ओनिका माहेश्वरी, नवी दिल्ली
देशातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचे ताजे निकाल एका सुखद बदलाची साक्ष देत आहेत. यावेळच्या निकालाने विशेषतः त्या मुस्लिम महिला उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे, ज्यांनी पहिल्या २५ मध्ये आपली जागा निश्चित केली. आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना, हे यश अधिकच प्रेरणादायी ठरते.
हा काही अचानक झालेला चमत्कार नाही. गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे स्पष्ट दिसते की, मुस्लिम महिला दरवर्षी या परीक्षेत आपले वर्चस्व गाजवत आहेत. त्या केवळ यशस्वी होत नाहीयेत, तर 'मुस्लिम महिला फक्त घराच्या चार भिंतींमध्येच राहतात' या जुन्या आणि बुरसटलेल्या समजुतीलाही त्यांनी सुरुंग लावला आहे.
झकात फाऊंडेशनचे जफर महमूद यांनी एकदा अतिशय मार्मिक गोष्ट सांगितली होती की, स्त्रियांचे आयुष्य फक्त घरापुरते मर्यादित होते तो काळ आता इतिहास जमा झाला आहे. आता काळ बदलला आहे. मुस्लिम महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. हा बदल केवळ वैयक्तिक नसून सामाजिक आहे.
जेव्हा एखादी महिला प्रशासकीय सेवेत येते, तेव्हा ती आपल्यासोबत संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडते. २०२० ते २०२५ या वर्षांतील यूपीएससीचे निकाल सांगतात की, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यांसारख्या प्रतिष्ठित पदांवर या लेकींची उपस्थिती सातत्याने वाढते आहे.
या यशामागची सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. या लेकी कोणत्याही राजवाड्यातून आल्या नसून, अत्यंत अरुंद गल्ल्यांमधून आणि मर्यादित सोयीसुविधा असलेल्या घरांतून बाहेर पडल्या आहेत. यात कोणाचे वडील रिक्षा चालवतात, तर कोणाचे वडील एका छोट्याशा दुकानात क्रॉकरी विकतात. जर मनाशी पक्का निर्धार केला आणि प्रामाणिक मेहनत घेतली, तर गरिबीतूनही तेजस्वी भविष्य घडवता येते, हे या मुलींनी सिद्ध करून दाखवले आहे.
महाराष्ट्र राज्यातील यवतमाळच्या अदीबा अनम यांची गोष्ट संघर्षाचे सशक्त उदाहरण आहे. अदीबाचे वडील भाड्याने ऑटो-रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा ओढायचे. संपूर्ण कुटुंब एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहायचे. अदीबाचे सुरुवातीचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते, पण नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. तीन वेळा अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. २०२४च्या निकालात १४२वी रँक मिळवून तिने दाखवून दिले की, एका सामान्य रिक्षाचालकाची मुलगी देखील देशाच्या सर्वोच्च सेवेपर्यंत पोहोचू शकते.
अशीच एक कथा वाराणसीच्या अरफा उस्मानी यांची आहे. अरफाचे वडील अस्लम खान वाराणसीतील एका छोट्या दुकानात क्रॉकरी विकतात. अरफा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी आयआयटी (बीएचयू) मधून पदवी घेतली. त्यांच्यासमोर चांगल्या नोकरीचे पर्याय होते, पण त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. कोणत्याही मोठ्या कोचिंगशिवाय, केवळ स्वतःच्या तयारीच्या बळावर त्यांनी चौथ्या प्रयत्नात १११ वी रँक मिळवली. अरफा यांचा हा विजय त्या लाखो मुलींसाठी आशा आहे, ज्या साधनांच्या अभावाला आपली कमजोरी मानतात.
