वॉशिंग्टन
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई संघटित गुन्हेगारी गटाशी (Lawrence Bishnoi Organized Crime Group) संबंधित असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीत सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 'कमल' या भारतीय नागरिकाच्या शोधात अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) लागली आहे. एफबीआयने गुरुवारी ही माहिती जाहीर केली असून, कमलविरोधात अमेरिकेत फेडरल अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले आहे.
युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेंट्रल डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाने १ जुलै रोजी कमलविरोधात हा समन्स व वॉरंट जारी केला आहे. त्याच्यावर खंडणीच्या उद्देशाने व्यापारात अडथळा आणण्याचा कट रचल्याच्या (Conspiracy to Interfere with Commerce by Extortion) गुन्ह्याखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. हा लॉरेन्स बिश्नोई गट भारताच्या पंजाब राज्यातून उगम पावला असून, तो कॅलिफोर्नियासह इतर भागात कार्यरत आहे, असे फेडरल एजन्सीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
कमलविषयी कोणतीही माहिती असल्यास स्थानिक एफबीआय कार्यालयात किंवा जवळच्या अमेरिकन दूतावासात संपर्क साधण्याचे आवाहन अमेरिकन यंत्रणेने केले आहे. गेल्या काही महिन्यांत एफबीआयने भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी सिंडिकेट्सविरुद्ध 'ऑपरेशन हार्ड बॉल' अंतर्गत मोठी मोहीम उघडली आहे. यापूर्वी जग्गू भगवानपुरिया आणि रवींदर धांडा यांच्याशी संबंधित ऑपरेटर्सवरही एफबीआयने कारवाई करत वॉरंट जारी केले आहेत आणि अनेक जणांना अटक केली आहे.