हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या चित्राने मिळवला जागतिक बहुमान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रमोद कुर्लेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला आलेली एक अनोळखी व्यक्ती
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रमोद कुर्लेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला आलेली एक अनोळखी व्यक्ती

 

भक्ती चाळक

तर ही गोष्ट आहे २०२३ सालची. उत्तरप्रदेशात संविधानिक पदावर असलेल्या नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं होतं. हिंदूंच्या सणांमध्ये मुस्लिमांनी दुकानं लावण्याबाबत ते बोलले होते. या घटनेनं अनेकांना विचार करायला भाग पाडलं. त्याचे पडसाद थेट महाराष्ट्रात उमटले आणि तेही कॅनव्हासवर.

उत्तरप्रदेशातील त्या घटनेमुळे प्रमोद कुर्लेकर यांच्यासारख्या संवेदनशील कलाकाराच्या मनाला पार अस्वस्थ करून सोडलं. त्या विधानाला कलात्मक प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यातूनच जन्म झाला 'हिज नर्चरर' (His Nurturer) या कलाकृतीचा.  

धार्मिक सलोख्याचा सुंदर संदेश देणाऱ्या प्रमोद यांच्या चित्राला आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाला. त्यांनी रेखाटलेलं चित्र थेट न्यूयॉर्कच्या सोथबीज या जगातील नामांकित आणि सर्वात मोठ्या लिलाव संस्थेच्या प्रदर्शनात झळकणार आहे. ‘आवाज-द-व्हॉईस’शी बोलताना प्रमोद कुर्लेकर यांनी आपल्या संघर्षाची आणि या अनोख्या चित्राची रंजक कहाणी सांगितली.

प्रमोद कुर्लेकर हे सातार्‍याच्या नुने गावचे. सातारा जिल्हा पहिल्यापासूनच सलोख्याचं केंद्र राहिलाय. प्रमोद म्हणतात, “माझं अख्खं बालपण धार्मिक सौहार्दाच्या वातावरणात गेलंय. माझ्या अवतीभवती हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत आलेत. माझे कला शिक्षक आर. बी. कुलकर्णी आणि एस. एस. शेख होते. ते दोघे वेगवेगळ्या धर्माचे आहेत, हे मला लहानपणी कधी जाणवलंच नाही” 

ते पुढे म्हणतात, “आपली जात, धर्म हे सगळं जन्मानंतर या समाजाने आपल्यावर थोपवलेलं असतं. जन्माला येतो तेव्हा साधं नावही आपल्यासोबत नसतं. मग या गोष्टींसाठी माणुसकी विसरणं, हा निव्वळ मूर्खपणा आहे. हिंदू धर्मात संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे संपूर्ण जग हेच एक कुटुंब असल्याची शिकवण दिली आहे. मग हा द्वेष कशासाठी?” त्यांच्या याच भावनेतूनच ‘हिज नर्चरर’ जन्माला आलं.
चित्र रेखाटण्याची संकल्पना 
चित्राच्या संकल्पनेबद्दल प्रमोद कुर्लेकर सांगतात, “उत्तरप्रदेशच्या त्या नेत्याच्या विधानाने मला विचार करायला भाग पाडलं. त्यांचं ते विधान खूप चुकीचं वाटलं. एक कलाकार म्हणून माझ्या संवेदनशील मनाला ते पटलं  नाही. आज प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने बघतोय आणि त्याचा परिणाम देशाच्या सामाजिक आर्थिक परस्थितीवर होतोय. आपल्या सर्वांचे व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे जात-धर्म पाहून खरेदीविक्री केली तर त्याचा परिणाम समाज व्यवस्थेवर होणार.” 

ते पुढे म्हणतात, “प्रत्येक धर्मामध्ये वाईट प्रवृत्ती आहेत. त्यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई व्हायला हवी. पण आपण 'फोडा आणि राज्य करा' अशा नीतीवर चाललो तर मात्र निर्दोष व्यक्तीवर अन्याय होतो.”
 
जगभर पोहोचली गंगा-जमुनी तहजीब
‘हिज नर्चरर’ला २०२४ मध्ये पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सन्मान मिळाला. त्यानंतर २०२५मध्ये आर्ट रिन्यूअल सेंटरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ५,००० चित्रांमधून या चित्राने तृतीय क्रमांक पटकावला. आता हेच चित्र न्यूयॉर्कमधील सोथबीजच्या प्रदर्शनात जगासमोर येणार आहे.

सोथबीजने या चित्राची बेस प्राईज २५,००० ते ३५,००० डॉलर्स (अंदाजे २१ ते ३० लाख रुपये) लावली आहे. प्रमोद म्हणतात, “माझा उद्देश पुरस्कार मिळवणं नव्हता. मी व्यक्त केलेला विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, एवढंच मला वाटत होतं. माझ्या विचारांना जागतिक मंच मिळाल्याचा आनंद मला सर्वाधिक आहे.”
 

ते पुढे म्हणतात, “सोथबीजकडून मला ऑक्शनबाबत विचारणा करण्यात आली होती.  खरंतर मला ते अजूनही मनापासून विकण्याची इच्छा नाही. पण मी हे चित्र विक्रीस नसतं ठेवलं तर कदाचित त्यांनी ते प्रदर्शनात ठेवलं नसतं. कारण ऑक्शन आणि प्रदर्शन हाच त्यांचा खरा उद्देश असतो. त्यामुळे मी चित्र पाठवण्यास होकार दिला.”

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter