छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुस्लिम वकिलाची पाचवी पिढी आज काय करतेय?

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
काझी हैदर यांचे ते १३ वे वंशज सोहेल शेख
काझी हैदर यांचे ते १३ वे वंशज सोहेल शेख

 

पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले सोहेल शमसुद्दीन शेख हे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत भूमिका बजावणाऱ्या काझी हैदर यांचे ते १३ वे वंशज. सोहेल शेख यांच्या कुटुंबाने शिवकाळापासून सुरू झालेली ही देशसेवेची परंपरा गेल्या १४ पिढ्यांपासून अखंडपणे जपली आहे.

अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान राजे होते. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात आणि प्रशासनात अनेक निष्ठावान मुस्लिम सरदार होते. काझी हैदर हे त्यापैकीच एक होते. काझी हैदर हे महाराजांचे पारसनीस आणि अत्यंत विश्वासू वकील असल्याचे पुरावे सोहेल शेख यांनी आवाज-द-व्हॉइसच्या मुलाखतीत सादर केले. 

सोहेल शेख यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक संदर्भांनुसार, महाराजांनी स्वतःच्या महजरमध्ये (कायदेशीर दस्तऐवज) त्यांचा उल्लेख 'इज्जत महाब काझी हैदर पारसनीस' असा केला आहे. पुरंदरचा तह असो वा साल्हेरचे प्रकरण, वकील म्हणून महाराजांनी काझी हैदर यांच्यावरच मोठी जबाबदारी सोपवली होती. ते सुफी कादरी पंथाचे असल्याने काही ठिकाणी त्यांचा उल्लेख 'काझी हैदर अली कादरी' असाही आढळतो.

काही इतिहासकारांच्या दाव्यानुसार, महाराजांच्या निधनानंतर काझी हैदर औरंगजेबाला जाऊन मिळाले. मात्र, सोहेल शेख यांनी सादर पुराव्यांच्या आधारे हा दावा खोडून काढला आहे. सोहेल शेख यांच्याकडे उपलब्ध असलेल्या फारसी कागदपत्रांनुसार, काझी हैदर यांचे निधन महाराजांच्या निधनानंतर अवघ्या एक ते दोन वर्षांनी पर्वती (पुणे) येथील त्यांच्या निवासस्थानी झाले होते. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांचे बंधू काझी इस्माईल यांनी २९ मोहरम १०९३ (८ फेब्रुवारी १६८२) रोजी एका पत्राद्वारे कळवली होती. या पत्रात स्पष्ट नमूद आहे की, काझी हैदर यांचा दफनविधी पर्वती येथेच पार पडला होता. 

सोहेल शेख यांनी आवाज-द-व्हॉइसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “काझी हैदर हे महाराजांचे अत्यंत एकनिष्ठ सेवक होते. औरंगजेबाच्या दरबारात ते गेल्याचे जे दस्तऐवज सांगितले जातात, त्यात अनेक भाषिक चुका आहेत. उलट, ते स्वराज्यासाठीच अखेरपर्यंत लढले, याचे अस्सल पुरावे माझ्याकडे आहेत.”

छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा असलेला दुखवटा

काझी हैदर यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सोहेल शेख यांच्या कुटुंबाला १२ फेब्रुवारी १६८२ रोजी एक पत्र पाठवले होते. या पत्रावर संभाजी महाराजांची १६ बुरुजांची आणि पिंपळाच्या पानाच्या आकाराची राजमुद्रा आहे. मात्र हे पत्र स्वतः छत्रपती संभाजी महाराजांच्या अक्षरात लिहिलेले आहे की नाही, याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सोहेल सांगतात. 

सोहेल शेख यांनी स्वतःजवळ असलेल्या त्या फारसी भाषेतील पत्राचे वाचन करून घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पत्रामध्ये असे नमूद केलेले आहे की, "काझी हैदर हे आमच्या वडिलांचे (छत्रपती शिवाजी महाराजांचे) वफादार आणि एकनिष्ठ सेवक होते. त्यांनी मला फारसी भाषा शिकवली, त्या आठवणीचा मला आजही उजाळा आहे." 

संभाजी महाराजांना १६ भाषांचे ज्ञान होते, त्यातील फारसी भाषेचे प्राथमिक शिक्षण त्यांना काझी हैदर यांच्याकडून मिळाले असल्याचे पत्रात नमूद आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण स्वराज्य काझी हैदर यांच्या कुटुंबासोबत असल्याचे आश्वासन संभाजी महाराजांनी दिले होते, असे सोहेल सांगतात. 

प्रशासनातील पिढ्यान् पिढ्यांचे योगदान

काझी हैदर यांच्या निधनानंतरही हे कुटुंब मराठा साम्राज्यात सक्रिय राहिले. त्यांना इब्राहिम, इस्माईल, अब्दुल वहाब, अब्दुल्ला आणि महमूद असे पाच भाऊ होते. हे सर्वजण न्यायदानाच्या कामात कार्यरत होते. पुण्याच्या देशपांडे आणि कुलकर्णी दप्तरांमध्ये आजही काझी इस्माईल आणि काझी इब्राहिम यांची नावे आढळतात. 

काझी हैदर यांचे चिरंजीव काझी मुजीब साहेब आणि नातू काझी हबीबुल्ला हे देखील पेशवे दप्तरातील नोंदीनुसार शासकीय सेवेत होते. १७०७ पर्यंत रायगड किल्ल्यावर या कुटुंबाची नोंद आढळते, जी या कुटुंबाची मराठा साम्राज्याप्रती असलेली निष्ठा दर्शवते.

ब्रिटीश काळापासून ५ पिढ्यांची वर्दीतील सेवा

काळाच्या ओघात या कुटुंबाने न्यायदानाच्या कामातून पोलीस दलात प्रवेश केला. कुटुंबातील पहिले पोलीस सुभेदार काझी शेख निजाम होते. त्यांनी ब्रिटिशांच्या पहिल्या ५० पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व केले. तेव्हापासून आजपर्यंत सलग ५ पिढ्या हे कुटुंब पोलीस दलात आहे.

सध्या सोहेल शेख पुणे पोलीस दलात कार्यरत असून, त्यांच्या कुटुंबातील एकूण २६ सदस्य सध्या पोलीस किंवा लष्करी सेवेत आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस तसेच आर्मीमध्ये देशाचे रक्षण करणारे जवान आहेत. ही परंपरा कुटुंबातील पुरुषांपुरती मर्यादित नाही, तर सोहेल शेख यांच्या दोन्ही कन्या देखील पोलिस दलाची स्वप्न पहात आहेत. 

सोहेल शेख यांच्याकडे असलेल्या मोडी लिपीतील दस्तऐवज आणि त्यांच्या पूर्वजांचे लष्करी गणवेशातील फोटो हा त्यांच्या कुटुंबाचा एक महान वारसा दर्शवतो. मजहर - महाराष्ट्राच्या इतिहासाचे दस्तऐवज यांसारख्या पुस्तकांमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला आहे.

सोहेल शेख अभिमानाने सांगतात की, “देश प्रथम हेच आमचे कर्म आणि धर्म सुद्धा आहे. गणवेश घातल्यानंतर आम्ही केवळ देशाचे रक्षक असतो. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन देशासाठी प्रामाणिकपणे सेवा करण्याची शिकवण आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळाली आहे आणि तीच आम्ही पुढे नेत आहोत."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter