Nashik TCS प्रकरण : स्थानिकांचा सौहार्द टिकवण्याचा निर्धार, तर मौलवी म्हणाले, 'इस्लाममध्ये अशी कृत्ये हराम आणि दंडनीय!'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

नाशिकमधील 'टीसीएस' (TCS) बीपीओ युनिटचे प्रकरण सध्या देशभरात चांगलेच गाजत आहे. या कंपनीत काम करणाऱ्या काही मुस्लिम तरुणांवर लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतरासाठी सक्ती असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेत सखोल तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेचा आधार घेऊन समाजकंटकांनी भीती आणि अविश्वासाचे वातावरण तयार करू नये यासाठी सर्वधर्मीय नाशिककर पुढे येऊन एकात्मता आणि सौहार्द टिकून राहावा यासाठी पुढाकार घेत आहेत.

समाजात संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी नाशिकमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजमल खान 'संविधानप्रेमी नाशिककर' ही चळवळ चालवतात. या सर्व प्रकरणाविषयी ते म्हणतात, "नामांकित आयटी कंपनीतल्या मुस्लिम तरुण-तरुणींवर करण्यात आलेल्या आरोपांवर चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच. मात्र हे निमित्त साधून इस्लाम धर्माविषयी आणि मुस्लिमांविषयी जाणीवपूर्वक केला जाणारा अपप्रचार चुकीचा आहे. यामुळे दोन समाजांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार होईल आणि त्यांच्यातील दरी वाढेल अशी भीती आम्हाला वाटते. यातून अंतिमत: राज्याचे आणि देशाचेच नुकसान होणार आहे."

नाशिकमध्ये समाजकार्यात अग्रस्थानी असणारे अजमल खान पुढे म्हणतात, "या निमित्ताने मी मुस्लिम तरुणांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करतो. अशा घटनांमुळे आयटीसारख्या क्षेत्रांमध्ये जाण्याच्या त्यांच्या स्वप्नांना खीळ बसते. त्यामुळे आपल्या वर्तनाने आणि आचरणाने धर्माची बदनामी होणार नाही आणि कायद्याची पायमल्ली होणार नाही, याची खबरदारी घेण्याची आजच्या काळात खूप गरज आहे."

संविधानाची मूल्ये समाजात रुजावीत म्हणून काम करणाऱ्या 'संविधानप्रेमी नाशिककर' संस्थेचे सदस्य आणि नाशिक जिल्हा न्यायालयात वकिली करणारे अ‍ॅड. वायचाळे यांनी या सर्व प्रकरणावर दिलेली प्रतिक्रियाही आश्वासक आहे. ते म्हणतात, "आपला देश संविधानावर चालतो. संविधान सर्व नागरिकांना आणि सर्व धर्मीयांना समान अधिकार देते. नाशिकमधील या घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत. पोलीस तपास सुरू आहे आणि त्यातून यातील तथ्य बाहेर येईलच. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मात्र या घटनेच्या निमित्ताने एका विशेष समाजाला लक्ष्य करण्याचे दुष्कृत्य काही स्वार्थी आणि नतद्रष्ट मंडळी करत आहेत."

नाशिकचे मुकुंद दीक्षित यांनीही अतिशय संतुलित प्रतिक्रिया दिली. "आम्ही हिंदू-मुस्लिम या शहरात गुण्यागोविंदाने राहतो. अशा व्यक्तिगत घटनांमुळे समाज म्हणून अविश्वासाचे आणि भीतीचे वातावरण तयार व्हावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. उलट यात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा आग्रह तर आम्ही धरूच. पण आम्ही सर्वधर्मीय अशा संकटाच्या काळात एकमेकांच्या सोबत राहून देशाची एकत्मता आणि शांतता भंग होणार नाही याची काळजी घेऊ," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाशिकमधील या घटनेचे निमित्त करून काही समाजकंटक इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाज याविषयी 'फोबिया' पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. 'गुलशन-ए-गरीब नवाज' मशीद आणि मदरशाचे खतीब व इमाम मौलाना मोहम्मद तौफिक अशरफी यांनी यासंबंधी इस्लामची भूमिका मांडली. ते म्हणाले, "नाशिक प्रकरणात मुस्लिम तरुणांवर लागलेले आरोप किती खरे आहेत, हे तपासाअंतीच समोर येईल. पण एक इमाम आणि कुराण-हदीसचा अभ्यासक या नात्याने मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. अशा कृत्यांबद्दल इस्लाममध्ये नेमका काय आदेश आहे, हे मी सांगू इच्छितो."

