Ayushmann Khurrana UNICEF Visit Jalna: बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी एकत्र येण्याचे अभिनेत्याचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 7 h ago
मुलांचे बालपण सुरक्षित ठेवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी; अभिनेता आयुष्मान खुराना यांचे प्रतिपादन
मुलांचे बालपण सुरक्षित ठेवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी; अभिनेता आयुष्मान खुराना यांचे प्रतिपादन

 

जालना

प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित ठेवणे ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आणि प्रसिद्ध अभिनेते आयुष्मान खुराना यांनी केले. त्यांनी बुधवारी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली गावातील शाळेला भेट दिली आणि हंगामी स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या काळजी, शिक्षण आणि संरक्षणासाठी राबविण्यात येत असलेल्या युनिसेफ-समर्थित उपक्रमाचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान आयुष्मान खुराना यांनी शाळकरी मुले, किशोरवयीन मुले-मुली, पालक, ग्रामस्थ आणि युनिसेफकडून प्रशिक्षित केलेल्या 'बालमित्र' स्वयंसेवकांशी संवाद साधला. पालक हंगामी रोजगारासाठी बाहेरगावी जातात, तेव्हा मागे राहिलेल्या मुलांच्या सुरक्षेची आणि शिक्षणाची काळजी हे बालमित्र घेतात. जालन्यातील ग्रामस्थांनी स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या पद्धतीने घेतली आहे, ती खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय बालमजुरी, बालविवाह आणि अल्पवयीन गर्भधारणा रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रसार

जालना जिल्ह्यात २०१४ पासून हा उपक्रम राबवला जात असून, सध्या शेकडो गावे यात समावली आहेत. या कार्यक्रमांतर्गत मुले आपल्या आजी-आजोबा, नातेवाईक किंवा समुदायातील विश्वासू लोकांसोबत राहतात. युनिसेफच्या प्रशिक्षित बालमित्रांद्वारे त्यांना शिक्षण, पोषण, खेळ, मानसिक आरोग्य आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी मदत केली जाते. आर्थिक विवंचनेमुळे होणारे हंगामी स्थलांतर हा अनेक कुटुंबांसाठी कठोर वास्तवाचा भाग असला, तरी कोणत्याही मुलाचे बालपण या परिस्थितीमुळे हरवता कामा नये, अशी भावना खुराना यांनी व्यक्त केली. युनिसेफ इंडियाचे उपप्रतिनिधी जॅस्पर मोलर यांनीही यावेळी मुलांवरील धोके ओळखून सामाजिक सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.



Latest News