वॉशिंग्टन
अमेरिकेच्या एका प्रमुख नॉन-प्रॉफिट थिंक टँकच्या अहवालानुसार, भारताकडे सध्या अंदाजे १९० अण्वस्त्रे (nuclear warheads) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये उत्पादनाधीन असलेल्या नवीन क्षमतेच्या क्षेपणास्त्रांसाठी असलेल्या ३० अतिरिक्त वॉहेड्सचाही समावेश आहे.
'फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स' (FAS) या संस्थेने ओपन सोर्स डेटा, सरकारी माहिती आणि कमर्शियल सॅटेलाइट इमेजच्या आधारे हा अंदाज जाहीर केला आहे. FAS चे न्यूक्लियर इन्फॉर्मेशन प्रोजेक्ट डायरेक्टर हान्स क्रिस्टेनसन यांनी 'इंडियाज न्यूक्लियर वेपन्स - २०२६' या शीर्षकाखाली हा लेख लिहिला आहे.
भारताने आपल्या अण्वस्त्र साठ्याचे आधुनिकीकरण सुरू ठेवले असून, गेल्या काही वर्षांत अनेक नवीन शस्त्रप्रणाली जोडण्यात आल्या आहेत. भूमी, समुद्र आणि हवेतून मारा करणाऱ्या क्षमतेचे आधुनिकीकरण केले जात आहे. अहवालानुसार, भारताने १४० ते २२५ अण्वस्त्रे बनवता येईल एवढा लष्करी प्लुटोनियमचा साठा उत्पादित केला असावा, ज्यातून सुमारे १९० अण्वस्त्रे जोडली गेली आहेत.
१९९८ मधील पोखरण-२ चाचणीनंतर भारताने प्रथम अण्वस्त्र वापरणार नाही (No-First-Use) हे धोरण स्वीकारले होते आणि देश आजही या धोरणाशी कटिबद्ध आहे. संसदेत नुकत्याच देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारत किमान विश्वासू प्रतिबंधक क्षमता राखण्यासाठी आणि प्रथम अण्वस्त्र न वापरण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. भारताचे हे धोरण प्रादेशिक स्थिरतेला महत्त्व देणारे मानले जाते