"पहिली महत्त्वाची गोष्ट, कोणाशीही अनैतिक संबंध प्रस्थापित करणे इस्लाममध्ये सक्त हराम मानले आहे. कुराण आणि हदीसमध्ये अनेक ठिकाणी याला खूप मोठा गुन्हा म्हटले आहे. इस्लाममध्ये यासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. इस्लाममध्ये महिलांच्या अब्रूशी खेळण्याला अत्यंत कडक मनाई आहे," असे मौलाना अशरफी यांनी स्पष्ट केले. 

ते पुढे सांगतात, "दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही दुसऱ्या धर्माची खिल्ली उडवणे किंवा कोणालाही जबरदस्तीने इस्लाम स्वीकारायला लावणे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. अल्लाह तालाने कुराणमध्ये अगदी स्पष्ट फर्मावले आहे, 'लकुम दीनुकुम वलियदीन' (तुमच्यासाठी तुमचा धर्म, आमच्यासाठी आमचा धर्म). आपल्याला फक्त आपल्या धर्माचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा आदेश आहे. दुसऱ्यांच्या धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यास इस्लाम अजिबात परवानगी देत नाही."

शेवटी त्यांनी एक कळकळीचे आवाहन केले. "मी माझ्या सर्व देशवासियांना एक विनंती करतो. जर एखादा मुस्लिम व्यक्ती असे अत्यंत नीच कृत्य करत असेल, तर ती इस्लामची शिकवण आहे असे अजिबात समजू नका. इस्लाम एक अत्यंत पवित्र आणि स्पष्ट धर्म आहे. तो प्रत्येक वाईट गोष्टीपासून आपल्याला रोखतो आणि केवळ चांगुलपणाचा आदेश देतो. एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यावरून संपूर्ण इस्लामबद्दल कोणताही चुकीचा दृष्टिकोन बनवू नका."

या सर्व प्रकरणात नाशिककरांनी आणि मुस्लिम धर्मगुरूंनी घेतलेली कायद्याचा सन्मान करणारी आणि त्याचवेळी समाजातील धार्मिक सौहार्द टिकून ठेवण्यासाठी 'जद्दोजहद' करणारी भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे. पोलीस तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर या घटनेतील सत्य समोर येईलच. मात्र त्यानिमित्ताने नाशिककरांची ही प्रतिक्रिया सर्वांसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.

नेमकं काय आहे नाशिकमधील 'टीसीएस' प्रकरण?

नाशिकमधील 'टीसीएस'च्या बीपीओ युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि धार्मिक सक्ती प्रकरणाचा तपास आता चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि नमाज पठणासाठी दबाव टाकल्यासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी मोहम्मद दानिश शेख याच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील सात आरोपींना अटक झाली असून निदा खानला अजून अटक झालेली नसून सत्र न्यायालयाने तिचा अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. एटीएस आणि पोलिसांकडून या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. बचाव पक्षाचे वकील बाबा सय्यद यांनी एफआयआरमध्ये सक्तीच्या धर्मांतराचा उल्लेख नसून केवळ धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी अद्याप न्यायालयात कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही.

या घटनेचे पडसाद कंपनीच्या वरिष्ठ पातळीवरही उमटले आहेत. टीसीएसने सर्व आठ आरोपींना कामावरून निलंबित केले आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र संचालकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष देखरेख समिती स्थापन केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबत पोलिसांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.

सध्या या प्रकरणाची अनेक वैधानिक संस्थांकडून समांतर चौकशीही सुरू आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र पोलीस आणि टीसीएसकडून सर्व तपशील मागवले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) सत्यशोधन समितीने नाशिकमध्ये जाऊन तक्रारदार आणि पोलिसांची प्रत्यक्ष भेटही घेतली आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter