Asian Games 2026: नेमबाजीत भारताला रौप्य आणि कांस्य; सुवर्णपदकाची प्रतीक्षा कायम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 30 m ago
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू

 

नागोया

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games) मध्ये भारताची पदकांची कमाई सुरूच असून, सोमवारी नेमबाजीच्या (Shooting) विविध प्रकारांत भारताने तीन पदके आपल्या नावावर केली. दरम्यान, मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये (MMA) भारताला पहिले ऐतिहासिक पदक मिळाले असले, तरी तांत्रिक कारणांमुळे सुवर्णपदकाची संधी हुकल्याने निराशाही पत्करावी लागली. सध्या भारताच्या खात्यात ४ रौप्य आणि २ कांस्य अशा एकूण ६ पदकांची नोंद झाली असून, अद्याप सुवर्णपदकाची प्रतीक्षा कायम आहे.

नेमबाजीत भारताची तीन पदके

नागोया येथील शूटिंग रेंजवर भारताच्या युवा नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात हिमांशू ढिल्लोंने रौप्य आणि रुद्रमक्ष पाटीलने कांस्यपदक पटकावले. या दोघांनी पार्थ मानेसह एकत्र येत संघ प्रकारातही रौप्यपदक जिंकले. या तीन पदकांसह भारताची नेमबाजीत ५ पदके झाली आहेत. मात्र, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या खेळाडूंनी जागतिक विक्रम मोडून सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तयारिओलला कांस्य

पारंपरिक महिलांच्या ६० किलो वजनी गटात मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये भारतासाठी पहिले आशियाई क्रीडा पदक जिंकून सुचिका तयारिओलने इतिहास रचला. मात्र, सकाळच्या वजन मोजणीदरम्यान सिंगापूरच्या स्पर्धकापेक्षा ७०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने आणि उपांत्य फेरीची लढत बरोबरीत सुटल्याने तांत्रिक नियमांनुसार तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर सुचिका भावूक झाली होती.

इतर खेळांमधील कामगिरी

हॉकी, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार सुरुवात केली. महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ असा दणदणीत पराभव केला. पुरुष बॅडमिंटन संघाने बांगलादेशचा ३-० ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिसच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी पाकिस्तानचा ३-० असा पराभव करत आगेकूच केली. मात्र, पोहण्याच्या (Swimming) स्पर्धेत श्रीहरी नटराजला ५० मीटर बकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत १० वे स्थान मिळवता आले.