इस्लामी संस्कृती आणि मुसलमानी समाज जीवन समजून घेण्यासाठी वाचायलाच हवीत 'ही' मराठी पुस्तकं

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून 'आवाज मराठी'च्या वाचकांसाठी आम्ही शिफारस करतोय या सहा पुस्तकांची. आपल्या समाजाच्या बहुधार्मिक आणि मिश्र संस्कृतीची ओळख करून देणारी, आपल्या सांस्कृतिक संचिताचा वारसा सांगणारी ही पुस्तकं मराठी वाचकांनी वाचायलाच हवीत, त्यातही खासकरून मराठी मुसलमान वाचकांनी. 

मुसलमान मराठी संतकवी (रा. चिं. ढेरे, पद्मगंधा प्रकाशन)
महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा विचार करताना ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांचं हे पुस्तक एक दीपस्तंभासारखं वाटतं. महाराष्ट्रातील विठ्ठल आणि वारकरी संप्रदायासारख्या प्रतीकांना आपलंसं करून घेणारे अनेक मुस्लिम संत मराठीत होऊन गेले. शेख महंमद, शहा मुंतोजी ब्रह्मणी, शहामुनी अशा संतांच्या साहित्याचा धांडोळा ढेरे यांनी घेतला आहे. या विखुरलेल्या मुसलमान संत कविविषयी एकत्रित माहिती सहज उपलब्ध नव्हती. त्या संकालानाचं काम ढेरे यांनी केलं. त्यावर विद्वत्तापूर्ण विवेचनही केलं. मराठी भाषेला आणि संस्कृतीला या संतांनी आपल्या रचनेतून कसं समृद्ध केलं, याचा एक अधिकृत ऐतिहासिक पुरावा म्हणजे हे पुस्तक. 
 
मुस्लिम बलुतेदार (तमन्ना इनामदार, संस्कृती प्रकाशन)
गावगाड्याची रचना समजून घेताना आपण नेहमी बारा बलुतेदारांचा उल्लेख करतो. पण त्यात मुस्लिम समाजाचाही समावेश आहे, हे तमन्ना इनामदार यांनी अतिशय ताकदीने मांडलं आहे. त्यांनी शिकलगार, तांबोळी, बागवान, पिंजारी अशा अनेक मुस्लिम पोटजातींच्या व्यवसायांचा आणि त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. धर्म बदलला तरी मातीशी असलेलं व्यवसायाचं आणि संस्कृतीचं नातं किती घट्ट असतं, हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. आज जागतिकीकरणात हे बलुतेदार कसे मागे पडत चालले आहेत, याचं वास्तववादी आणि अंतर्मुख करणारं चित्रण या पुस्तकात पाहायला मिळतं.
 
इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात (अब्दुल कादर मुकदम, साकेत प्रकाशन)
प्रबोधनवादी विचारवंत अब्दुल कादर मुकदम यांचं हे पुस्तक इस्लाम धर्माकडे बघण्याची एक नवी आणि वस्तुनिष्ठ दृष्टी देतं. धर्माच्या नावाखाली पसरवले जाणारे गैरसमज दूर करून, कुराणातील मूळ तत्वज्ञान आणि आजच्या काळातील त्याचे सुसंगत संदर्भ लेखक अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडतात. विशेषतः स्त्रियांचे हक्क, मानवी मूल्यं आणि लोकशाही यावर लेखक भाष्य करतात. एक कट्टरतावादी धर्म अशी प्रतिमा पुसून काढून, इस्लामचा मानवी चेहरा आणि त्यातील सुधारणावादी प्रवाह समजून घेण्यासाठी हे पुस्तक संग्रही असायलाच हवं.
 
सलोख्याचे प्रदेश (मूळ लेखिका: सबा नकवी, अनुवाद: प्रमोद मुजुमदार, समकालीन प्रकाशन)
सबा नकवी यांनी भारतभर फिरून अशा जागा शोधल्या जिथे हिंदू आणि मुस्लिम परंपरा एकत्र नांदतात. या पुस्तकाचा अनुवाद प्रमोद मुजुमदार यांनी इतक्या ओघवत्या शैलीत केला आहे की, वाचताना आपण त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देतोय असं वाटतं. पुरीच्या जगन्नाथ मंदिरातलं मुस्लिमांचं स्थान असो किंवा राजस्थानातील पिरांच्या दर्ग्यावर होणारी संयुक्त पूजा, हे पुस्तक 'गंगा-जमनी' संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतं. द्वेषाच्या राजकारणापेक्षा भारतीय मातीतील सलोख्याचे बंध किती खोलवर रुजलेले आहेत, याची जाणीव हे पुस्तक करून देतं.
 
महंमद पैगंबरांचे चरित्र (माधव विनायक प्रधान, संपादन: अनीस चिश्ती, सकाळ प्रकाशन)
१९२८ मध्ये माधव विनायक प्रधान या हिंदू लेखकाने लिहिलेलं हे चरित्र आजही तितकंच महत्त्वाचं आणि कालसुसंगत आहे. अनीस चिश्ती यांनी या दुर्मिळ ग्रंथाचं अतिशय उत्तम संपादन केलं असून, त्यातून पैगंबरांचा संघर्षमय जीवनप्रवास आपल्यासमोर येतो. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समता आणि बंधुभावाची केलेली मांडणी, त्यांनी दिलेला शांततेचा संदेश आणि अरब टोळ्यांमध्ये घडवून आणलेली सामाजिक क्रांती याचा सविस्तर पट यात मांडला आहे. इतिहासाच्या नजरेतून पैगंबरांना समजून घेण्यासाठी हे एक दर्जेदार पुस्तक आहे.
 
इस्लामी संस्कृती (साने गुरुजी, साधना प्रकाशन)
साने गुरुजींच्या लेखणीत जो ओलावा आणि माणुसकी आहे, तीच या पुस्तकातूनही पाझरते. गुरुजींनी हे पुस्तक धुळे कारागृहात असताना लिहिलं होतं. यात त्यांनी इस्लाममधील उदात्त विचारांचा सन्मान केला आहे. इस्लाम म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर तो प्रेमाचा आणि दास्यत्वातून मुक्तीचा मार्ग आहे, हे गुरुजींनी आपल्या ओघवत्या शैलीत पटवून दिलं आहे. पैगंबरांचे विचार सांगताना गुरुजी आपल्याला एका विशाल संस्कृतीची ओळख करून देतात. भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून त्यांनी या विषयाकडे पाहिलं आहे, जे आजच्या काळात खूप मोलाचं आहे.
 
या पुस्तक दिनी या सहा पुस्तकांचा परिचय करून देण्याचा उद्देश इतकाच की, आपण आपल्या आसपासच्या माणसांना आणि त्यांच्या संस्कृतीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. वाचन आपल्याला ज्ञान देतंच शिवाय ते आपल्याला अधिक संवेदनशील बनवतं. चला तर मग, या पुस्तक दिनानिमित्त यातलं एखादं तरी पुस्तक वाचायला घेऊया आणि विचारांचे नवे प्रदेश धुंडाळूया!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter