अमीना माजिद
भारताचा पॅरा-पॉवरलिफ्टिंगपटू गुलफाम अहमद याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावली आहे. जपानमधल्या क्योटो शहरात नुकत्याच पार पडलेल्या '२०२६ चॅलेंज कप क्योटो' स्पर्धेत त्याने सुवर्णभरारी घेतली. या स्पर्धेतील ६५ किलो वजनी गटात तब्बल १५५ किलो वजन लीलया पेलत त्याने पहिलं स्थान पटकावलं.
३० आणि ३१ मे २०२६ या काळात रंगलेल्या या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गुलफामने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे भारतीय पॅरा-क्रीडा क्षेत्रात आनंदाची लाट उसळली आहे. सध्या संपूर्ण पॅरा-स्पोर्ट्स वर्तुळात त्याच्या या सुवर्णवेधाची जोरदार चर्चा रंगली आहे.
मुळात दिल्लीतल्या भजनपुरा इथला राहणारा गुलफाम गेल्या अनेक वर्षांपासून पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. अत्यंत तुटपुंजी साधनं आणि वाट्याला आलेला मोठा वैयक्तिक संघर्ष यावर मात करत त्याने स्वतःचं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. म्हणूनच, आज तो अनेक नवोदित खेळाडूंसाठी एक भक्कम प्रेरणास्थान बनला आहे.
क्योटोमध्ये झालेल्या या स्पर्धेत गुलफामचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने पाहाण्यासारखा होता. सुरुवातीपासूनच या स्पर्धेतील एक प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. अत्यंत निर्णायक अशा क्षणी १५५ किलोचं आव्हान यशस्वीपणे पार करत त्याने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा तिरंगा डौलाने फडकवण्याची गुलफामची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी, जून २०२५ मध्ये चीनची राजधानी बीजिंग इथं झालेल्या पॅरा-पॉवरलिफ्टिंग विश्वचषक स्पर्धेतही त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवत देशाचं नाव उज्वल केलं होतं. खऱ्या अर्थाने त्याच कामगिरीने त्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली होती. आता जपानमध्ये जिंकलेलं हे सुवर्णपदक त्याच्या क्रीडा प्रवासातला आणखी एक सुवर्णक्षण ठरलं आहे.
राष्ट्रीय पातळीवरही गुलफामची कामगिरी सातत्याने चमकदार राहिली आहे. आजवर त्याने तब्बल दहा राष्ट्रीय पदकं आपल्या नावे केली आहेत. त्यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. त्याच्या याच सातत्यपूर्ण आणि धडाकेबाज कामगिरीमुळे तो आज भारताच्या आघाडीच्या पॅरा-पॉवरलिफ्टर्सपैकी एक मानला जातो.
गुलफामच्या यशाचा आलेख इथंच थांबत नाही. दिल्लीत पार पडलेल्या पहिल्या 'खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२३' मध्ये त्याने कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर, 'खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२५' मध्ये तर त्याने थेट सुवर्णपदकालाच गवसणी घातली. या लागोपाठच्या यशाने त्याला भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टिंगचा एक आश्वासक आणि भक्कम चेहरा बनवलं आहे.
पण, मैदानावरील या लखलखत्या यशामागे एका खडतर संघर्षाची किनार दडलेली आहे. गुलफामच्या आयुष्यात असे अनेक कसोटीचे क्षण आले, ज्यांनी त्याला आतून हादरवून टाकलं. २०२१ मध्ये त्याच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं. या दुःखाच्या सावटातून तो पुरता सावरत नाही तोच, २०२४ मध्ये कॅन्सरसारख्या आजाराने त्याच्या वडिलांनाही त्याच्याकडून हिरावून घेतलं.
इतक्या कमी अंतराने आई-वडील दोघांनाही गमावणं, हा कुणासाठीही मोठा आघात असतो. मात्र, गुलफाम अशा परिस्थितीतही खचून गेला नाही. त्याने आपल्या दुःखालाच आपली ढाल आणि ताकद बनवलं, आणि स्वतःला पूर्णपणे खेळाच्या हवाली केलं. त्याच्या याच दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आज तो आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचं प्रतिनिधित्व करत असून यशाची नवनवी शिखरं सर करत आहे.

जपानमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर गुलफामने आपल्या भावना अतिशय बोलक्या शब्दांत व्यक्त केल्या. हा विजय आपल्यासाठी खास असल्याचं सांगत, त्याने हे घाम गाळून मिळवलेलं यश आपल्या दिवंगत आई-वडिलांना समर्पित केलं. "आयुष्यातल्या सर्वात अंधाऱ्या आणि कठीण काळातही मी माझी स्वप्नं मरू दिली नाहीत, मी फक्त चालत राहिलो," अशी प्रांजळ भावना त्याने व्यक्त केली.
आपल्या भविष्यातील वाटचालीविषयी बोलताना गुलफामने आपले मनसुबे स्पष्ट केले. आता आगामी एशियन पॅरा गेम्सवर त्याने आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. तिथं पदक जिंकून भारताचा गौरव वाढवणं, हे आता त्याचं प्रमुख ध्येय आहे. यासोबतच, त्याला पॅरालिम्पिक खेळांची पात्रता फेरीही ओलांडायची आहे. पॅरालिम्पिकच्या जागतिक मंचावर भारताचा तिरंगा फडकवत देशासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे.
आपल्या या प्रवासात अनेक हातांचा मोठा वाटा असल्याचं गुलफाम कृतज्ञतापूर्वक नमूद करतो. विशेषतः आपले प्रशिक्षक राजिंदर सिंग रहलू यांचे त्याने मनापासून आभार मानले आहेत. "कठीण काळात सरांनी मार्गदर्शन केलं. नेहमीच सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी माझ्या पाठीवर विश्वासाची थाप दिली," असं तो आवर्जून सांगतो.
त्याचबरोबर, त्याने इंडिया पॅरा-पॉवरलिफ्टिंग फेडरेशनचे अध्यक्ष जेपी सिंग यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त केली. जेपी सिंग साहेबांनी नेहमीच खेळाडूंचं खच्चीकरण होऊ न देता त्यांचं मनोबल वाढवलं आणि प्रगतीसाठी नव्या संधी उपलब्ध करून दिल्या, असं तो म्हणतो.
याशिवाय, फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन आर्य यांच्या बहुमोलाच्या सहकार्याचाही गुलफामने विशेष उल्लेख केला. खेळाडूंना जेव्हा प्रशासनाकडून आणि तांत्रिक आघाडीवर असा भक्कम पाठिंबा मिळतो, तेव्हा त्याचा थेट सकारात्मक परिणाम त्यांच्या कामगिरीवर होतो, असं स्पष्ट मत त्याने मांडलं.
उत्तम दर्जाचं क्रीडा साहित्य आणि पोशाख उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याने शिव नरेश यांचे आभार मानले आहेत. तसंच, एडीपी (ADP) आणि एचसीएल (HCL) फाउंडेशनने केलेल्या मदतीचाही त्याने आदरपूर्वक उल्लेख केला. त्यांच्याकडून मिळालेल्या योग्य पोषणविषयक मार्गदर्शनामुळेच त्याला आपला फिटनेस कायम राखता आला.
दिल्ली पॅरा स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव गौरव आणि सुरतचे विवेक भाई यांचं नाव घेतल्याशिवाय तो राहिला नाही. या सर्व मंडळींचा विश्वास आणि त्यांनी दिलेला भावनिक पाठिंबा हेच आपल्या प्रवासातलं खऱ्या अर्थानं इंधन ठरल्याची कृतज्ञता गुलफाम व्यक्त करतो.
गुलफाम अहमदचा हा प्रवास म्हणजे जिद्द, संयम, अपार मेहनत आणि स्वतःवरच्या अढळ विश्वासाची गाथा आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी इरादे पोलादी असतील तर यशाचे दरवाजे नक्कीच उघडतात, हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं आहे.
जपानमध्ये मिळवलेलं हे सुवर्णपदक हे भारतीय पॅरा-क्रीडा क्षेत्राच्या वाढत्या ताकदीचं आणि दबदब्याचं प्रतीक आहे. आगामी काळात एशियन पॅरा गेम्स आणि पॅरालिम्पिकसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांमध्ये गुलफाम अहमद भारतासाठी असेच नवनवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी आशा आता संपूर्ण क्रीडा विश्वाला लागून राहिली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -