केरळच्या जनतेने सौदीच्या तुरुंगातून अब्दुल रहीमला सोडवण्यासाठी उभे केले ३४ कोटी रुपये!

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
सौदीच्या तुरुंगातून २० वर्षांनी सुटका झालेला अब्दुल रहीम
सौदीच्या तुरुंगातून २० वर्षांनी सुटका झालेला अब्दुल रहीम

 

कालिकत, केरळम 

करीब दोन दशकं अब्दुल रहीम केरळच्या एका छोट्याशा गावात फक्त त्याच्या कुटुंबाच्या आठवणींमध्ये आणि त्यांच्या दुआमध्ये जिवंत होता. तो तिकडे दूर सौदीच्या जेलमध्ये अडकलेला होता. परदेशात तो मृत्यूच्या खौफमध्ये जगत होता. अखेर गुरुवारी सकाळी तो ईदच्या आधी घरी परतला. यावेळी कोझिकोडमधल्या कोदम्पोझा त्या गावच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अश्रू, दुआ आणि जल्लोषाचं दृश्य पाहायला मिळालं.

त्याचे घरी परतणं म्हणजे केरळमधल्या अनेक लोकांसाठी सामूहिक मानवतेचा विजय होता. विशेषतः केरळच्या आवामाची म्हणजे मल्याळी लोकांची ही मोठी एकजूट होती.

अब्दुल रहीमने सौदी अरेबियाच्या जेलमध्ये तब्बल २० वर्षं काढली. त्याच्या मालकाच्या दिव्यांग मुलाच्या मृत्यूप्रकरणी त्याला सजा झाली होती.

 

तो त्याच्या गावी पोहोचला. तिथे शेकडो गावकरी, रिश्तेदार आणि हितचिंतकांनी त्याचं अतिशय जज्बाती स्वागत केलं. जगभरातल्या मल्याळी लोकांनी मजहब किंवा सामाजिक स्तर न पाहता त्याच्या रिहाईसाठी ३४ कोटी रुपयांहून अधिक 'ब्लड मनी' गोळा केला. त्यानंतरच त्याची रिहाई शक्य झाली.

कोदम्पोझा गावातले लोक पहाटेपासूनच वाट पाहत होते. सकाळी ९:१५ च्या सुमारास अब्दुल रहीमला घेऊन गाडी गावात शिरली. त्याच्या 'झीनत मंझिल' या वडिलोपार्जित घराकडे जाणारा अरुंद रस्ता माणसांनी खचाखच भरला होता. मुलं कुंपणाच्या भिंतीवर उभी होती. बुजुर्ग माणसं गेटजवळ काठीचा आधार घेऊन उभी होती. महिला व्हरांड्यातून शांतपणे हे सर्व पाहत होत्या. त्याला पाहण्याआधीच अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ते आपले अश्रू पुसत होते.

गाडी हळूहळू गर्दीतून पुढे सरकत होती. लोक पुढे येत होते. काहीजण दुआ करत होते. तर काहींना फक्त या माणसाला एकदा पाहायचं होतं. या माणसाच्या कहाणीने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं. अब्दुल रहीमने गाडीची काच खाली केली आणि हळूच हात हलवला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, आश्चर्य आणि शुक्रगुजारी या तिन्ही गोष्टी एकाच वेळी दिसत होत्या.

गाडीतून बाहेर पडल्यावर तो क्षणभर थबकला. आजूबाजूला असलेल्या माणसांच्या महासागराकडे पाहून तो भारावून गेला होता. गर्दीतल्या अनेकांनी त्याला याआधी कधीच पाहिलं नव्हतं. पण तरीही ते त्याच्याबद्दल असे बोलत होते, जणू काही तो त्यांच्या स्वतःच्याच खानदानातला एक सदस्य आहे.

त्याची म्हातारी आई फातिमा व्हरांड्यात उभी होती. तिचा मुलगा जेलमध्ये होता, त्या वर्षांमध्ये काळाने तिच्या चेहऱ्यावर खोल सुरकुत्या पाडल्या होत्या. पण गुरुवारी सकाळी तिचे डोळे फक्त त्याच्यावरच खिळले होते. अब्दुल रहीमने तिच्याकडे पाहिलं आणि फातिमा यांना रडू कोसळलं. त्यांनी चेहरा झाकला आणि त्या ओक्साबोक्सी रडू लागल्या. रिश्तेदार त्यांना शांत करण्याची कोशिश करत होते. अब्दुल रहीम गर्दीतून तिच्याकडे जात होता. त्यावेळी तोही स्वतःचे अश्रू रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.

 

घरात त्याच्यासाठी जेवणाचं ताट वाट पाहत होतं. हे जेवण त्याच्या आईने स्वतः बनवलं होतं. या एका क्षणासाठी या माऊलीने तब्बल दोन दशकं दुआ केली होती.

 

"माझी खुशी व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे अल्फाजच नाहीत," असं अब्दुल रहीम नंतर म्हणाला. त्याचा आवाज कापत होता. "हजारो रहमदिल लोकांच्या दुआ आणि निस्वार्थ मदतीमुळेच मी आज जिवंत आहे. मी त्यांचा कायम शुक्रगुजार राहीन."

चांगल्या रोजगाराच्या शोधात अब्दुल रहीम सुमारे २० वर्षांपूर्वी सौदी अरेबियाला गेला होता. त्यावेळी तो फक्त २६ वर्षांचा होता. या आखाती देशात पोहोचल्यानंतर काही आठवड्यांतच त्याच्यावर एक मोठी आफत ओढवली.

