ASSAM FLOODS: ५ जणांचा मृत्यू, ३.६३ लाख नागरिकांना फटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 Months ago
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ३.६३ लाख नागरिक प्रभावित, बचावासाठी लष्कर तैनात.
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ३.६३ लाख नागरिक प्रभावित, बचावासाठी लष्कर तैनात.

 

गुवाहाटी 

मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे. १५ जिल्ह्यांमधील सुमारे ३.६३ लाख लोक पुराच्या फेऱ्यात सापडले असून, गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षभरातील पुरामुळे मृतांचा एकूण आकडा १० वर पोहोचला आहे. राज्यातील वाढत्या संकटामुळे प्रशासनाने बचावासाठी लष्कराला पाचारण केले आहे.

असम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (ASDMA) दिलेल्या माहितीनुसार, जोरहाट जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन पुरुष आणि दोन मुलींचा मृत्यू झाला, तर कार्बी आंगलोंग जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चराईदेव आणि कार्बी आंगलोंग जिल्ह्यात प्रत्येकी एक जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. बिस्वनाथ, कछार, चराईदेव, चिरांग, धेमाजी, डिब्रूगड, गोळाघाट, जोरहाट, कामरूप, कार्बी आंगलोंग, नागाव, शिवसागर, तीनसुकिया आणि उदलगुरी हे १५ जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. शिवसागर जिल्ह्यात सर्वाधिक १.५८ लाख लोक बाधित झाले आहेत.

परिस्थितੀ गंभीर बनल्याने उच्च आसाममध्ये लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आले असून, ते राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव आणि मदतकार्य राबवत आहेत. चराईदेव, गोळाघाट, जोरहाट, कार्बी आंगलोंग आणि नागाव येथून सुमारे ७ हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी चार कॅबिनेट मंत्र्याना मैदानात उतरवले असून, सर्व विभाग हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.

पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, उत्तर पूर्व सीमा रेल्वेने (NFR) काही विभागांमधील रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित केली आहे. तसेच, चराईदेव जिल्ह्यातील चहा मळे पाण्याखाली गेल्याने हजारो कामगारांना कारखाने आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. ब्रह्मपुत्रा नदीसह तिच्या अनेक उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. राज्यातील ७९४ गावे पाण्याखाली गेली असून, १९ हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ जिल्ह्यांत १०१ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.