बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' अभिनेता आमीर खान याच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत. आमीर खानने स्वतः तो त्याची जोडीदार गौरी स्प्रॅट हिच्यासोबत ५ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढील महिन्यात अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचे वृत्त बुधवारी समोर आले होते, त्यावर आता आमीरने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या आमीर खानने एका मुलाखतीदरम्यान या लग्नाची माहिती दिली. "मी सध्या अमेरिकेत प्रवास करत आहे. माझ्या लग्नाबद्दल समोर आलेले वृत्त अगदी खरे आहे. ५ जुलै रोजी आमचे लग्न होणार आहे," असे आमीरने स्पष्ट केले.
आमीर खानचे हे तिसरे लग्न
अभिनेता आमीर खानचे हे तिसरे लग्न असणार आहे. आमीरने पहिले लग्न चित्रपट निर्माती रीना दत्ता हिच्याशी १९८६ मध्ये केले होते. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. रीना आणि आमीर यांना जुनैद आणि इरा खान ही दोन मुले आहेत. त्यानंतर २००५ मध्ये आमीरने दिग्दर्शिका किरण राव हिच्याशी दुसरे लग्न केले. मात्र, २०२१ मध्ये ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. घटस्फोटानंतरही ते दोघे मिळून त्यांचा मुलगा आझादचा सांभाळ करत आहेत.
कोण आहे गौरी स्प्रॅट?
आमीर खानने २०२५ मध्ये त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गौरी स्प्रॅटची प्रसारमाध्यमांशी ओळख करून दिली होती. त्यावेळी बोलताना त्याने आपण गेल्या दीड वर्षांपासून एकत्र असल्याचे सांगितले होते. गौरी स्प्रॅट ही मूळची बंगळुरूची असून ती वेलनेस आणि ब्युटी क्षेत्रात कार्यरत आहे. गौरीला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगा देखील आहे.
गेल्या वर्षी एका कार्यक्रमात बोलताना आमीर म्हणाला होता की, गौरी आणि मी एकमेकांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतो. परंतु, दीड वर्षांपूर्वी आमचा संपर्क पुन्हा आला. ती काही कामानिमित्त मुंबईत आली असताना आमची अचानक भेट झाली, त्यानंतर आमच्यात संवाद वाढला आणि सर्व गोष्टी अत्यंत नैसर्गिकरित्या पुढे गेल्या. लपून राहण्यापेक्षा सर्वांसमोर येणे जास्त सोयीचे ठरेल म्हणून मी तिची ओळख करून दिली, असे आमीरने स्पष्ट केले होते.