माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांचे सामाजिक सलोख्यासाठी आवाहन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग
दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग

 

दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी मस्जिदींविषयी असलेले गैरसमज आणि भीती दूर करण्याचे आवाहन केले आहे. मस्जिदी हे मंदिर किंवा चर्चसारखेच एक प्रार्थनास्थळ आहे, त्यामुळे तिथे जाण्यास कोणालाही संकोच वाटू नये, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, जर शुक्रवारच्या नमाजमुळे (जुम्मा नमाज) इतर नागरिकांना त्रास किंवा अडचण होत असेल, तर नमाजच्या वेळांमध्ये बदल किंवा त्याचे नियोजन केले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित 'परस्परता संमेलन' या कार्यक्रमात ते बोलत थे. 'सिटिझन्स फॉर फ्रेटरनिटी' (CFF) भारत या सामाजिक सलोखा आणि संवादासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या पहिल्याच परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देशपातळीवरील सलोख्यावर मते मांडली.

नजीब जंग यांनी शीख बांधवांचे उदाहरण देत सांगितले की, त्यांनी आपले गुरुद्वारे सर्वांसाठी खुले ठेवले आहेत, मग मस्जिदीत जाण्यास कोणाच्या मनात संकोच का असावा? इफ्तारच्या वेळी आपण सर्वांना एकत्र येण्याचे आमंत्रण का देऊ नये? मुस्लिम समाज बऱ्याचदा अल्पसंख्याक असल्याच्या असुरक्षिततेच्या भावनेतून प्रतिक्रिया देतो, परंतु एखाद्याच्या घरात देवाचा फोटो पाहून मुस्लिमांनी घाबरून जाण्याचे किंवा असुरक्षित वाटण्याचे कारण नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील अविश्वास आणि भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी संवाद आणि सामाजिक सहभाग वाढवणे गरजेचे असल्याचे जंग यांनी नमूद केले.

संविधानातील बंधुभाव या मूल्याकडे लक्ष देणे गरजेचे
या परिषदेत भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी संविधानातील 'बंधुभाव' (Fraternity) या मूल्यावर विशेष भर दिला. आपण नेहमी स्वातंत्र्य आणि समतेबद्दल बोलतो, परंतु संविधानाने दिलेल्या बंधुभावाच्या आणि सामाजिक सलोख्याच्या सामूहिक अधिकारावर फार कमी चर्चा होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजातील एका शिष्टमंडळाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती, या भेटीचा उल्लेखही कुरेशी यांनी आपल्या भाषणात केला. "आम्ही भागवतजींना थेट विचारले होते की, सद्यस्थितीत भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांचे भविष्य काय असेल? यावर भागवतजींनी दिलेले उत्तर अत्यंत प्रेरणादायी होते. त्यांनी स्पष्ट केले की, हिंदू-मुस्लिम एकतेशिवाय ते हिंदू राष्ट्राची कल्पनाच करू शकत नाहीत आणि या एकतेशिवाय भारताची प्रगती होऊच शकत नाही," असे कुरेशी यांनी सांगितले. शांतता आणि स्थैर्य असेल तिथेच व्यापार आणि देश प्रगती करू शकतो, त्यामुळे राजकीय ध्रुवीकरण थांबणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

हिंदू आणि मुस्लिम वेगळे नसून एकाच समाजाचे भाग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते राम लाल यांनीही या परिषदेत संवाद साधताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विचारांना पुढे नेले. "जेव्हा हिंदू-मुस्लिम एकतेचा विषय निघतो, तेव्हा भागवतजी नेहमी म्हणतात की, एकता तिथे हवी असते जिथे दोन वेगळे प्रवाह असतात. आम्ही हिंदू आणि मुस्लिमांना वेगळे मानतच नाही, तर ते एकाच समाजाचे भाग आहेत. भारताला शक्तिशाली आणि महान बनवण्यासाठी सर्व समुदायांचे योगदान आवश्यक आहे. कोणताही एक समुदाय एकटा भारताला महान बनवू शकत नाही," असे राम लाल यांनी उद्धृत केले.

धार्मिक प्रथा पाळताना प्रत्येकाने संयम आणि संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असे आवाहन राम लाल यांनी केले. रमझानमधील उपवासाचा उद्देश आत्मपरीक्षण आणि शिस्त हा असतो, वाद निर्माण करणे नाही. त्याचप्रमाणे दिवाळी किंवा होळी साजरी करताना माझ्या फटाक्यांमुळे किंवा रंगांमुळे इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्याच वेळी, समाजानेही थोडी सहनशीलता दाखवणे गरजेचे असून संवेदनशीलता आणि सहनशीलता या दोन्ही गोष्टी सामाजिक सलोख्यासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.