तो एका सौदी खानदानासाठी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. एका प्रवासादरम्यान तो मालकाच्या दिव्यांग मुलाला घेऊन जात होता. गाडीला अचानक धक्का बसला. या धक्क्यात मुलाच्या गळ्याला लावलेली वैद्यकीय नळी निसटली, असं सांगितलं जातं. सौदी न्यायालयात अब्दुल रहीमने मालूमात दिली की, मुलाला जोडलेल्या वैद्यकीय उपकरणाला त्याचा हात चुकून लागला होता. नंतर तो मुलगा बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

ही घटना अनवधानाने घडल्याचं सांगितलं गेलं. तरीही २४ डिसेंबर २००६ रोजी अब्दुल रहीमला अटक झाली. अनेक वर्षं कायदेशीर प्रक्रिया चालली. त्यानंतर २०१२ मध्ये त्याला फाशीची सजा सुनावण्यात आली.

इकडे केरळमध्ये हे प्रकरण हळूहळू एका खासगी दु:खातून लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलं. पीडितेच्या खानदानाने अब्दुल रहीमला माफ करण्याची रजामंदी दर्शवली होती. पण त्या बदल्यात त्यांनी १५ दशलक्ष सौदी रियाल (सुमारे ३४ कोटी रुपये) मागितले होते. 

ही बातमी पसरली. त्यानंतर सामान्य मल्याळी आवामाने अतिशय असामान्य मार्गांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. केरळभर आणि आखाती देशांतील मल्याळी समाजात "अब्दुल रहीमला वाचवा" मोहिमेने मोठा जोर पकडला.

निधी गोळा करण्याचा हा प्रयत्न लवकरच राज्यातील सर्वात मोठ्या सार्वजनिक मानवतावादी मोहिमांपैकी एक बनला. मशिदींच्या कमिट्या, चर्च, मंदिरं, परदेशात काम करणारे कामगार, विद्यार्थी, दुकानदार, रिक्षाचालक आणि 'कुटुंबश्री'च्या कार्यकर्त्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला.

निधी समितीचे निमंत्रक केके अली कुट्टी यांनी एका गोष्टीची याद करून दिली. लोकांना जेवढे शक्य होते, तेवढा चंदा त्यांनी दिला. "काहींनी १०० रुपये पाठवले, तर काहींनी १,००० रुपये दिले. अनेक गरीबांनी त्यांच्याकडच्या तुटपुंज्या पैशांतूनही मदत केली," असं ते म्हणाले.

या मोहिमेत अनेक ताज्जुब करणारे प्रसंग पाहायला मिळाले. निधी उभारणीच्या एका टप्प्यात अवघ्या नऊ मिनिटांत सुमारे १ कोटी रुपये गोळा झाल्याचं सांगितलं जातं. रमजानच्या पाचव्या दिवसापर्यंत या निधीने ५ कोटींचा टप्पा ओलांडला होता. पण या पवित्र महिन्याच्या शेवटच्या दिवसांत खऱ्या अर्थाने निधीची मोठी लाट आली.

रमजानची २७ वी रात्र. मुस्लिम समाज याला 'शब-ए-कद्र' (सत्तेची रात्र) मानतो. या रात्री जज्बात आणि दुआंचं रुपांतर एका मोठ्या अवामी समर्थनात झालं. एकाच दिवसात तब्बल ९ कोटी रुपये गोळा झाले. १२ एप्रिल रोजी हे ३४ कोटींचं उद्दिष्ट पूर्ण झालं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आणखी १ कोटी रुपये जमा झाले.

केरळमधील अनेकांसाठी ही मोहीम निधी गोळा करण्यापेक्षा मोठी होती. मजहब, वर्ग आणि सियासत या सर्व भिंती तोडून एकत्र येण्याचा हा दुर्मिळ क्षण बनला होता.

'ब्लड मनी'चा करार मुकम्मल झाला. त्यानंतर २ जुलै २०२४ रोजी सौंदी अदालतीने अब्दुल रहीमची फाशीची सजा रद्द केली. पण सौदीच्या सार्वजनिक कायद्यानुसार त्याला २० वर्षांची सजा पूर्ण करण्यासाठी जेलमध्येच राहावं लागलं.

सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने नंतर त्याच्या रिहाईला दुजोरा दिला. अफसरांनी सौदी प्रशासनाशी सतत राब्ता ठेवला होता आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत अब्दुल रहीमच्या तब्येतीवर लक्ष ठेवलं होतं, असं दूतावासाने स्पष्ट केलं. निधी उभारणीच्या मोहिमेतून भारतीय समाजाने दिलेल्या या अभूतपूर्व पाठिंब्याचंही दूतावासाने कौतुक केलं.

गुरुवारी सकाळी कोदम्पोझा येथील आपल्या साध्याशा घरात अब्दुल रहीम बसला होता. तो आईने वाढलेले जेवण जेवत होता. पण बाहेरचा माहोल अजूनही ईदसारखाच होता. लोक घोळक्याने येतच होते. काहींच्या हातात फुलं होती. तर काहींना फक्त दुआ करून त्याच्याशी हस्तांदोलन करायचं होतं.


हे ही वाचा : मुस्लिम महिलेच्या अवयवदानातून दोन हिंदू रुग्णांना मिळाले नवे जीवन


या गावाने अनेक वर्षं केवळ कुजबुजत्या दुआंमध्ये त्याचं नाव घेतलं होतं. पण आता अब्दुल रहीम सौदी अरेबियातील एखादा दूरचा कैदी राहिला नव्हता. ईदच्या मौक्यावर तो अखेर आपल्या घरी परतला होता.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter