NEPAL FLOODS: मृतांचा आकडा १३७७ वर पोहोचला; ५ हजारांहून अधिक नागरिकांचा शोध अद्यापही सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 2 h ago
चितवन, नवलपरासी आणि रसुवा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, प्रशासनाकडून शोधमोहीम तीव्र
चितवन, नवलपरासी आणि रसुवा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, प्रशासनाकडून शोधमोहीम तीव्र

 

काठमांडू 

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी आणि अचानक आलेल्या पुरामुळे (flash floods) मृतांचा आकडा वाढून गुरुवारपर्यंत १ हजार ३७७ वर पोहोचला आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली आहे. प्रभावित भागांतून आणखी मृतदेह हाती लागल्याने मृतांची संख्या वाढली आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRRMA) मते, बचाव पथके अद्यापही ५ हजार १३० हून अधिक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यातून सर्वाधिक ३६४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर नवलपरासी पूर्वमधून २२८, नवलपरासी पश्चिममधून २२२ आणि नुवाकोटमधून १९८ मृतदेह हाती लागले आहेत. तसेच रसुवामधून १७८, गोरखातून ७७, धाडिंगमधून ७० आणि तनहुूमधून ३८ मृतदेह सापडले आहेत. याशिवाय काठमांडूमध्ये उपचारादरम्यान दोन पूरग्रस्तांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत १३ हजार ६५६ लोकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.

बचाव कार्य आणि पुराची भीषणता

गेल्या २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या बर्फ आणि खडकांच्या प्रचंड हिमस्खलनामुळे (ice-rock avalanche) उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरे व गावे उद्ध्वस्त झाली होती. सीमेवरून दक्षिणेकडे वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या पुरामुळे घरे, वाहने, रस्ते आणि जलविद्युत प्रकल्प वाहून गेले आहेत. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे. चीनच्या बाजूलाही या नैसर्गिक आपत्तीत ४३ जण दगावल्याचे वृत्त आहे.