BIHAR FLOODS 2026:बिहारमध्ये पुराचा विळखा; १४ जिल्ह्यांतील ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
बिहारमधील १४ जिल्ह्यांत पुराचा विळखा, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित
बिहारमधील १४ जिल्ह्यांत पुराचा विळखा, ४० लाखांहून अधिक नागरिक प्रभावित

 

पाटणा 

बिहारमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले असून, राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४० लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (DMD) माहितीनुसार, ८४ ब्लॉकमधील ५१७ ग्रामपंचायतींमधील सुमारे ४१ लाख ४५ हजार नागरिकांना पुराचा फटका बसला असून, अनेक नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत.

पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय हे जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून, नेपाळच्या पाणलोट क्षेत्रात झालेली मुसळधारवृष्टीही या पूरस्थितीस कारणीभूत ठरली आहे. भागलपूरमधील सुलतानगंज येथे गंगेची पाण्याची पातळी ३६.७८ मीटर नोंदवली गेली असून, तिने २०२१ मधील उच्च पातळीचा विक्रम मोडला आहे. गंगेव्यतिरिक्त गणक, कोसी, बुढी गंडक, पुनपुन, बागमती आणि घाघरा या नद्याही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

प्रशासकीय मदत आणि बचाव कार्य

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. विविध जिल्ह्यांत ७९३ कम्युनिटी किचन चालवले जात असून, १५ मदत छावण्यांमध्ये १३ हजारांहून अधिक नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. स्थलांतर आणि वाहतुकीसाठी १ हजार ८७२ हून अधिक बड्या नावा चालवल्या जात आहेत. तसेच जवळपास २९ हजार ४०० कोरड्या शिधा किट आणि ५ हजार ४६४ क्विंटल पशू खाद्य वाटप करण्यात आले आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत पूरग्रस्त भागातील पीक नुकसानीचे लवकरात लवकर आणि अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मदत आणि बचावासाठी राज्यभरातून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण ३७ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने आगामी दोन दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.



Latest News