काठमांडू
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी आणि अचानक आलेल्या पुरामुळे (flash floods) मृतांचा आकडा वाढून बुधवारपर्यंत १ हजार ३६५ वर पोहोचला आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. प्रभावित भागांतून आणखी मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या वाढली आहे. नेपाळ पोलिसांच्या बुलेटिननुसार, बचाव पथके अद्यापही ५ हजार ३२६ लोकांचा शोध घेत आहेत, ज्यामध्ये किमान ५८९ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यातून सर्वाधिक ३६३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर नवलपरासी पूर्वमधून २२६, नवलपरासी पश्चिममधून २२२ आणि नुवाकोटमधून १९७ मृतदेह हाती लागले आहेत. तसेच रसुवामधून १७४, गोरखातून ७५, धाडिंगमधून ७० आणि तनहुूमधून ३८ मृतदेह सापडले आहेत. यातील १०२ मृतदेह सर्व कायदेशीर आणि ओळख प्रक्रियेनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
ओळख पटू शककलेल्या १ हजार ११४७ मृतदेहांचे डीएनए नमुने आणि इतर प्रोटोकॉलनुसार मृतदेह सुरक्षितपणे भूमीगत ठेवण्यात आले आहेत, जेणेकरून भविष्यात त्यांची ओळख पटवणे सोपे होईल. गेल्या २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या बर्फ आणि खडकांच्या प्रचंड हिमस्खलनामुळे (ice-rock avalanche) उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावे उद्ध्वस्त झाली होती. सीमेवरून दक्षिणेकडे वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे घरे, वाहने, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्प वाहून गेले आहेत. चीनच्या बाजूलाही या नैसर्गिक आपत्तीत ४३ जण दगावल्याचे वृत्त आहे.