मलिक असगर हाशमी, नवी दिल्ली
देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो तरुणांनी या परीक्षेत आपले नशीब आजमावले, पण अंतिम यादीत स्थान मिळवण्याचे भाग्य मात्र काही मोजक्याच उमेदवारांना मिळाले. अधिकृत आकड्यांनुसार, यंदा एकूण ९५८ उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि परराष्ट्र सेवेसाठी निवड झाली आहे. या निकालाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ५३ मुस्लिम तरुणांनी यात मोठे यश मिळवले आहे. हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून, बदलती सामाजिक विचारसरणी आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.
गेल्या काही वर्षांत मुस्लिम समाजात स्पर्धा परीक्षांबाबत मोठी जागृती झाली आहे. अनेक सामाजिक संस्था आणि मार्गदर्शन केंद्रे तरुणांना पुढे नेण्यासाठी झटत आहेत. या प्रयत्नांचे फळ आता निकालांतून दिसू लागले आहे. मेहनतीत सातत्य, योग्य दिशा आणि पक्का निर्धार असेल तर कोणत्याही पार्श्वभूमीचा विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च सेवेपर्यंत पोहोचू शकतो, हाच संदेश या यशस्वी तरुणांनी दिला आहे.
यंदाच्या निकालात 'जकात फाऊंडेशन ऑफ इंडिया'चा वाटा मोठा आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या १४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जकात फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून हुशार पण गरिबीशी झुंजणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी देत आहे. संस्थेचे संस्थापक जफर महमूद म्हणतात की, हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. यामागे अनेक वर्षांची शिस्त आणि घेतलेले कष्ट आहेत. योग्य मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात यापेक्षाही चांगले निकाल पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या 'रेसिडेन्शियल कोचिंग अकॅडमी'नेही यंदा बाजी मारली आहे. इथून तयारी करणाऱ्या ३८ उमेदवारांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्यापैकी चार उमेदवार तर पहिल्या ५० रँकमध्ये आहेत. कोणत्याही संस्थेसाठी ही खूप मोठी कामगिरी आहे. विशेष म्हणजे, या यशस्वी उमेदवारांमध्ये १५ मुली आहेत. यावरून आता मुलीही प्रशासकीय सेवांमध्ये मागे नाहीत, हे सिद्ध झाले आहे.
जामियाचे कुलगुरू प्रोफेसर मजहर आसिफ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, हे यश विद्यापीठाच्या संस्कारांचे फळ आहे. नागरी सेवेत यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि संयम लागतो. देशाच्या कारभारात प्रामाणिकपणे काम करणारे तरुण तयार करणे, हेच आमचे स्वप्न आहे.
अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या कोचिंग अकॅडमीनेही यंदा चार हिरे देशाला दिले आहेत. यामध्ये नाझिया परवीन, गुलफिझा, यासीर अहमद भट्टी आणि शाहीद रझा खान यांचा समावेश आहे. विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे कौतुक करत ते देशाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
यंदाच्या निकालाने हरियाणातील मेवात क्षेत्राचे भाग्य उजळले आहे. मेवात हा देशातील मागास जिल्ह्यांपैकी एक मानला जातो, जिथे शिक्षणाच्या सोयी आजही कमी आहेत. पण मेवातच्या तीन तरुणांनी यूपीएससीमध्ये बाजी मारून सर्वांनाच चकित केले आहे. उटावडचा शाहरुख खान (रँक ५७५), बिघावलीची ऋचा सिंह तंवर (रँक ६३२) आणि टायराची इंशा खान (रँक ६७८) यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. त्यांच्या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाची लाट उसळली आहे.
स्थानिक लोकांच्या मते, हे यश केवळ या विद्यार्थ्यांचे नाही, तर त्यांच्या कुटुंबाचे आणि समाजाच्या सहकार्याचे प्रतीक आहे. ज्या भागात शिक्षणाच्या संधी कमी असतात, तिथून मिळणारे असे यश संपूर्ण समाजाला नवी उमेद देऊन जाते.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा ही संयमाची आणि बुद्धीची मोठी कसोटी असते. लाखो उमेदवारांमधून अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी सखोल अभ्यास आणि मानसिक खंबीरपणा लागतो. जे विद्यार्थी आपल्या ध्येयाशी ठाम राहतात, तेच अखेरीस या परीक्षेत बाजी मारतात.
यंदा यशस्वी झालेले ५३ मुस्लिम उमेदवार देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत. यात मोठ्या शहरांमधील मुलांसोबतच लहान गावांतील तरुणही आहेत. कष्टाच्या आणि शिक्षणाच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते, हाच धडा त्यांच्या या प्रवासातून मिळतो.
गुणवत्ता यादीत काही मुस्लिम उमेदवारांनी पहिल्या काही क्रमांकात स्थान मिळवले आहे. ए. आर. रजाह मोहईदीन (रँक ७), इफरा शम्स अन्सारी (रँक २४) आणि नबिया परवेझ (रँक २९) यांनी आपली चमक दाखवली आहे. या निकालातून एक चांगली गोष्ट समोर आली ती म्हणजे मुस्लिम मुलींची मोठी झेप. इफरा आणि नबिया यांच्या कामगिरीने हे दाखवून दिले की, आता मुलीही खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते, या जुन्या समजुतीला आता या निकालाने मूठमाती दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा एखादा सामान्य घरातील तरुण या पदावर पोहोचतो, तेव्हा तो आपल्या परिसरातील हजारो मुलांसाठी आदर्श ठरतो. मेवातसारख्या भागात तर या यशाचे मोठे परिणाम होतील. तिथल्या तरुणांना आता विश्वास वाटू लागला आहे की, लेखणी आणि पुस्तकच त्यांचे आयुष्य बदलू शकते.
यूपीएससी २०२५ चा हा निकाल शैक्षणिक जागृतीचा पुरावा आहे. सामाजिक संस्था, शिक्षक आणि पालकांनी जर अशाच प्रकारे साथ दिली, तर भविष्यात प्रशासनात अशा गुणवंतांची संख्या नक्कीच वाढेल. योग्य संधी आणि दिशा मिळाली तर देशाचा कोणताही तरुण नाव कमावू शकतो.
या तरुणांच्या यशामुळे देशभरातील हजारो नवीन विद्यार्थी प्रेरित होतील आणि नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहतील, अशी अपेक्षा आहे. शेवटी पुस्तक आणि लेखणी हीच ती शक्ती आहे जी कोणत्याही समाजाला पुढे नेते. जेव्हा तरुण हा मार्ग निवडतात, तेव्हा यश केवळ त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी मोलाचे ठरते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -