सौदी अरेबियातील हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू, तीन जखमी; भारताकडून तीव्र निषेध

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
सौदी अरेबियातील विमानतळ आणि ऑइल फील्डवर हल्ले
सौदी अरेबियातील विमानतळ आणि ऑइल फील्डवर हल्ले

 

नवी दिल्ली

सौदी अरेबियातील डाम्मम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शायबाह ऑइल फील्डवर झालेल्या क्षेपणास्त्र वा ड्रोन हल्ल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या हिंसक हल्ल्यांचा भारताने गुरुवारी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाची कडक प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डाम्मम विमानतळावरील हल्ल्यात एक भारतीय नागरिक दगावला असून दोन जण जखमी झाले आहेत, तर शायबाह ऑइल फील्डवरील हल्ल्यात आणखी एक भारतीय जखमी झाला आहे. रियाधमधील भारतीय दूतावास स्थानिक सौदी प्रशासनाच्या सतत संपर्कात असून पीडितांच्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

नागरिक आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून होणारे हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असून ते तातडीने थांबले पाहिजेत, अशी ठाम भूमिका भारताने मांडली आहे. तसेच सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारत सरकार आणि तिथल्या जनतेसोबत पूर्णपणे एकता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.