अमोल सुरवसे
पुण्यातील कोंढवा भागात असलेली 'कौसरबाग' म्हणजे खवय्यांसाठी एक मोठी पर्वणीच आहे. सालाबादप्रमाणे यंदाही फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच येथील रमजान खाद्य यात्रेची आतुरता लागून राहिली होती. संध्याकाळ होताच या परिसरात इफ्तारची वेळ जवळ आल्याची चाहूल लागते. विविध खमंग खाद्यपदार्थांनी सजलेले स्टॉल्स पाहून वातावरणात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. आचारी रात्रंदिवस राबून हे स्वादिष्ट पदार्थ तयार करत असतात, त्यांच्या या अथक मेहनतीची चव प्रत्येक पदार्थात जाणवते. रंगीबेरंगी स्टॉल्स, हवेत दरवळणारा मसाल्यांचा सुगंध आणि रात्रीचा झगमगाट हे सर्व छायाचित्रणासाठी आणि प्रत्यक्ष खाद्यभ्रमंतीसाठी अतिशय उत्तम असते.
रमजान सुरू होताच समविचारी मित्रांना गोळा केले आणि थेट कौसर बाग गाठली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 'शरीफ केटरर्स'ने आपला स्टॉल दिमाखात सजवला होता. इथे स्टार्टर्सचे नानाविध प्रकार चाखायला मिळतात. त्यातील रशियन कबाब, चिकन शाही रोल आणि चिकन साटे आवर्जून खावेत असे आहेत. कुटुंबासोबत जाणाऱ्यांसाठी इथे वातानुकूलित आणि साधी अशी दोन्ही प्रकारची बसण्याची उत्तम सोय आहे. शरीफ केटरर्सच्या अगदी समोर उत्तम दर्जाचे हैदराबादी हलीम मिळते, रमजानच्या महिन्यात या पदार्थाची चव घेणे हा एक वेगळाच आनंद असतो.
स्टार्टर्सवर यथेच्छ ताव मारल्यानंतर थोडी शतपावली करत आम्ही जवळच्याच कौसरबाग मस्जिदीत गेलो. तिथे ईशाची नमाज अदा करून मुस्लिम बांधव बाहेर पडताना दिसत होते. मस्जिदीच्या आवारात काही काळ शांत बसल्यानंतर मनाला विलक्षण प्रसन्नता लाभली.
तिथून बाहेर पडल्यावर आम्ही शेजारीच असलेल्या 'शालिमार केटरर्स'कडे मोर्चा वळवला. यंदा तिथे बसून खाण्याची अतिशय चांगली सोय करण्यात आली आहे. बिर्याणी, रुमाली रोटी आणि सीख कबाबवर मनसोक्त ताव मारला. रमजानमध्ये मालपुआ, फालुदा आणि फिरनी यांसारख्या गोड पदार्थांना खवय्यांची विशेष पसंती असते. जेवणानंतर या गोड पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय ही खाद्य यात्रा पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही.
यथेच्छ भोजनानंतर शरीफ केटरर्सच्या बाजूला असलेल्या 'मोमीनपुरा स्पेशल तहुरा कोल्ड्रिंक्स'च्या स्टॉलवर आलो. चवीला अप्रतिम आणि पचनासाठी उत्तम असलेले हे तहुरा पेय पिऊन मन अगदी तृप्त झाले. याशिवाय 'ताजगी कोल्ड्रिंक्स'मध्ये मिळणारा खरबूज फालुदाही तितकाच चविष्ट आहे. या ठराविक ठिकाणांव्यतिरिक्त अरेबियन मंदी, शाही दरबार आणि दिल्ली दरबार अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे खवय्यांना विविध पदार्थांचा मनमुराद आनंद लुटता येतो.
यंदाच्या खाद्य यात्रेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे मस्जिदीच्या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी अनेक स्वयंसेवक तत्परतेने काम करताना दिसले. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी जाणवली नाही. शिवाय रस्त्याच्या कडेला लागणारे बेकायदा स्टॉल्स यंदा दिसले नाहीत. हा बदल अपेक्षेपेक्षा खूपच सुखावणारा होता, कारण अशा स्टॉल्समुळे चालण्यासाठी रस्ता कमी पडतो आणि नाहक त्रास होतो.
यंदाचे हे नियोजन खरोखरच कौतुकास्पद होते. कौसरबागेतील या यात्रेचे सर्वात विलोभनीय रूप म्हणजे तिथे मुस्लिम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून बहुसंख्येने उपस्थित असणारे हिंदू बांधव. हे दृश्य खऱ्या अर्थाने हिंदू-मुस्लिम एकतेचे एक जिवंत प्रतीक आहे.
अनेक हिंदू आणि इतर धर्मीयांच्या मनात मुस्लिम हॉटेलमधील स्वच्छतेबाबत किंवा जेवणात मटणाव्यतिरिक्त इतर मांस मिसळण्याबाबत काही पूर्वग्रह असतात. पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. संपूर्ण परिसरात स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतलेली पाहायला मिळाली. पूर्वग्रहदूषित विचार करून या अप्रतिम अनुभवाला मुकण्यापेक्षा, प्रत्येकाने स्वतः तिथे जाऊन खरी परिस्थिती पाहावी आणि आपल्या आवडीच्या मांसाहारी पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.
साधारण रात्री नऊनंतर या परिसरात प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे संध्याकाळी सातच्या सुमारास तिथे पोहोचल्यास आरामात सर्व पदार्थांचा आस्वाद घेता येतो. अर्थात, मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत पदार्थांवर ताव मारण्याची मजा काही औरच असते. या सर्व प्रवासात एक निरीक्षण नक्की नोंदवावेसे वाटते. दरवर्षी साधारण तेच पदार्थ खायला मिळतात, त्याऐवजी लखनऊ, काश्मीर किंवा हैदराबादसारख्या विविध प्रांतांमधील खास पारंपरिक पदार्थ उपलब्ध झाल्यास या यात्रेची रंगत आणखी वाढेल. अर्थात सध्या उपलब्ध असलेल्या पदार्थांमध्येही बरीच विविधता आहेच.
पुण्याची ही रमजान खाद्य यात्रा केवळ पोटाची भूक भागवणारी नसून ती संस्कृती, एकता आणि निखळ आनंदाचा अनुभव देणारी एक उत्तम पर्वणी आहे. विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन या उत्सवी वातावरणाचा मनमुराद आनंद घेताना दिसतात, हेच या खाद्य यात्रेचे खरे सौंदर्य आहे. तुम्हीही कौसरबाग परिसरात जाऊन या उत्साही वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव नक्की घ्या.
(लेखक महाराष्ट्रातील प्रसिद्ध फूड ब्लॉगर आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -