तेहरान
आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या इराणने मंगळवारी सकाळी पेट्रोलचा अतिरिक्त वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी दरामध्ये मोठी वाढ केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक ताणामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, गेल्या डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ ठरली आहे. इराणमध्ये डिझेल आणि पेट्रोलचे दर जगभरात सर्वात कमी मानले जातात, परंतु वाढत्या महागाई आणि घसरत्या चलनामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन प्रणालीनुसार ज्या नागरिकांचा मासिक पेट्रोलचा कोटा ११ कोटी (११० लीटर) पेक्षा जास्त आहे, त्यांना आता प्रति लीटर १००,०० हजार रियाल म्हणजेच सुमारे ७ सेंट इतका खर्च करावा लागणार आहे. हा दर मागील डिसेंबरपासून सुरू असलेल्या दराच्या दुप्पट आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील पेट्रोलचा वापर विक्रमी १४ कोटी ५० लाख लीटर प्रतिदिन पोहोचला होता, तर देशांतर्गत उत्पादन केवळ १२ कोटी २२ लाख लीटर होते. यामुळे वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी यामुळे देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणमध्ये आधीच वार्षिक महागाई दर सुमारे ६७ टक्के इतका असून, या दरवाढीमुळे अन्नधान्य, मांस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव आणखी वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. २०१४ मधील दरवाढीनंतर देशात हिंसक निदर्शने झाली होती, त्यामुळे सध्या तेहरानमधील पेट्रोल पम्पांवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.