माओवादी चळवळीतील विभागीय समितीचे माजी सदस्य म्हणून महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील घनदाट जंगलात फिरणाऱ्या नागसू वड्डे यांनी हिंसेचा मार्ग सोडल्यानंतर आता आयुष्याचे एक नवे पान सुरू केले आहे. आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आल्याच्या अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांनी एका माजी महिला नक्षलवाद्याशी गोंदिया जिल्ह्यात विवाह केला आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या आणि मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे एक सुरक्षित, आदरयुक्त आणि सुखी जीवनाचे उत्तम उदाहरण असल्याचे गोंदिया पोलिसांनी सांगितले आहे.
नागसू वड्डे यांनी इतर १० सहकाऱ्यांसह नोव्हेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत गोंदिया पोलिसांसमोर आपली शस्त्रे खाली ठेवली होती. हिंसेचा त्याग केल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी ३६ वर्षीय शेवंती रायसिंग पंधारे यांच्याशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. शेवंती या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी असून त्या दरेकसा दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (ACM) म्हणून कार्यरत होत्या. सध्या पंधारे यांच्यासह आत्मसमर्पण केलेले ११ माजी नक्षलवादी कारंजा येथील स्थानिक पोलीस मुख्यालयातील पोलीस कॉलनीत राहत आहेत.
दरेकसा दलममधील सहकाऱ्यांनी मांडला संसार
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील तीर्लागढ गावचे मूळ रहिवासी असलेले नागसू वड्डे हे दरेकसा दलममध्ये 'गोलू' या नावाने सक्रिय होते. याच दलममध्ये त्यांची पत्नी शेवंती पंधारे याही कार्यरत होत्या. समाजात सन्मानाने जगणे, स्वतःचे कुटुंब सुरू करणे आणि शांततापूर्ण भविष्य घडवणे हीच या दोघांची लग्न करण्याची मुख्य प्रेरणा होती, असे गोंदिया पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
गोंदिया पोलिसांच्या मते, हा विवाह केवळ दोन व्यक्तींचे एकत्र येणे नसून हिंसेवर शांततेचा, भीतीवर विश्वासाचा आणि निराशेवर आशेचा झालेला विजय आहे. या विवाह सोहळ्याला वधू-वरांचे कुटुंबीय, नातेवाईक, स्थानिक नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुनर्वसन, सामाजिक स्वीकृती आणि नव्या आयुष्याची सुरुवात कशी होऊ शकते, याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पोलिसांच्या पुढाकाराने पार पडला सोहळा
शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्या तरुणांना समाज आणि शासन कशा प्रकारे मदत करते, हे या विवाह सोहळ्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा विशेष विवाह सोहळा गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या थेट देखरेखीखाली अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामुळे नक्षलवादी चळवळीत भरकटलेल्या इतर तरुणांनाही हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याची आणि सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळणार आहे.