Delhi Malviya Nagar Fire : स्वतःचा जीव धोक्यात घालून मुस्लिम युवकांनी वाचवले अनेक निष्पाप जीव

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
मालवीय नगरमध्ये लागलेल्या आगीतून नागरिकांचे जीव वाचवणारे मुस्लिम युवक
मालवीय नगरमध्ये लागलेल्या आगीतून नागरिकांचे जीव वाचवणारे मुस्लिम युवक

 

ओनिका माहेश्वरी

राजधानी दिल्लीतील मालवीय नगरमधील ती सकाळ कदाचित दीर्घकाळापर्यंत विसरता येणार नाही. हॉटेलच्या खिडक्यांमधून निघणारा काळा धूर, आत अडकलेल्या लोकांचा टाहो, आगीच्या भयानक लपट आणि प्रत्येक सेकंदाला वाढणारा धोका, संपूर्ण परिसर एका मोठ्या अपघाताचा साक्षीदार बनत होता. परंतु या भयानक दृश्यामध्ये काही असे लोकही होते ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मृत्यूशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा हॉटेलच्या आत अडकलेले लोक मदतीसाठी किंचाळत होते, तेव्हा सर्वात आधी धावून पोहोचणारे आसपासच्या मोहल्ल्यातील तरुण होते. रिहान, साजिद, मुबारक आणि त्यांच्यासारख्या अनेक स्थानिक मुस्लिम तरुणांनी कोणत्याही आदेशाची, कोणत्याही सरकारी मदतीची किंवा कोणत्याही सुरक्षा उपकरणांची वाट पाहिली नाही. लोक मरु शकतात हे त्यांनी पाहिले आणि ते जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले.

आग वेगाने पसरत होती. मुख्य रस्ता आगीच्या विळख्यात होता. खिडक्यांवर लोक लटकून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अशा वेळी या तरुणांनी आसपासच्या दुकानांमधून गाद्या आणि दराज्या काढून रस्त्यावर पसरवण्यास सुरुवात केली. हॉटेलच्या समोर काही मिनिटांतच गाद्यांचा एक तात्पुरता सुरक्षा थर तयार करण्यात आला. वरून उड्या मारणाऱ्या लोकांचे प्राण वाचवता यावेत हा त्यामागचा हेतू होता. अनेक लोकांनी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या आणि खाली उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना सावरण्‍याचा प्रयत्न केला.

प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, स्थानिक मुस्लिम तरुणांनी हॉटेलच्या खिडक्यांचे शीशे तोडले. त्यांनी लोकांना बाहेर पडण्याचा रस्ता दाखवला आणि सतत आवाज देऊन त्यांना धीर दिला. काही लोक जखमी झाले, अनेक लोकांचे हात-पाय तुटले, पण ते जिवंत बाहेर आले. वाचवलेल्या प्रत्येक जिवाच्या मागे त्या लोकांचे प्रयत्न होते जे स्वतः आग आणि धुरात उभे होते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वेळी आत अडकलेली व्यक्ती कोण आहे, कोणत्या धर्माची आहे किंवा कुठून आली आहे असे कोणीही विचारले नाही. लोकांनी फक्त माणूस पाहिला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांच्या सांगण्यानुसार, अनेक पीडित हिंदू कुटुंबे आणि इतर समुदायाशी संबंधित होते. परंतु बचाव कार्यात गुंतलेल्या तरुणांसाठी त्यांची ओळख फक्त एवढीच होती की ते मदतीची याचना करणारे माणूस होते.

घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, जर स्थानिक नागरिक ताबडतोब सक्रिय झाले नसते तर मृतांची संख्या खूप जास्त असू शकली असती. अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच मोहल्ल्यातील लोकांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले होते. अनेक लोकांना खिडक्यांमधून बाहेर काढण्यात आले, अनेकांना उड्या मारण्यासाठी धीर देण्यात आला आणि अनेक जखमींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले.

मालवीय नगरच्या या शोकांतिकेत आगीने अनेक कुटुंबांना मोठे दुःख दिले. त्याच वेळी स्थानिक मुस्लिम तरुणांच्या धैर्याने मानवतेचे एक असे उदाहरणही सादर केले जे दीर्घकाळापर्यंत लक्षात ठेवले जाईल. जेव्हा चहुबाजूला गोंधळाचे वातावरण होते, तेव्हा ते मदतीचा आधार बनले. जेव्हा लोक मृत्यूपासून वाचण्यासाठी पुकारत होते, तेव्हा ते आशेचा किरण बनून उभे राहिले. आणि जेव्हा परिस्थिती सर्वात कठीण होती, तेव्हा त्यांनी हे सिद्ध केले की खरी बहादुरी कोणत्याही ओळखीमध्ये नाही, तर एखाद्या अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी पुढे जाण्यात असते.

राजधानी दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अग्निकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. सकाळी सुमारे ८:४८ वाजता एका बहुमंजिली इमारतीमध्ये लागलेल्या आगीने बघता बघता रौद्ररूप धारण केले. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १५ पेक्षा जास्त परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ४० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर अनेक जखमी अजूनही रुग्णालयात जीवन आणि मृत्यूची लढाई लढत आहेत. प्राथमिक तपासानुसार आगीची सुरुवात इमारतीच्या स्वयंपाकघरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे झाली.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter