भक्ती चाळक
जिल हज या इस्लामिक महिन्याच्या दहा तारखेला जगभरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद साजरी केली जाते. त्यागाचे खरे मूल्य जनमानसात रुजवणे, बंधुभाव टिकवणे आणि समाजातील वंचितांना, दुर्बलांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणे, असा या सणाचा त्रिवेणी संगम आहे. पैगंबर हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम यांच्या अथांग त्याग आणि विश्वासाचे स्मरण म्हणून या दिवशी वैध जनावरांची कुर्बानी देण्याची धार्मिक प्रथा आहे.
यंदा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून एक अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक चित्र समोर येत आहे. ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी गाईला ‘राष्ट्रीय प्राणी’ घोषित करण्याची मागणी केली होती. या मागणीचे पडसाद आता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात उमटताना दिसत आहेत. ‘गाय के सम्मान मे! मुसलमान मैदान मे!’ अशी घोषणा देत महाराष्ट्रातील मुस्लिम समाज स्वतःहून गोरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे.
बारामतीतून सामाजिक एकोप्याचा सूर
पुणे जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक प्रयोगशाळा असलेल्या बारामतीमध्ये मुस्लिम समाजाने एकत्र येत एक मोठा निर्णय घेतला आहे. गोतस्करी आणि गोहत्या पूर्णपणे थांबवण्यासाठी बारामती प्रांत कार्यालय तसेच बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मुस्लिम समाजाच्या वतीने रीतसर निवेदन देण्यात आले. या ऐतिहासिक पावलाचे बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी जाहीर कौतुक केले आहे.
या मोहिमेबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी म्हणाले, “बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि आजूबाजूचा संपूर्ण मुस्लिम समाज, त्यांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. सर्वांनी मिळून मुख्य नेत्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने जो गोहत्या बंदीचा कायदा केला आहे, त्याला मुस्लिम समाजाचे पूर्ण अनुमोदन दर्शवले. या कायद्यातील तरतुदींनुसार गोहत्या रोखण्यासाठी जी काही आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आहे.”
चिवडशेट्टी यांनी पुढे सांगितले की, या कायद्याच्या चोख अंमलबजावणीसाठी मुस्लिम समज पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार आहे. कुठेही कत्तलीसाठी गाय नेली जात असल्याची माहिती मिळाल्यास स्वतः पुढाकार घेऊन पोलिसांना बातमी देणे, गाई ताब्यात घेऊन त्यांचे रक्षण करणे आणि त्यांना गोशाळेत जमा करणे, यात हा समाज पुढे राहणार आहे. बकरी ईदच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय समाजासमाजामधील वैचारिक मतभेद दूर करण्यास मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात आघाडीवर असलेले बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी यांनी समाजाची भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले, “समस्त बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने गोवंश हत्या, गोतस्करी आणि अवैध गोव्यवसाय याच्या निषेधार्थ आम्ही सर्व बांधव एकत्र आलो आहोत. आमचा जो बहुसंख्य हिंदू बांधव आहे, या हिंदू बांधवांची श्रद्धा आणि आस्था गोमातेमध्ये आहे. राज्य शासनाने केलेल्या गोहत्या बंदी कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी होऊन गोहत्या व गोतस्करी त्वरित थांबवण्यात यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे.”
ते पुढे म्हणाले की, “गोतस्करीच्या नावावर जे काही तथाकथित गोरक्षक सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने जमाव एकत्रित करतात, मॉब लिंचिंग करतात, गाड्या अडवून समाजातल्या विविध घटकांना त्रास देण्याचे काम करतात, त्यांचासुद्धा संविधानाच्या आणि कायद्याच्या मार्गाने बंदोबस्त व्हावा, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”
बारामतीतील मुस्लिम समाजाने शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. देशात गोहत्या पूर्णपणे थांबावी आणि गाईला तातडीने राष्ट्रीय पशू घोषित करावे, या त्यातील मुख्य मागण्या आहेत. शेतकरी आणि गोपालक यांच्या दृष्टीने त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, प्रत्येक गाय पाळण्यासाठी शेतकऱ्याला प्रति दिवस ५०० रुपये अनुदान देण्यात यावे, गोशाळांना थेट शासकीय अनुदान मिळावे आणि गोसंरक्षण, तिचे पुनर्वसन, वैद्यकीय सुविधा आणि गाईच्या अंत्यविधीपर्यंतचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने उचलावा. अशा मागण्या त्यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.
श्रीरामपूर आणि अहिल्यानगरमधून थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथेही मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदारांना या संदर्भात सविस्तर निवेदन दिले. श्रीरामपूरच्या कार्यकर्त्यांनी देशातील सद्यस्थितीवर बोट ठेवत आपली मागणी लावून धरली.
तेथील एका सामाजिक कार्यकर्त्यांने भावना व्यक्त करताना सांगितले, “ गोमातेला राष्ट्रीय पशू जाहीर करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. आज गोमातेच्या नावावर संपूर्ण देशात एका विशिष्ट समाजाला काही लोकांकडून टार्गेट केले जाते. यामुळे विनाकारण मुस्लिम समाज बदनाम होतोय. आमचे थोर नेते मौलाना अर्शद मदनी यांनी हीच मागणी केली आहे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठींबा आहे. देशातील वातावरण शांत राहण्यासाठी गाईला लवकरात लवकर राष्ट्रीय प्राणी घोषित केले पाहिजे.”
अहिल्यानगर शहरातही याचे मोठे पडसाद उमटले. भारतीय कृषी व्यवस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या गाईला केंद्र सरकारने तातडीने राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करावे, अशी मागणी ‘सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटना’ अहिल्यानगर शाखेच्या वतीने करण्यात आली. संघटनेचे अहिल्यानगर महानगर शहराध्यक्ष अलतमश सलीम जरीवाला यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मम्माका सुदर्शन यांना भेटले आणि त्यांनी या संदर्भातील मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सुपूर्द केले.
पुण्यात मंचाचे धरणे आंदोलन
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'मूलनिवासी मुस्लिम मंच' आणि इतर अनेक पुरोगामी संघटनांनी एकत्र येत 'गाय के सम्मान मे! मुसलमान मैदान मे!' अशा घोषणा देत मोठे धरणे आंदोलन केले. पुण्यात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी या मागणीमागची खरी पार्श्वभूमी स्पष्ट केली.
अंजुम इनामदार म्हणाले, “२०१४ पासून देशात काही तथाकथित गो-रक्षा समितीचे लोक गाईच्या नावावर मुस्लिमांना पकडून त्यांची 'मॉब लिंचिंग' करत आहेत. गुजरात किंवा झारखंड असो, अशा मानवी संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत. या हिंसेला पूर्णविराम देण्यासाठी आणि समाजकंटकांचे हात आखडण्यासाठी सरकारने गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे, हीच आमची मुख्य मागणी आहे.”
याच काळात महाराष्ट्र ॲक्शन कमिटीचे सदस्य आणि जमीयत उलेमा महाराष्ट्राचे नायब सदर जाहिद शेख यांनी पश्चिम बंगालमधील एका सकारात्मक उदाहरणाचा दाखला देत मुस्लिम समाजाला अंतर्मुख होण्याचे आवाहन केले.
जाहिद शेख अत्यंत अभ्यासूपणे म्हणाले, “जसे की आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार सत्तेत येताच त्यांनी गोवंशावर बंदी घातली. या बंदीनंतर निर्णयाला पाठींबा देत बंगालमधील मुस्लिम बांधव, मौलवी आणि उलेमा रस्त्यावर आले. आणि पुढे कोणीही गाय खरेदी करणार नाही आणि तिची कुर्बानी देणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.”
ते पुढे म्हणाले की, “आमचे थोर नेते मौलाना अर्शद मदनी साहेबांनी नेमकी हीच बाब ओळखून सरकारने गाईला 'राष्ट्रीय प्राणी' घोषित करण्याची मागणी केली. वर्षभर देशात गाईच्या नावावर राजकारण चालते, मग तिला हा बहुमान का दिला जात नाही? जर असे झाले तर सर्व समस्याच संपून जातील आणि हिंदू-मुस्लिमांमध्ये जे मतभेद निर्माण होत आहेत, त्यांचे मूळच नष्ट होईल.”
