बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान याचा ऐतिहासिक आणि ऑस्कर नामांकित 'लगान' (Lagaan) हा चित्रपट पुन्हा एकदा देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १२ जून रोजी हा अजरामर चित्रपट मोठ्या पडद्यावर पुन्हा दाखल होणार आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट मूळ स्वरूपात १५ जून २००१ रोजी रिलीज झाला होता.
या ऐतिहासिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात गुलामगिरीच्या काळातील एका खेड्यातील अशिक्षित, कष्टाळू ग्रामस्थ आणि त्यांचे ब्रिटिश शासक यांच्यातील क्रिकेट सामन्याची रंजक आणि थरारक कथा मांडण्यात आली आहे. 'लगान' चित्रपटाला ७४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर) सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट श्रेणीत नामांकन मिळाले होते. या चित्रपटाने केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावर समीक्षकांची वाहवा मिळवली आणि बॉक्स ऑफिसवरही कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले होते.
तीन दिवस अनुभवता येणार 'लगान'ची जादू
आमिर खानच्या अधिकृत प्रॉडक्शन बॅनर 'आमिर खान प्रॉडक्शन्स'ने (Aamir Khan Productions) सोशल मीडिया हँडलवर एका विशेष पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी एक अजरामर गाथा. 'लगान' चित्रपटाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त ही महागाथा मोठ्या पडद्यावर परत येत आहे. चित्रपटगृहांमध्ये १२, १३ आणि १४ जून रोजी हा जादूई अनुभव पुन्हा एकदा अनुभवा."
या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त ग्रेसी सिंग, ब्रिटीश कलाकार रेचेल शेली आणि पॉल ब्लॅकथॉर्न, सुहासिनी मुळे, कुलभूषण खरबंदा आणि राजेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अखंड राज्य केले आहे.
ए आर रहमान यांच्या संगीताची भुरळ आजही कायम
'लगान' चित्रपटाच्या यशात त्याचे संगीत आणि गाण्यांचा खूप मोठा वाटा होता. ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. चित्रपटातील 'घनन घनन', 'मितवा', 'राधा कैसे ना जले' आणि 'ओ रे छोरी' ही गाणी आज २५ वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या तितकीच लक्षात आहेत आणि लोक ती आवडीने ऐकतात.
या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळवून दिली होती. 'लगान'ने ४९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये (National Film Awards) सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपटासह तब्बल आठ राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले होते. आता २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.