नाशिक येथील टीसीएस कंपनीत लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर केल्याची खळबळजनक प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारचा छळ किंवा सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असे झिरो टॉलरन्स धोरण आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीने रविवारी स्पष्ट केले.
नाशिकमधील घटनेप्रकरणी तातडीने पावले उचलली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे कंपनीने पुढे नमूद केले.
"नाशिकमधील प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही त्वरित कारवाई केली. तपासाच्या कक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी प्रलंबित ठेवून निलंबित करण्यात आले आहे. आम्ही स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत. या तपासाच्या निष्कर्षावर आधारित पुढील पावले उचलली जातील," असे टीसीएसने म्हटले आहे.
मुंबईत मुख्यालय असलेल्या या कंपनीने पुढे सांगितले की, "कोणत्याही प्रकारचा छळ आणि सक्तीच्या विरोधात टीसीएसचे दीर्घकाळापासूनचे शून्य सहिष्णुता धोरण आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याणासाठी आम्ही नेहमीच उच्च दर्जाची मानके सुनिश्चित केली आहेत."
गेल्या आठवड्यात नाशिक पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले होते.
राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे वर्णन केले होते. तसेच नाशिक पोलिसांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उघडकीस आणले, त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले होते.
या घटना २०२० ते २०२६ या कालावधीत घडल्या असून आतापर्यंत नऊ प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवण्यात आले आहेत.
या प्रकरणातील आरोपींची नावे दानिश शेख, तौसिफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आणि अन्सारी अशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.