मुंबईत झालेल्या जमीयत उलेमा-ए-हिंदच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीचा हवाला देत जाहिद शेख यांनी बकरी ईदच्या दिवशी पाळायच्या नियमांबद्दलही मुस्लिम बांधवांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “देशात कुठेही बेकायदेशीर कुर्बानी होऊ नये, याविषयावर बैठकीत चर्चा झाली. कुर्बानी अशी करा ज्याला शरीयतचीही परवानगी असेल आणि आपल्या देशाच्या कायद्यातही त्याला परवानगी असेल. ज्या गोष्टीला आपल्या देशाच्या कायद्याने मनाई केली आहे, ती गोष्ट करू नका.”
ते पुढे म्हणतात की, “कुर्बानी करताना आजूबाजूच्या इतर धर्मीय बांधवांची, शेजाऱ्यांची पूर्ण काळजी घ्या. जर तुम्ही रस्त्यावरून मांस घेऊन जात असाल, तर ते उघडे दिसू नये, त्याचे रक्त रस्त्यावर सांडू नये, परिसरात दुर्गंधी पसरू नये याची दक्षता घ्या. स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या देशबांधवांना कोणताही त्रास होणार नाही आणि कोणालाही तक्रार करण्याची संधी मिळणार नाही.”
नाशिक, दौंड आणि नांदेडमध्ये गोवंश कुर्बानीला पूर्ण नकार
नाशिकमध्येही ‘छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड’ या संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले. दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातही मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्याचे जाहीर आवाहन केले.
मराठवाड्याचे प्रमुख केंद्र असलेल्या नांदेड शहरातूनही अत्यंत कौतुकास्पद निर्णय समोर आला आहे. नांदेडच्या वजिराबाद मस्जिदचे इमाम व खतीब मुफ्ती अय्युब कासमी यांनी समाजाचा हा सामूहिक निर्णय जाहीर केला.
मुफ्ती अय्युब कासमी प्रतिक्रिया देताना म्हणाले, “महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानुसार ज्या प्राण्यांची कुर्बानी देण्याची परवानगी आहे, केवळ त्याच प्राण्यांची कुर्बानी दिली जाईल. गाय, बैलासारख्या गोवंशातील कोणत्याच प्राण्यांचा आम्ही बळी देणार नाही. हा निर्णय आम्ही सर्व नांदेडकरांनी सर्वानुमते घेतला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “धार्मिक सण शांततेत आणि सलोख्याने साजरा व्हावा यासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून समाजातील विचारवंत, धर्मगुरू आणि वकिलांशी चर्चा करत होतो. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला असून याला समाजातून शंभर टक्के पाठिंबा मिळाला आहे. आमच्या कुरेशी समाजाने सुद्धा गोवंशातील कोणत्याही प्राण्याचा बळी देण्यास स्पष्ट नकार दर्शवला आहे.”
दौंडमधील मुस्लिम समाजाने चौकात निदर्शने करून गोरक्षणाला पाठींबा दर्शवला. “मोदीजी, कृपया गाईला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा. देशातील बहुसंख्य जनता गाईला केवळ पवित्रच मानत नाही, तर तिला मातेचा दर्जाही देते. म्हणूनच मी माझ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करावा. गाईंची खरेदीही करू नये आणि त्यांचा बळीही देऊ नये.” अशी निदर्शने त्यांनी लावली होती.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून मुस्लिम समाजाने घेतलेली ही भूमिका देशातील गंगा-जमुना संस्कृतीचा पुरस्कार करणारी आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांनी घेतलेला हा निर्णय आणि गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची केलेली ही मागणी येणाऱ्या काळात देशात एक नवा आणि सकारात्मक बदल घडवून आणेल, यात तिळमात्र शंका नाही.