कोलकाताच्या सायमा खान यांची कथा संयम आणि एकाग्रतेचा धडा देते. मोमिनपुरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या सायमा यांनी अभ्यासासाठी जगाशी पूर्णपणे संपर्क तोडला होता. अनेक वर्षे त्या कोणत्याही लग्नकार्याला गेल्या नाहीत किंवा नातेवाईकांना भेटल्या नाहीत, इतकेच काय तर सोशल मीडियापासूनही त्या दूर राहिल्या. तीन वेळा अयशस्वी होऊनही त्या जिद्दीने उभ्या राहिल्या. शेवटी चौथ्या प्रयत्नात १६५ वी रँक मिळवून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. यशासाठी कोणताही सोपा मार्ग नसतो आणि प्रत्येक अपयश तुम्हाला विजयाच्या जवळ नेते, असे सायमा मानतात.
गेल्या काही वर्षांत अनेक नावांनी आपली मोहोर उमटवली आहे. इफरा शम्स अन्सारी यांनी २०२५ च्या निकालात २४ वी रँक मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच, नौशीन (रँक ९) आणि वरदाह खान (रँक १८) यांसारख्या हुशार मुलींनी टॉप-२० मध्ये स्थान मिळवून हे स्पष्ट केले की, मुस्लिम महिलांची कामगिरी आता अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे.
याचप्रमाणे अबीर असद यांसारख्या उमेदवार, ज्या एका मौलानाची मुलगी आहेत, त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय केवळ स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर ३५ वी रँक मिळवली. शिक्षण आणि धार्मिक पार्श्वभूमी हे एकमेकांच्या विरोधात असतात, असे मानणाऱ्यांसाठी हे एक चोख उत्तर आहे.
यूपीएससीमध्ये मुस्लिम उमेदवारांचे आणि विशेषतः महिलांचे वाढते प्रतिनिधित्व हा एका मोठ्या सामाजिक बदलाचा संकेत आहे. २०२० मध्ये जिथे सदफ चौधरी यांनी २३ व्या रँकसह मुस्लिम उमेदवारांमध्ये अव्वल स्थान मिळवले होते, तिथे २०२३ आणि २०२४ मध्ये ही संख्या आणखी वाढली. २०२५ च्या निकालातही सुमारे १३ हून अधिक मुस्लिम महिला यशस्वी झाल्या आहेत. इरम चौधरी (AIR ४०) आणि फरखंदा कुरेशी (AIR ६७) यांसारखी नावे आता समाजासाठी रोल मॉडेल बनली आहेत.
गेल्या काही वर्षांतील यूपीएससीचे निकाल या गोष्टीवर शिक्कामोर्तब करतात. २०२५ मध्ये एकूण ५३ मुस्लिम उमेदवारांची निवड झाली, ज्यामध्ये १३ हून अधिक महिला आहेत. यात इफरा शम्स अन्सारी यांनी २४ वी रँक मिळवली. २०२४ मध्ये मुस्लिम महिलांमध्ये इरम चौधरी यांनी AIR ४०, फरखंदा कुरेशी यांनी AIR ६७ आणि अदीबा अनम यांनी AIR १४२ मिळवली.
२०२३ मध्ये नौशीन AIR ९, वरदाह खान AIR १८ आणि सायमा खान AIR १६५ वर होत्या. २०२२ मध्ये आयशा फातिमा AIR १८४ आणि काजी आयशा इब्राहिम AIR ५८६ वर होत्या. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, मुस्लिम महिला शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय सेवांमध्ये सातत्याने प्रगती करत आहेत.
हा वाढता आत्मविश्वास आणि चढता आलेख साक्ष्य देतोय, मुस्लिम समाजात शिक्षणाबाबत नवी जाणीव निर्माण झाली आहे. आता या लेकी केवळ पदवी घेण्यापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, त्यांना देशाच्या धोरण निर्मितीचा आणि प्रशासनाचा भाग बनायचे आहे. जर संधी आणि योग्य व्यासपीठ मिळाले, तर आपण आभाळाला गवसणी घालू शकतो, हे या महिला आज महिला दिनाच्या निमित्ताने सिद्ध करत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter