मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
भक्ती चाळक
बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा, हा मुस्लिम समाजाचा एक महत्त्वाचा सण. हा सण प्रामुख्याने त्याग, करुणा, परोपकार आणि अथांग समर्पणाचे प्रतीक मानला जातो. यंदा जगभरात बकरी ईद मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरी झाली. बदलत्या काळासोबत असे धार्मिक सण अधिक लोकाभिमुख व्हावेत आणि त्यातून समाजाचे कल्याण व्हावे, यासाठी काही संस्था प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील एका चळवळीने बकरी ईदच्या निमित्ताने समाजहिताचा एक अनमोल संदेश दिला आहे.
रक्तदान हे जगातले सर्वात मोठे श्रेष्ठ दान म्हणजेच जीवनदान मानले जाते. शास्त्रंज्ञाच्या मते, आपण दिलेले अवघे एक युनिट रक्त कमीत कमी तीन जणांचे प्राण वाचवू शकते. सध्याच्या काळात रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा असण्याची मोठी गंभीर समस्या बनली आहे. अपघात, मोठ्या शस्त्रक्रिया, कर्करोगाचे उपचार किंवा प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. अशा वेळी एका रक्ताच्या बाटलीसाठी सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होते.
याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करून, बकरी ईदच्या पवित्र प्रसंगी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने कुर्बानीच्या मूळ भावनेला व्यापक आणि आधुनिक अर्थ दिला आहे. कुर्बानी म्हणजे समाजासाठी स्वतःला अर्पण करणे, स्वतःचा त्याग करणे हीच खरी ईश्वराची इबादत असल्याचे या उपक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
सोळा वर्षांची अविरत सेवा
मुस्लिम सत्यशोधक मंडळाने या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात केवळ मुस्लिम समाजच नाही, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला. समाजात धार्मिक सद्भाव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवता वाढवणे हाच यामागचा मुख्य हेतू आहे. मंडळ गेल्या १६ वर्षांपासून सातत्याने बकरी ईदच्या दिवशी अशा रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करत आहे.
या अभिनव संकल्पनेबद्दल सांगताना मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणतात, “बकरी ईद निमित्त रक्तदान करण्याची ही संकल्पना २०११ मध्ये निश्चित झाली आणि तिथूनच या प्रवासाचा प्रारंभ झाला. त्यावेळी डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अनेक मान्यवर आमच्या सोबत उभे होते.”
ते पुढे सांगतात, “कोरोनाच्या भयंकर काळामध्ये सुद्धा आम्ही मागे हटलो नाही. त्या कठीण काळात आम्ही रक्तदानाबरोबरच प्लाज्मा दान करण्याचे मोठे उपक्रम हाती घेतले. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळी राज्यात वादळ आले, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली, तिथे आम्ही मदत पोहोचवली. मंडळाच्या माध्यमातून अंध बांधवांना सुद्धा आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. आणि असे अनेक उपक्रम भविष्यातदेखील राबवणार आहोत.”
उपक्रमाच्या यशस्वी वाटचालीबद्दल शमसुद्दीन तांबोळी सांगतात, “आज या उपक्रमाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आमच्या समवेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर अनेक संविधानवादी संघटना खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून आम्ही रक्तदानाबरोबरच मरणोत्तर अवयवदान आणि देहदान ही सुद्धा संकल्पना समाजात रुजवत आहोत. त्या संदर्भातील जनजागृती करणे आणि लोकांकडून तसे संकल्प पत्र भरून घेणे, हे काम आम्ही सातत्याने करत असतो.”
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे, याकडेही तांबोळी यांनी लक्ष वेधले. कुर्बानीच्या बदलत्या स्वरूपावर बोलताना ते म्हणाले, “कुर्बानी जेव्हा आपण म्हणतो, त्यामध्ये त्याग आणि समर्पणाची भावना असते. जर खरोखरच त्याग आणि समर्पण करायचे असेल, तर ते स्वतःच्या हक्काच्या गोष्टीचे असलेले अधिक चांगले असते. म्हणून रक्त देऊन कोणाचा तरी जीव वाचवला पाहिजे.”
ते पुढे म्हणतात, “आज अनेक शहरांमध्ये पर्यावरणाचे मोठे प्रश्न निर्माण झालेत. वेगवेगळ्या सोसायट्यांमधून कुर्बानीवरून नाराजी व्यक्त होतेय. आणि यातून विनाकारण धार्मिक तणाव वाढतोय. हे सगळा प्रकार समाजाच्या ध्रुवीकरणाच्या दिशेने जात असून यामुळे मुस्लिम समाजाची प्रतिमा नकारात्मक होत आहे. म्हणूनच त्यागाची, समर्पणाची आणि दानधर्माची ही भावना आपण आधुनिक रूपात लोकांसमोर आणली पाहिजे. ती समाजाभिमुख आणि मानवताभिमुख करण्याचा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
हमीद दलवाईंच्या विचारांचा वारसा
या चळवळीचे खंदे पाठीराखे आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनीसुद्धा या उपक्रमाचे जाहीर कौतुक केले आहे. या चळवळीविषयी बोलताना ते म्हणाले, “मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि चिकित्सा यांचे फार जुने आणि जवळचे नाते आहे. हमीद दलवाई यांच्या काळापासून धर्मचिकित्सा हा या चळवळीचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बकरी ईदच्या निमित्ताने प्राण्यांची दिली जाणारी कत्तल थांबवून, माणसाला जी सर्वात प्रिय गोष्ट आहे, त्याचा त्याग करावा या चांगल्या हेतूने समाज परिवर्तनाचे हे काम सुरू आहे.”
अशोक धिवरे पुढे म्हणतात, “मी या कार्यक्रमांमध्ये नेहमीच हिरीरीने भाग घेत असतो. कारण समाज प्रगतीपथावर न्यायचा असेल तर धर्म-जात पाहण्यापेक्षा समाजासाठी आवश्यक गोष्टींचा विचार या उपक्रमातून केलेला दिसतो. इथे रक्तदान करणाऱ्यांमध्ये इतर धर्मीय लोक आल्याचे पाहून खूप आनंद वाटतो. भारताला जर सर्वार्थाने एकत्र आणि एकसंध ठेवायचे असेल, तर अशा कार्यक्रमांची आज देशाला खूप गरज आहे. हे मोलाचे काम डॉक्टर तांबोळी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.”
या उपक्रमाची नेमकी गरज आणि इस्लाममधील मानवतावादी दृष्टिकोन यावर मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य डॉ. समीना पठाण यांनी मोलाचे विचार मांडले. डॉ. समीना पठाण सांगतात, “इस्लाममध्ये सर्व मुस्लिम बांधव प्राण्यांची कुर्बानी देतात, त्या परंपरेला एक नवा विचार या उपक्रमाच्या माध्यमातून द्यायचा होता.”
प्रथा-परंपरांमधील कालसुसंगत बदलांविषयी बोलताना डॉ. समीना पठाण पुढे म्हणतात, “वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवता, धर्माने सांगितलेल्या काही चालीरीती किंवा प्रथांचा काळाच्या गरजेनुसार विचार केला पाहिजे. काही बांधव प्राण्यांची कुर्बानी देतात, तर काहीजण जकात काढून गरीब, वंचित समूहांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात. आम्ही या निमित्ताने रक्तदान, देहदान आणि अवयवदानाचा संकल्प करून घेतो. यात सर्व जाती-धर्माचे बांधव सहभागी होतात.”
उन्हाळ्यातील रक्ताच्या तुटवड्यावर सर्वोत्तम उपाय
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य संचालक आणि प्रसिद्ध लेखक प्रदीप आवटे यांनी या उपक्रमाच्या आरोग्यविषयक आणि सामाजिक बाजूवर विशेष भर दिला. प्रत्येक धर्मातील सणांना अशा आधुनिक रूपाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
प्रदीप आवटे म्हणतात, “मुस्लिम सत्यशोधक मंडळ बकरी ईदच्या कुर्बानीला एक आधुनिक आणि सुंदर अर्थ देण्याचा प्रयत्न करत आहे. आपापल्या धर्मातील सण-उत्सवांना कालानुरूप एक वेगळे आणि प्रगत रूप देणे हे प्रत्येक धर्मीयांचे कर्तव्य आहे. या मंडळाने बकरी ईदचा जो मुख्य संदेश आहे, म्हणजेच त्याग आणि बंधुत्व, त्याला थेट रक्तदान, देहदान आणि अवयवदानाच्या आधुनिक संकल्पनेशी जोडले आहे. यामुळे मानवी जीवन सुकर होण्यास आणि आपल्या त्यागामुळे अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यास मदत होत आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून देशभरातील सर्व सामाजिक स्तरातील लोकांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजेत.”
उन्हाळ्यात दवाखान्यांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो. चालू ऋतूचा दाखला देत प्रदीप आवटे पुढे म्हणतात, “सध्या आपण पाहत आहोत की उन्हाळा अतिशय कडक आहे. या कडक उन्हाळ्यामुळे जवळपास सर्वच शहरांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अशा कठीण वेळी या सणाचे निमित्त साधून रक्तदान करणे, हे खऱ्या अर्थाने एक मोठे मानवतावादी काम आहे.”
पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाने राबवलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्श ठरला आहे. कुर्बानीच्या पवित्र भावनेला विज्ञानाची आणि मानवतेची जोड देऊन मुस्लिम समाजाने संपूर्ण देशासमोर क्रांतीकारी पायंडा पाडला आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा 'रक्ताचे दान' करून जोडलेले हे मानवतेचे नाते येणाऱ्या काळात अधिक मजबूत होईल, यात शंका नाही.