पुण्याच्या ऐतिहासिक गांधी भवनात इफ्तारनिमित्त सर्वधर्मियांची मांदियाळी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
पुण्याच्या ऐतिहासिक गांधी भवनात इफ्तारनिमित्त जमलेले सर्वधर्मीय बांधव
पुण्याच्या ऐतिहासिक गांधी भवनात इफ्तारनिमित्त जमलेले सर्वधर्मीय बांधव

 

सुलेमान शेख  

समाजातील ऐक्य, सलोखा, बंधुभाव व एकात्मता वाढविण्याच्या उद्देशाने रमजान काळात सर्वत्र इफ्तारचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सर्वधर्मीय एकत्र येत याचे आयोजन करतात. पुण्यामध्ये नुकतेच अशा सामूहिक रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक गांधी भवन येथे गुरुवार रोजी काही प्रमुख सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने या रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्र गांधी स्मारक ट्रस्ट, युवक क्रांती दल, जमाते इस्लामी हिंद पुणे, हाजी मक्केशाह मस्जिद, जकीउल्लाह जामा मस्जिद, आणि मुस्लिम समाज सुधारणा चळवळ आदि संघटनांचा समावेश होता.

 
इफ्तार आयोजनाचा उद्देश सांगताना ज्येष्ठ समाजसेवक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन म्हणाले, “आपल्याला इतरांच्या धर्मांविषयी अपुरी माहिती असते. ती जाणून घ्यावी, त्यानिमित्ताने एकत्र यावे या हेतूने आम्ही गेल्या ७-८ वर्षांपासून दिवाळी मिलन किंवा रोजा इफ्तार अशा प्रकारचे कार्यक्रम गेल्या आयोजित करतो.” 

ते पुढे म्हणाले, “आजही ग्रामीण भागामध्ये हिंदू रोजा तर अनेक मुस्लिम एकदशीचा उपवास करतात. शहरातील नागरिकांना हे फारसं परिचित नसतं. दुसरीकडे, मुस्लिम समाजाविषयीच्या अज्ञानातून आणि गैरसमजुतीतून होणाऱ्या कृती देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहेत. त्यामुळे या समाजांचे मनोमिलन करणे हादेखील उद्देश होता. या कार्यक्रमाला मुस्लीम महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला, याचा आम्हाला विशेष समाधन आहे.”

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त आणि प्रसिद्ध लेखक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “भारत हा बहुभाषिक बहुधर्मिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे. त्यामुळे परस्परांनी सर्वांचे सण उत्सव एकत्रित येवून आनंदाने साजरे करणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. सर्व संतांनी सहिष्णुता आंगीकरून हिंदू मुस्लिम एकतेचा पुरस्कारच केला आहे.”

धार्मिक सद्भावाची उदाहरणे देताना ते म्हणतात, “अकबराच्या काळात स्वामी परमानंदानी स्थापन केलेल्या प्रणामी पंथाच्या गांधीजींच्या आई पुतळाबाई या अनुयायी होत्या. हा पंथ हिंदू मुस्लिम एकतेवर भर देणारा होता आणि त्यांच्या एक पुस्तकामध्ये गीता आणि कुराण एकत्रित छापले गेले होते. या पंथाने उपासनेला महत्व दिले होते आणि त्याचा प्रभाव गांधीवर होता. महात्मा गांधीचे हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सहिष्णुतेचे विचार पुढे घेवून जाण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे ठरते.”

पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत जगताप, मुकुंद काकडे संभाजी ब्रिगेड, पैगंबर शेख मुस्लिम समाज सुधारणा चळवळ, इब्राहीम शेख, शेख करुमूद्दीन आदि मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.सर्वांच्या मते समाजात वाढत चाललेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे.जेव्हा विविध धर्म आणि समाजातील लोक एकत्र बसून संवाद साधतात, तेव्हा परस्पर गैरसमज दूर होऊन शांतता आणि सलोखा निर्माण होते आणि संविधानामध्ये निर्दिष्ट मूल्य अबाधित राहतात असे अधोरेखित केले. आणि हे सौहार्द टिकविणे सर्व नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.  

कार्यक्रमाच्या दरम्यान धर्मगुरूंनी इस्लाममधील रमजान महिन्याचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व उलगडवून सांगितले. या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात आणि सूर्यास्तानंतर इफ्तार करून उपवास सोडतात. यावेळी धर्मगुरू म्हणाले, “उपवासाचा उद्देश केवळ धार्मिक नसून त्यामागे संयम, आत्मशुद्धी आणि समाजातील गरजू लोकांबद्दल सहानुभूती निर्माण करणे हा संदेशही असतो.”

कार्यक्रमात इफ्तारची वेळ होताच सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार केला. खजूर, फळे, शरबत आणि विविध पारंपरिक पदार्थांनी अल्पोपहारणे इफ्तार करण्यात आले. इफ्तार नंतर नमाज पठणासाठीची सोय उपलब्ध केली गेली होती. नमाजनंतर भोजनाची व्यवस्था केली गेली होती. या कार्यक्रमात युवकांचा सहभागही विशेष लक्षवेधी ठरला. सर्वधर्मीय युवकांनी स्वयंसेवक म्हणून कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावली. पाहुण्यांचे स्वागत, भोजन व्यवस्था आणि इतर आयोजनात त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.  

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत जगताप नगरसेवक पुणे महानगरपालिका, अभय छाजेड विश्वस्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, शेख करिमूद्दीन, जस्मिन सय्यद, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. कार्यक्रमाला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वसामान्य नागरिक तसेच मोठ्या प्रमाणात युवक ही उपस्थित होते. महिलांचाही सहभाग विशेष लक्षवेधी होता. 

आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत सामाजिक एकता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter