पुणे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पुण्याच्या भवानी पेठ येथील काशिवाडी परिसरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मुस्लिम समाजातील महिला भगिनींसाठी येथे विशेष रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. इंदिरा अविनाश बागवे यांच्या पुढाकाराने आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मुस्लिम समाजातील महिलांमध्ये शिक्षण, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्साह दर्शवला.
याप्रसंगी मुक्ता फाउंडेशनच्या अध्यक्षा इंदिरा अविनाश बागवे, सेक्रेटरी फरजाना खान, पोलिस महिला पदाधिकारी राणी जाधव, हवालदार राणी राऊत आणि कॉन्स्टेबल आरती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सचिव मनीषा क्षीरसागर, दिलशाद शेख, कोमल बावकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या ज्योती अडागळे, प्रियंका भोंडे, मालन कसबे आणि अनेक महिला भगिनी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या.

विशेष म्हणजे गेल्या ३ वर्षांपासून केवळ महिलांसाठीच या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. महिलांमध्ये ऐक्य, स्नेह आणि परस्पर संवाद वाढावा, अशी यामागची भावना आहे. इंदिरा बागवे यांनी केवळ सण साजरे करण्यावर भर दिला नाही, तर मुक्ता फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील सर्व जातीधर्मांच्या महिलांसाठी विविध लघुउद्योग व व्यवसाय सुरू केले आहेत. या कामामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या स्वावलंबी बनत आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. महिला दिनानिमित्त अशा प्रकारे एकत्र येऊन उत्सव साजरा करणे, ही एक नवी सुरुवात असल्याचे मत त्यांनी मांडले. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -