'ऑपरेशन सिंदूर'ने भारताचा आक्रमक आणि अचूक दृष्टिकोन जगाला दाखवला - लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) दीक्षान्त संचलनात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) दीक्षान्त संचलनात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

 

पुणे : ३० मे 

'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) हे राष्ट्रीय इच्छाशक्तीचे आणि अचूकतेचे उत्तम उदाहरण असून, कोणत्याही चिथावणीला भारत कसा चोख प्रत्युत्तर देतो, याचा हा एक नवा मापदंड आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) १५० व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनाचे (Passing-out parade) परीक्षण करताना ते बोलत होते.

आधुनिक युद्धातील आव्हाने आणि संयुक्त लष्करी ताकद

संचलनाला संबोधित करताना जनरल द्विवेदी यांनी आधुनिक युद्धनीतीवर भाष्य केले. ते म्हणाले, "आजचे जग केवळ ओळखीवर थांबत नाही. सध्याच्या काळातील धोके नेहमीच लष्करी गणवेशात किंवा घोषित आघाडीवरून येत नाहीत. वादग्रस्त क्षेत्रांपासून ते संमिश्र युद्ध पद्धतींपर्यंत (Hybrid warfare), आजच्या सुरक्षा वातावरणात लष्करी अधिकाऱ्यांनी कृती करण्यापूर्वी अत्यंत बारकाईने विचार करणे गरजेचे आहे."

मे २०२५ मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईला म्हणजेच 'ऑपरेशन सिंदूर'ला त्यांनी उजाळा दिला. या मोहिमेतून भारताने आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे आणि तो मापदंड पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या अधिकाऱ्यांची आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'एनडीए' पहिल्या दिवसापासूनच तिन्ही दलांमध्ये जी 'संयुक्त कार्यप्रणाली' (Jointness) रुजवते, त्याच पायावर 'ऑपरेशन सिंदूर'चे यश उभे होते, असेही ते म्हणाले.

४२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

लष्करप्रमुखांनी यावेळी स्वतःच्या 'एनडीए'मधील आठवणींना उजाळा दिला. ४२ वर्षांपूर्वी याच ठिकाणाहून आपण उत्तीर्ण झाल्याचे सांगत ते म्हणाले, "आज मी माझ्या गणवेशातील प्रवासाच्या अंतिम टप्प्यात तुमच्यासमोर उभा आहे. मी माझा गणवेश उतरवण्याच्या तयारीत असताना तुम्ही तो परिधान करण्यास सज्ज आहात. इथून सुरू होणारा तुमचा प्रवास कायमस्वरूपी टिकणारा आहे."

यावेळी त्यांनी संचलन कमांडर आणि कॅडेट्सचे उत्कृष्ट कवायतीबद्दल कौतुक केले आणि 'चीता स्क्वॉड्रन'ला (Cheetah Squadron) मानाचा ध्वज जिंकल्याबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या. तसेच, १२ मित्र राष्ट्रांमधील २४ परदेशी कॅडेट्सचेही त्यांनी कौतुक केले. "तुम्ही वेगवेगळ्या देशांतून आलात, पण आता एकाच मूल्यांनी घडला आहात," अशा शब्दांत त्यांनी परदेशी कॅडेट्सना निरोप दिला.