दुर्धर आजाराशी लढा देत महीनुलने गाठले यशोशिखर!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
महीनुल इस्लाम मजूमदार
महीनुल इस्लाम मजूमदार

 

सतानंद भट्टाचार्जी

प्रबळ इच्छाशक्ती आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर शारीरिक व्यंग कधीच अडथळा बनू शकत नाही. दक्षिण आसाममधील बराक खोऱ्यातील हैलाकांडी जिल्ह्यात राहणाऱ्या महीनुल इस्लाम मजूमदार याने हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच लागलेल्या आसाम माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एचएसएलसी) २०२६ च्या दहावीच्या परीक्षेत महीनुलने अत्यंत शानदार यश मिळवले आहे.

हैलाकांडी शहराजवळील नारायणपूर पार्ट-४ या गावात तो राहतो. त्याने शहरातील 'स्पॅरो सीनियर सेकंडरी स्कूल'मधून ही परीक्षा दिली होती. महीनुलची शारीरिक अवस्था अत्यंत नाजूक आहे. तो कोणाच्या आधाराशिवाय उभाही राहू शकत नाही. मग चालणे तर खूप दूरची गोष्ट आहे.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रायसायकल हाच त्याचा एकमेव आधार आहे. त्याच्या पायांमध्ये अजिबात त्राण नाही. आता त्याच्या हातांची ताकदही हळूहळू कमी होत चालली आहे. महीनुल सध्या 'स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी' (एसएमए) या एका अत्यंत गंभीर आजाराशी लढा देत आहे. हा एक अनुवांशिक आजार आहे. स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या पाठीच्या कण्यातील पेशी या आजारात नष्ट होतात.

यामुळे शरीरातील स्नायू खूप कमकुवत होतात आणि ते सुकून जातात. पण महीनुलने आपल्या या लाचारीला एक मोठे आव्हान म्हणून स्वीकारले. अफाट इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने आपले शिक्षण सुरूच ठेवले.

एक अत्यंत कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, केवळ सहा गुण कमी पडल्याने त्याचा 'फर्स्ट क्लास' थोडक्यात हुकला. पण कॉम्प्युटर सायन्ससारख्या अवघड विषयात त्याने तब्बल ८८ गुण मिळवून सर्वांना थक्क केले आहे. भविष्यात याहूनही अधिक चांगले यश मिळवण्याचे त्याचे मोठे ध्येय आहे.

पुढील शिक्षणासाठी त्याने हैलाकांडीतील एका खाजगी शाळेत कला शाखेत प्रवेश घेतला आहे. भविष्यात प्रशासकीय सेवेत (आयएएस किंवा आयपीएस) रुजू होऊन देश आणि समाजाची सेवा करण्याचे महीनुलचे मोठे स्वप्न आहे.

या यशाबद्दल महीनुलने आपले आई-वडील, शिक्षक आणि सर्व संस्थांचे मनापासून आभार मानले आहेत. या अत्यंत खडतर प्रवासात या सर्वांनी त्याला मोठी साथ दिली. महीनुलचे वडील अब्दुल मुनीम मजूमदार एका शाळेत शिक्षक आहेत. तर त्याची आई शाहनाझ बेगम मजूमदार या गृहिणी आहेत.

मुलाच्या या यशाने त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. शारीरिक मर्यादा असूनही आपल्या मुलाच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची एक मोठी तळमळ होती. याच जिद्दीमुळे त्याला अभ्यासात चांगली कामगिरी करता आली, अशी भावना अब्दुल मुनीम यांनी व्यक्त केली.

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या 'सक्षम' या संस्थेच्या हैलाकांडी शाखेचे अधिकारी शंकर चौधरी आणि गोविंद चंद्र नाथ यांनी नुकतीच महीनुलच्या घरी भेट दिली. तिथे त्यांनी महीनुल आणि त्याच्या वडिलांचा विशेष सत्कार केला.

"गुणांच्या आकड्यावरून कदाचित हे यश खूप मोठे वाटणार नाही. पण महीनुलने अत्यंत बिकट शारीरिक अवस्थेतही आपले शिक्षण सुरू ठेवले. त्याची ही जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे," असे शंकर चौधरी म्हणाले. महीनुलचा हा संघर्ष इतर मुलांसाठी नक्कीच एक मोठी प्रेरणा ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter