भक्ती चाळक
सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत पुरता दंग झाला आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष आषाढी वारी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. महाराष्ट्राची ही संत परंपरा, भक्ती आणि संस्कृतीचे सर्वात मोठे जिवंत प्रतीक मानली जाते.
दरवर्षी लाखो वारकरी कोसो दूरचा पायी प्रवास करतात. या प्रवासात वारकऱ्यांच्या डोक्यावर किंवा दिंडीत सर्वात पुढे दिसणारी एक अत्यंत पवित्र गोष्ट म्हणजे तुळशीचे वृंदावन. वारकरी संप्रदायात या तुळशीला अथांग महत्त्व आहे. वारीच्या या भक्तिमय वातावरणात बारामतीतून सलोख्याचे दृश्य पाहायला मिळतेय.
आषाढी वारी हा कोण्या एका धर्माचा नसून संपूर्ण महाराष्ट्राचा सोहळा बनला आहे. वाणेवाडी गावचे विठ्ठल शिंदे आणि त्यांच्या पत्नी शाकूबाई शिंदे हे दाम्पत्य दरवर्षी नित्यनियमाने संत सोपानकाका यांच्या पालखीसोबत वारीला जातात. यंदाही ते विठ्ठल भेटीच्या ओढीने घराला कुलूप लावून पंढरीच्या वाटेवर निघाले. घर तर बंद झाले, पण त्यांच्या अंगणात असणाऱ्या तुळशीच्या रोपाची काळजी कोण घेणार? हा मोठा प्रश्न होता.
हिंदू धर्मात तुळशीला श्रद्धा आणि पावित्र्याचे प्रतीक मानली जाते. तिची रोज पूजा करणे, तिला पाणी घालणे हे प्रत्येक वारकरी कुटुंबाचे आद्यकर्तव्य असते. विठ्ठल शिंदे यांनी वारीला जाताना कसलीही चिंता न करता आपल्या घराची चावी थेट शेजारी राहणाऱ्या शफिक मुलाणी यांच्या घरात दिली. आणि ते निर्धास्तपणे वारीला निघून गेले.
शिंदे दाम्पत्य वारीला गेल्यानंतर शफिक यांच्या पत्नी अंजुम मुलाणी यांनी त्यांच्या घराची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्यांनी केवळ घराची राखण केली नाही, तर दररोज सकाळी उठून शिंदेंच्या अंगणात जाऊन त्या पवित्र तुळशीला न विसरता पाणी घालण्यास सुरुवात केली. वारीहून हे दाम्पत्य परत येईपर्यंत तुळस हिरवीगार आणि टवटवीत राहिली पाहिजे, या भावनेने त्या ही सेवा करत आहेत.
अंजुम मुलाणी या हिंदू धर्माचा आदर करत रोज सकाळी तुळशीला पाणी घालत होत्या. ही गोष्ट त्यांचे दुसरे एक शेजारी शशिकांत जेधे यांनी पाहिली. अंजुम यांना कोणतीही कल्पना नसताना, शशिकांत यांनी आपल्या मोबाईलमध्ये हा सुंदर क्षण नकळतपणे टिपला. हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. पाहता पाहता हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.
अंजुम मुलाणी ‘आवाज-द-व्हॉईस’ला प्रतिक्रिया देताना म्हटल्या की, “आमच्या वस्तीत आम्ही सर्व गुण्यागोविंदाने रहातो. जात-पातीला आमच्या इथं थारा नाही. आमच्या शेजाऱ्यांसोबत अगदी आमचे घरगुती संबंध आहेत. कुठंही जाताना ते आम्हाला सांगून जातात, म्हणजे जाताना त्यांच्या घराची चावी सुद्धा ते आमच्याकडं ठेवतात.”
त्या पुढे म्हणतात, “यंदाही तसंच झालं. घराबाहेर जाताना त्यांनी आमच्याकडे घराची चावी दिली आणि ते निश्चिंतपणे निघून गेले. मी नेहमीप्रमाणे तुळशीला पाणी घालत असताना, आमचे दुसरे शेजारी शशिकांत भाऊंनी माझा फोटो काढला. मला त्याची कल्पना सुद्धा नव्हती. त्या भाऊंनी फोटो सोबत काहीतरी लिहून आपल्या स्टेट्सला ठेवलं तेव्हा मला ते समजलं.”
वारीला निघालेले विठ्ठल शिंदे म्हणतात, “घराला कुलूप लावून आम्ही निश्चिंतपणे वारीला निघालोय. आमच्या पश्चात आमच्या घराची आणि अंगणातल्या तुळशीची काळजी आमचे शेजारी शफिकभाई आणि त्यांच्या पत्नी अंजुम हे घेतायेत. ही मुस्लिम भगिनी रोज न चुकता आमच्या तुळशीला पाणी घालते. वारी पूर्ण होईपर्यंत या तुळशीला रोज पाणी देऊन ती टवटवीत राखण्याची जबाबदारी तिने घेतलीये. अगदी मनोभावे ती हे कार्य करते.”
ते पुढे म्हणतात, “बाहेर कितीही विखारी प्रचार सुरू असो, आमच्या वाणेवाडी गावात माणुसकीचा धर्म आजही जिवंत आहे. जात-पात कवटाळून बसण्यापेक्षा एकमेकांच्या भावना जपण्याला आम्ही प्राधान्य देतो. संत शेख महंमद म्हणतात त्याप्रमाणे 'हिंदू तुर्क दोन्ही एक', ईश्वर एकच आहे. सोवळ्यात बसून राहण्यापेक्षा असा धार्मिक आणि सामाजिक एकतेचा सोहळा साजरा करण्यातच खरा आनंद आहे.”
