील, त्यामुळे त्याचा फारसा फरक पडत नाही. खऱ्या अर्थाने काय महत्त्वाचे आहे, ते म्हणजे मी मैदानात काय करतो आणि संघाच्या विजयात कसा हातभार लावतो."
लॉर्ड्सवरील या शतकासह रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात वयाने मोठा शतकवीर बनला आहे. एवढेच नव्हे तर तो १२ हजार एकदिवसीय धावांच्या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराट कोहलीसोबतच्या शतकीय भागीदारीबद्दल बोलताना त्याने सांगितले की, दोघांनी संपूर्ण कारकीर्द एकत्र खेळली आहे, त्यामुळे मैदानावरील ताळमेळ नेहमीच उत्तम राहिला आहे. मालिकेतील पराभवाबद्दल बोलताना त्याने तरुण गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना वेळ देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.