पुणे
पुणे जिल्ह्यात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या संयुक्त कारवाईत एका मोठ्या आंतरजिल्हा दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली असून, २ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. मंचर हे या रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींकडून १,००० लिटर शुद्ध दुधात ५०० लिटर बनावट दुधाचे मिश्रण केले जात होते. हे 'सिंथेटिक' दूध तयार करण्यासाठी दूध पावडर, इमल्सिफायर्स, पाम तेल, डिटर्जंट आणि चक्क शॅम्पूचा वापर केला जात होता, अशी धक्कादायक माहिती एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
पुणे, सोलापूर, जालना, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव आणि धाराशिव अशा सात जिल्ह्यांत या रॅकेटचे जाळे पसरले होते. एफडीएने मंचर येथील 'नवकर डिस्ट्रिब्युटर'सह एकूण नऊ आस्थापनांवर छापे मारून ३९ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. कारवाईदरम्यान २०,००० लिटर संशयास्पद भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले.
मुख्य आरोपी सुशांत हिंगे आणि त्याचा सल्लागार संदीप लोढा यांनी शेतकऱ्यांना आणि दूध संकलन केंद्रांना अधिक नफ्याचे आमिष दाखवून यात सामील करून घेतले होते. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संघटित गुन्हेगारीसह घातक रसायनांचा वापर केल्याप्रकरणी कठोर कलमे लावण्यात आली आहेत. एफडीएने संबंधित पाच परवाने निलंबित केले असून, चार व्यावसायिक प्रतिष्ठानांना कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या रॅकेटशी संबंधित प्रमुख दुग्ध उत्पादक कंपन्यांचा शोध घेण्यासाठी आता पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात मोठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.