मुलाणी कुटुंबाची ही कौतुकास्पद कृती आणि त्यांची विचारांची प्रगल्भता अचानक आलेली नाही. यामागे एका मोठ्या नेतृत्वाचे संस्कार आहेत. अंजुम मुलाणी यांचे माहेर इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील आहे. लग्न होऊन त्या वाणेवाडीत आल्या. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मुलगा अमन हा एम.कॉम झालाय आणि तो पुण्यात नोकरी करतो. तर मुलगी सादिया ही आयटी इंजिनिअर असून ती विमाननगरच्या कंपनीत काम करते.
मुलाणी कुटुंब हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचा प्रचंड आदर करतं. अंजुम मुलाणी या मुस्लिम धर्मीय असूनही श्रद्धेपोटी नित्यनियमाने संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात. त्यांच्या दोन्ही मुलांवरही हेच संस्कार झाले आहेत. सलोख्याच्या वातावरणात वाढल्यामुळे संस्कृतींचे मिश्रण त्यांच्या कुटुंबात पाहायला मिळते.
याबाबत शफिक सांगतात, “आमचं अख्खं घर जेष्ठ नेते आनंद दादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं झालंय. ते आमच्या गावचे प्रमुख होते. सर्व धर्मीयांना ते सोबत घेऊन चालत होते. त्यांनी हीच शिकवण सर्वांना दिली. त्यांचे मार्गदर्शन आणि संस्कार आम्हाला लाभले.”
एका प्रसंगाविषयी बोलताना शफिक सांगतात, “१९९६ मध्ये आमच्या ग्रामीण भागात मुस्लिम धर्मीयांसाठी पहिली इफ्तार पार्टी आनंद दादांनी सुरू केली. ते वारल्यानंतर त्यांची मुले आजपर्यंत ती परंपरा जोपासत आहेत. दरवर्षी ते सर्व मुस्लिम धर्मीयांना २७ व्या उपवासाला इफ्तार पार्टी देतात. आमच्या इथं सगळ्या जाती धर्माचे लोकं राहतात. बाहेर जो विकारी प्रचार चालतो, तसलं काही आमच्या मनाला कधी शिवत सुद्धा नाही.”
वारीच्या अनुभवाबाबत शफिक सांगतात, “लहानपणी आम्ही सोमेश्वरला सर्वात आधी वारी पाहिली. दर श्रावणी सोमवारी करंज्याच्या सोमेश्वर मंदिराजवळ मोठी यात्रा भरते. आम्ही अजूनही तिथं आम्ही जात असतो. स्व. आनंददादा स्वतः वारी करायचे. त्यांना बघून आम्ही हे सगळं शिकलो.”
मुलाणी कुटुंबाचे सख्खे शेजारी बापूराव जेधे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “शफीक भाईंचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आम्ही गेले पन्नास-साठ वर्ष एकमेकांचे शेजारी आहोत. पण आमच्यात कधीही बंधुत्वाची भावना कमी झाली नाही. मुलाणी परिवार आणि आम्ही अतिशय छान प्रेमाने राहिलोय. या कृतीनंतर तर आता अंजुम भाभीने चार चाँद लावलेत. याला म्हणतात प्रेम व शेजारधर्म.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही सर्वजण असेच आनंदात राहू व शेजारधर्माचे पालन करू. आमचे दादा मला नेहेमी सांगतात की ज्याचा भाऊ सुखी तो माणूस सुखी व ज्याचा शेजारी सुखी तो माणूस सुखी.. आनंद दादांनी आपल्या गावामध्ये जे प्रेमाचे बीज पेरले त्याचा हा वटवृक्ष झालेला आहे.”
सासवडचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी मुबारक शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अंजुम आणि शाकुबाई यांच्या मैत्रीतून गंगा-जमुनी तहजीब दिसुन आली आणि हीच खरी आपल्या भारताची ओळख आहे. एकात्मता, अखंडता व सहिष्णुता हे आपल्या देशाचे प्रतिक आहे. या कृतीतुन सर्वधर्म समभाव ही संकल्पना आपल्या देशात किती खोलवर रूजलेली आहे हे दिसुन येतेय. महमंदभाई मिस्त्री यांची शिकवण व शफीकभाई यांनी चालविलेला वारसा अंजुम यांच्या माध्यमातुन पाहायला मिळतोय. अंजुम आणि शाकुबाई यांच्या मैत्रीस माझा सलाम.”
आजच्या या कटूतेच्या वातावरणात शफिक मुलाणी समाजाला संदेश देऊ इच्छितात, जो आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, “आमच्या कुरानने एकोप्यानेच राहायला सांगितलंय. आमच्या धर्मात भेदभावाला कोणतीच जागा नाही. आणि मला वाटत ईश्वर-अल्लाह एकच आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकोप्याने राहावं. आपल्या देशाशी प्रामाणिक राहावं. तरक्की करावी आणि निरोगी आयुष्य जगावं.”
वाणेवाडीच्या अंजुम आणि शफिक मुलाणींनी आपल्या कृतीतून समाजातील सकारात्मकतेला खतपाणी घातले आहे. वारीच्या या पावन पर्वात ही कहाणी नकारात्मकतेवर प्रहर करणारी ठरेल यात शंका नाही.