Commonwealth Games : ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा डंका; चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
ग्लासगो राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये पदक मिळवणारे भारतीय खेळाडू
ग्लासगो राष्ट्रकुल खेळ २०२६ मध्ये पदक मिळवणारे भारतीय खेळाडू

 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय ॲथलीट्सची शानदार कामगिरी सातत्याने सुरू आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय पथकाने आपल्या पदकांची संख्या ४ वरून थेट १० वर पोहोचवली. या खेळांमध्ये १२२ भारतीय खेळाडू पदकाच्या शर्यतीत आपले आव्हान सादर करत आहेत. 

सध्या भारत पदक तालिकेत २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्यपदके जिंकून ८ व्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया २६ सुवर्णपदकांसह तालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारोत्तोलन आणि पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. महिलांच्या गोळाफेक एफ५७ प्रकारात शर्मिला ढांकडने सर्वोत्तम कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. याच प्रकारात भारताच्या शिल्पा के सायला हिने कांस्यपदक आपल्या नावावर केले. पुरुषांच्या उंच उडीत सर्वेश अनिल कुशारेने उत्कृष्ट कामगिरी करत भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली.

ff

भारोत्तोलनात भारतीय खेळाडूंचा बोलबाला
भारोत्तोलनात भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा निराशा केली नाही. पुरुषांच्या ७९ किलो वजनी गटात वल्लुरी अजय बाबूने शानदार कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादवने देशासाठी रौप्यपदक मिळवले. महिलांच्या ५८ किलो वजनी गटात बिंदयारानी देवीने कड्या लढतीनंतर कांस्यपदकावर कब्जा केला.

यापूर्वी मीराबाई चानूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून राष्ट्रकुल खेळांमध्ये विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण केली होती. पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात ऋषिकांत सिंहने नव्या विक्रमासह रौप्यपदक मिळवले होते. मुथुपंडी राजाने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमारने पुरुषांच्या हेवीवेट गटात कांस्य जिंकून भारताचे खाते उघडले होते.
बॉक्सिंग आणि ॲथलेटिक्समध्ये मिश्र निकाल
शर्मिलाने राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक एफ५७ प्रकारात ९.८१ मीटरच्या आपल्या या हंगामातील सर्वोत्तम फेकीसह सुवर्णपदक जिंकले! या शानदार कामगिरीसह तिने पॅरा ॲथलेटिक्समधील पदकासाठी भारताची २० वर्षांची प्रतीक्षा संपवली. पॅरा ॲथलेटिक्समध्ये देशाची पहिली राष्ट्रकुल खेळ सुवर्णपदक विजेती होण्याचा मान तिने मिळवला. ट्रॅक आणि फील्ड प्रकारांमध्ये भारतासाठी चौथा दिवस मिश्र स्वरूपाचा राहिला. पुरुषांच्या लांब उडीत मुरली श्रीशंकरने ८.०१ मीटरची उडी मारून अंतिम फेरीत प्रवेश केला.

त्याच्यासोबत लोकेश सत्यानाथनदेखील ७.७७ मीटर उडी मारून अंतिम फेरीत पोहोचला. अडथळा शर्यतीत तेजस शिरसे पुरुषांच्या ११० मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र अंतिम फेरीत तो शेवटच्या स्थानावर राहिला.

पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत गुरिंदरवीर सिंह बाहेर पडला. त्याने १०.३९ सेकंदाची वेळ नोंदवली, जी उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पुरेशी नव्हती. बॉक्सिंगच्या रिंगणात भारतीय मुक्केबाजांचे वर्चस्व दिसले. ६० किलो वजनी गटात सचिन सिवाचने इंग्लंडच्या विल्यम हेविटला हरवले. ८० किलो गटात अंकुशने आणि ५१ किलो गटात साक्षी चौधरीने आपापले सामने जिंकून पुढच्या फेरीत जागा मिळवली.
पोहणे आणि इतर खेळांची स्थिती
पॅरा स्विमिंगमध्ये स्वातिक पाटीलने पुरुषांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी९ च्या अंतिम फेरीत जागा मिळवली आणि अंतिम फेरीत पाचवे स्थान पटकावले. अनुभवी जलतरणपटू साजन प्रकाश २०० मीटर बटरफ्लायच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण अंतिम लढतीत आठव्या स्थानावर राहिला. आर्यन नेहरा ८०० मीटर फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत सातव्या स्थानावर राहिला.

लव्हलिना बोरगोहेनला महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत बाय मिळाल्यामुळे तिचे पदक आधीच पक्के झाले आहे. आता तिची नजर आपल्या पदकाचा रंग बदलून सुवर्ण करण्यावर असेल. ॲथलेटिक्समध्ये नीरज चोप्राच्या नेतृत्वाखालील भारतीय पथकाकडून येत्या दिवसांत आणखी पदकांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

f

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्ण इतिहास
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली राहिला आहे. १९३४ मध्ये पहिल्यांदा सहभागी झाल्यानंतर भारताने आतापर्यंत ५६४ पदके जिंकली आहेत. सर्वाधिक पदके जिंकण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. पिस्तूल नेमबाज जसपाल राणा १५ पदकांसह भारताचा सर्वात यशस्वी राष्ट्रकुल खेळाडू ठरला आहे.

भारताची सर्वात उत्कृष्ट कामगिरी २०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत झाली होती. तेव्हा भारताने ३९ सुवर्णपदकांसह एकूण १०१ पदके जिंकून तालिकेत दुसरे स्थान मिळवले होते. २०२२ च्या बर्मिंघम स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली होती. या वेळी ग्लासगोमध्ये अनेक प्रमुख खेळ वगळले गेले असले तरी भारतीय ॲथलीट्स आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter