आशा खोसा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतातील पहिले मुस्लिम योग तज्ज्ञ डॉ. बदरुल इस्लाम कैरानवी यांनी सध्याच्या वाढत्या अप्रवृत्तीविरुद्ध सर्वांना सावध केलं आहे. अपुरे शिक्षण घेतलेले 'योग प्रशिक्षक' या प्राचीन आणि आरोग्यदायी पद्धतीला बगल देत त्याला निव्वळ व्यायामांचा ग्रुप करून ठेवत आहेत. 'आवाज-द व्हॉइस'शी बोलताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आजकाल लोक योगाला फक्त व्यायाम असल्यासारख्या दृष्टीकोनातून बघतात आणि हे बघून त्यांना खूप दुःख होतं. “योग ही मुळात 'साधना' आहे. इतरांना या प्रवासात मार्गदर्शन करण्याआधी प्रशिक्षकांनी स्वतःवर किमान तीन ते चार वर्षं काम करायला हवं. बरेच लोक एखाद्या संस्थेतून कसंतरी महिनाभर योगासनं शिकतात आणि हातात प्रमाणपत्र घेऊन थेट प्रशिक्षक बनतात, असं मी स्वतः बघितलं आहे. ही समाजाची खूप मोठी फसवणूक आहे," असं ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय योग दिनातील सहभाग आणि योगाचं भविष्य
कैराना गावात जन्मलेले हे योगसाधक आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिल्लीतल्या अनेक ठिकाणी योग सत्रांचं नेतृत्व करत आहेत. यात दिल्ली हज समितीचे कार्यालय, भारत स्काऊट्स आणि गाईड्स, जामिया मिलिया इस्लामिया आणि ऑल इंडिया युनानी तिब्बी काँग्रेस (AIUTC) या ठिकाणांचा समावेश आहे. या सगळ्यासोबतच त्यांनी सकारात्मक बाजूही समोर ठेवली. “जगभरात योगाला मिळत असलेली मान्यता आणि लोकप्रियता खूप उत्साह वाढवणारी आहे. योगाचं भविष्य खूप उज्ज्वल आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संशोधन आणि साहित्य
डॉ. कैरानवी हे युनानी डॉक्टर सुद्धा आहेत. ते भारत सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होते आणि आता तिथून निवृत्त झाले आहेत. त्यांनी उर्दू भाषेत "योग - द सोर्स ऑफ नॅचरल थेरपी" हे वैद्यकीय पुस्तक लिहिलं आहे. सोबतच त्यांनी "द सोर्स ऑफ नॅचरल हेल्थ" ही त्याची सुधारित आवृत्तीही प्रकाशित केली आहे. संशोधनावर लक्ष केंद्रित करत डॉ. कैरानवी यांनी खास योगासनाचं प्रात्यक्षिक दाखवलं आहे. या आसनाच्या मदतीने साधक ऑक्सिजन घेण्याची फुफ्फुसांची क्षमता दुप्पट करू शकतो. वाढत्या वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मानवी शरीराला याचा मोठा उपयोग होईल. डॉ. कैरानवी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कोलकात्यात पार पडलेल्या एआययूटीसीच्या डिसेंबर महिन्यातील परिषदेत या आसनाचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं आणि त्याचे परिणाम तपासून पाहिले होते.
शरीर आणि मनाच्या तंदुरुस्तीसाठी असलेल्या या प्राचीन भारतीय पद्धतीच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल आणि जागतिक ओळखीबद्दल त्यांना पूर्ण खात्री वाटते. प्रत्येक भारतीयाने योगाचा सराव करावा, असं त्यांना वाटतं. मानवी शरीर आणि मनाची तंदुरुस्ती खूप महत्त्वाची असल्याचं ते नेहमी सांगतात. “२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी ही तंदुरुस्तीच सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरेल. योगाची व्याप्ती खूपच मोठी आहे. शरीरातील प्रत्येक अवयव आणि स्नायू बळकट करण्यासाठी योग एकदम योग्य व्यायाम आहे.” असं ते सांगतात. योगाचा प्रसार करण्यासाची एकही संधी ते सोडत नाहीत.
सामाजिक संघर्ष आणि मुस्लिम समाजात योगाचा प्रसार
डॉ. कैरानवी यांनी सरकारी संस्थांमध्ये तब्बल ४५ वर्षं योगाचे धडे दिले आहेत आणि या विषयावर पुस्तकंही लिहिली आहेत. मागे वळून पाहताना त्यांना नेहमी त्यांचे जुने दिवस आठवतात. ते योगसाधना करतात या कारणावरून नमाज पडताना मश्जिदीत मुस्लिमांकडून त्यांना दूर लोटलं जायचं. पश्चिम उत्तर प्रदेशातील कैराना गावचे रहिवासी असलेले आणि सध्या दिल्लीत राहणारे योगगुरू इस्लाम सांगतात, "शरीर आणि मनाच्या या प्राचीन भारतीय विज्ञानाचा जगभरात स्वीकार होताना बघणं, ही मोठी छान भावना आहे."

योग शिकल्यामुळे मुस्लिमांकडून वाळीत टाकलं जाण्यापासून आणि इतरांकडून दुर्लक्षित होण्यापासून ते आतापर्यंत डॉ. कैरानवी यांनी मोठा पल्ला गाठला आहे. आज त्यांना सामान्य लोकांना आणि धार्मिक पदांवर असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी मुस्लिम धार्मिक संस्था आणि प्रार्थनास्थळांकडून बोलावलं जातं. आतापर्यंत ३५ लाख मुस्लिम तरुण, इमाम आणि मौलवींना योगासनांचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांनी ६५ मदरशांमध्ये आणि इस्लामिक धार्मिक संस्थांमध्ये योग कार्यशाळा घेतल्या आहेत. २०१७ मध्ये त्यांनी दिल्ली मशिदीच्या सर्व इमामांना योगासनांचं प्रशिक्षण दिलं होतं.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात योगावरील मोठी कार्यशाळा घेतली. यात वसतिगृहातील विद्यार्थी, कर्मचारी आणि अन्य विद्यार्थ्यांचा सहभाग होता. डॉ. इस्लाम यांनी 'आवाज-द व्हॉइस'ला सांगितल, "आंतरराष्ट्रीय योग दिनाची वेळ येईपर्यंत तरुणांची ही आवड 'जुनून'बनली होती. आम्हाला दररोज योग करायचा आहे, असं त्यांनी मला सांगितलं."
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि प्रशासकीय योगदान
डॉ. कैरानवी यांच्या कामांमध्ये "इस्लामीकृत योगा"ला प्रोत्साहन देणं आणि इजिप्त, बांगलादेश तसेच भारतातील विविध राज्यांमधील गटांना प्रशिक्षण देणं यांचा समावेश आहे. त्यांनी आरोग्य मंत्रालयातही काम केलं आहे आणि कार्यशाळा, शिबिरे व प्रशिक्षण अभ्यासक्रमांसह योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. नवी दिल्लीतील 'डॉ. बीआयके योग फिजिकल मेडिसिन सेंटर फॉर हेल्थ अँड हॅपिनेस' आणि 'योग टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'चे ते संस्थापक आहेत. भारत सरकारसोबत काम करणारे योग व्यावसायिक म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. शाळांमधील योगाचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाची रूपरेषा तयार करण्याचं काम त्यांनी केलं आहे.