ढाका
बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार नसल्याचे ढाकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी त्यांना कोणतेही स्वतंत्र आमंत्रण मिळाले नाही, तर हे आमंत्रण केवळ 'बिम्सटेक'चे अध्यक्ष म्हणून देण्यात आल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताच्या यजमानतेखाली १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. या परिषदेसाठी सदस्य देशांसह भागीदार आणि आऊटिव्ह रिच आमंत्रितांना बोलावण्यात आले आहे. परराष्ट्र राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, पंतप्रधान रहमान यांना पंतप्रधान म्हणून नव्हे तर सात देशांच्या दक्षिण आणि पूर्व आशियाई 'बिम्सटेक'चे अध्यक्ष म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री कबीर यांनी सांगितले की, बांगलादेशच्या पंतप्रधानांची पहिली परदेश भेट बहुपक्षीय असणार नाही. आम्ही द्विपक्षीय चर्चा आणि संपर्कांना अधिक प्राधान्य देत आहोत. जेव्हा अनुकूल वातावरण असेल आणि परस्पर आदर राखला जाईल, तेव्हा द्विपक्षीय दौरे होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी भारत-बांगलादेश दरम्यानच्या गंगा पाणी वाटप करारावरही भाष्य केले. डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या या ३० वर्षांच्या ऐतिहासिक कराराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जिथे राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो, तिथे बांगलादेश पूर्ण गांभीर्याने आणि कार्यक्षमतेने पावले उचलेल. भारत आणि बांगलादेशमधील व्यापारी संबंधांवर बोलताना त्यांनी द्विपक्षीय चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे नमूद केले.