नागपुरातील मौलवींनी दिली डीजे विरोधात फतवा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

फझल पठाण  

ईद, दहीहंडी किंवा गणेशोत्सव असो, डीजेचा दणदणाट अन् लेझर लाईट्सचा लखलखाट हा आता सणांचा भागच बनला आहे. पण याच उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण नागरिकांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. 

पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक उत्सवातील डीजेवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर राज्यभरात ही चर्चा पेटली. सणांमधील या आवाजाच्या प्रदूषणाला आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली असतानाच, नागपुरातील मुस्लिम समाजाने या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दर्ग्यावरील संदल, उरूस किंवा ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांमध्ये डिजे वाजवण्यावर मुस्लिम धर्मगुरूंनी थेट फतवा जारी केला आहे.

इस्लामची शिकवण
गेल्या काही वर्षांत ईद-ए-मिलादचे जुलूस आणि दर्ग्यांवरील संदल सोहळ्यात डीजेचा आवाज आणि प्रमाण अतोनात वाढले होते. या आवाजाच्या त्रासामुळे संपूर्ण मुस्लिम समाजातून नाराजी व्यक्त होत होती. या कुप्रथेला आळा घालण्यासाठी अखेर धर्मगुरूंनी पुढाकार घेतला.

अल जामियातूर रझ्विया दारुल उलूम अमजदिया मदरसाचे मुहतमिम मुज्तबा शरीफ खान अशारी मिस्बाही यांनी हा फतवा जारी केला आहे. इस्लाम धर्म कोणत्याही अशा कृतीची परवानगी देत नाही, ज्यामुळे इतरांना त्रास होईल किंवा कोणाच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे या फतव्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुस्लिम समाजातून पाठिंबा
या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. कळमना येथील इदारे शरियाचे संस्थापक मौलाना अतीकुर रहमान सिद्दीकी यांनी डीजेला इस्लाममध्ये स्थान नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, "धार्मिक विद्वानांच्या मार्गदर्शनानुसार तरुणांनी वागायला हवे. स्वतःच्या मर्जीने वागल्यास देशाचा कायदा आणि शरियाचे नियम या दोन्हींचे उल्लंघन होते."

शहरात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांचे आयोजन करणाऱ्या सीरत-उन-नबी कमिटीचे सदस्य शेख तय्यब रिझवी यांनी सांगितले की, "संस्था मिरवणुकीपूर्वी कडक नियमावली जारी करते. डीजे वाजवणाऱ्या गटांशी संस्थेचा काहीही संबंध नसतो अन् अशा उपद्रवाची जबाबदारी कमिटी कधीही घेत नाही."

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे आवाहन
नागपुरातील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना त्यांनी सर्वांना कायद्याचा आणि प्रशासनाचा आदर करण्याचे आवाहन केले.

प्यारे खान म्हणाले की, "ताजुद्दीन बाबांच्या उरूस आणि संदलसाठी येणाऱ्या सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी डीजे आणू नये. आम्ही डीजेला कोणतीही परवानगी देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ध्वनी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. आम्ही कायद्याचा अन् प्रशासनाचा पूर्ण आदर करतो."

पुढे बोलताना त्यांनी राज्यातील सर्व दर्ग्यांना आणि मुस्लिमांना एक महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील सर्व दर्ग्यांना माझी विनंती आहे की त्यांनी संदल किंवा इतर कार्यक्रमांत डीजेला परवानगी देऊ नये. कायदा होतो तेव्हा तो धर्म किंवा जातीशी जोडता कामा नये, तर सर्व धर्मांना तो समान रीतीने लागू झाला पाहिजे. यापूर्वी ईद-ए-मिलादच्या वेळी डीजे वाजवू नये, अशा तक्रारी काही मौलाना आणि मुफ्तींकडून माझ्याकडे आल्या होत्या."

धर्मगुरूंना विनंती करताना ते म्हणाले की, "मी महाराष्ट्रातील सर्व मोठे उलेमा अन् नेत्यांना विनंती करणार आहे की त्यांनी डीजेबंदीसाठी पुढे यावे. याचा त्रास समाजातील सर्वच घटकांना होतो. याआधी सरकारने मस्जीदी, मंदिरे, चर्च आणि गुरुद्वारांवरील भोंग्यांबाबत कायदा आणला होता, तेव्हा सर्वांनी कायद्याचा सन्मान केला अन् कुठेही वाद झाला नाही."

मुस्लिम धार्मिक संस्थांकडून दरवर्षी मोठ्या सणांपूर्वी अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात. यंदा नागपुरातून निघालेला हा संदेश राज्यभरातील सर्व धर्मीय उत्सवांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सण आणि उत्सव हे आनंदासाठी असतात, दुसऱ्याच्या त्रासासाठी नाहीत, हाच मोठा संदेश या फतव्यातून संपूर्ण समाजाला देण्यात आला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter