नवी दिल्ली
देशातील रेल्वे जाळे अधिक बळकट करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने २० हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या आठ मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून, यामुळे मजबूत कनेक्टिव्हिटी, जलद प्रवासी वाहतूक आणि कमी झालेला लॉजिस्टिक्स खर्च सुनिश्चित होईल, असे म्हटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या चार राज्यांमधील १७ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या ५ मल्टिट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे भारतीय रेल्वेच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये सुमारे ५४० किलोमीटरची भर पडणार असून, या प्रकल्पांची अंदाजे किंमत १० हजार २०२ कोटी रुपये आहे आणि हे प्रकल्प २०२९-३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील १४ जिल्ह्यांमध्ये ६५६ किलोमीटर रेल्वे मार्ग वाढवणाऱ्या इतर ३ मल्टिट्रॅकिंग प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली आहे, ज्यांची किंमत १० हजार ७८३ कोटी रुपये इतकी आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे पाच प्रमुख रेल्वे प्रकल्प दक्षिण भारतात उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतील. यामुळे लाखो प्रवाशांना फायदा होईल, मालवाहतूक क्षमता वाढेल आणि प्रवास अधिक वेगवान होईल. तसेच, पूर्व भारतातील तीन प्रकल्पांमुळे पर्यटन विशेषतः वारसा आणि वन्यजीव पर्यटन वाढीस लागेल आणि लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होण्यास मदत होईल.