नवरात्रीत गरब्यात मुस्लिम व्यक्तींच्या सहभागावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 42 m ago
अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

 

नागपूर 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी नवरात्रोत्सवादरम्यान सणांच्या सर्वसमावेशक स्वरूपावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. नवरात्रीत गरबा आणि दांडिया महोत्सवात मुस्लिम व्यक्तींनी प्रवेश करण्याबाबतच्या विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) भूमिकेवर आणि मंत्री नितेश राणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, सण हे सर्वांना सामावून घेणारे असतात आणि त्यात कोणतीही चुकीची गोष्ट नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विश्व हिंदू परिषदेने नुकतीच घोषणा केली होती की, नवरात्रीदरम्यान राज्यावरातील गरबा आणि दांडिया आयोजनाच्या ठिकाणी मुस्लिम व्यक्तींना प्रवेश दिला जाऊ नये. यावर मंत्री नितेश राणे यांनीही पाठिंबा देत अशा महोत्सवांमध्ये 'लव जिहाद'च्या घटना वाढतात असा आरोप केला होता. या संपूर्ण वादावर बोलताना अमृता फडणवीस पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, सण हे सर्वसमावेशक असावेत. जर एखादी मुस्लिम व्यक्ती तिथे येत असेल आणि सणाचा आनंद घेत असेल, तर मला त्यात काहीही गैर वाटत नाही. एका नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून, गरबा किंवा नवरात्री हे अतिशय सुंदर सण असून यात जात आणि धर्माच्या आधारावर भेद केला जाऊ नये, असे त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक ओळख आणि दीर्घकालीन उपाय

आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, जर आपल्याला आपला धर्म आणि संस्कृती जगभरात पोहोचवायची असेल, तर तिची सुसंस्कृत ओळख जगासमोर आणणे गरजेचे आहे. 'लव जिहाद'च्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, जर हा विषय असेल तर तो विचार करण्यासारखा आहे आणि त्यासाठी कायदे असायला हवेत. परंतु, यावर दीर्घकालीन उपाय म्हणून आपल्या मुलांना आणि मुलींना आपल्या संस्कृतीची योग्य ओळख करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणालाही त्यांची दिशाभूल करता येणार नाही. विश्व हिंदू परिषदेने यापूर्वी नवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी ओळखपत्र तपासणीचे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.



Latest News