हैदराबादमध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकारांसाठी बुध्दिजीवी कार्यकर्त्यांचे चिंतन

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
हैदराबादमध्ये बहुपत्नीत्व आणि तोंडी तलाकविरोधात मुस्लिम महिला आणि विचारवंतांचे चिंतन
हैदराबादमध्ये बहुपत्नीत्व आणि तोंडी तलाकविरोधात मुस्लिम महिला आणि विचारवंतांचे चिंतन

 

भक्ती चाळक

मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व, तोंडी तलाक आणि हलालासारख्या विषम प्रथांविरोधात हैदराबादमध्ये नुकताच ऐतिहासिक जनजागृती मेळावा पार पडला. 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' आणि 'भारतीय मुस्लिम महिला आंदोलन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय उपक्रमात मुस्लिम महिलांपासून ते सामाजिक विचारवंतांपर्यंत सर्वांनीच या कुप्रथांविरोधात थेट शड्डू ठोकला.

जुन्या हैदराबादेत अन्यायाविरुद्ध एल्गार
१ ऑगस्ट रोजी जुन्या हैदराबाद परिसरातील मुस्लिम महिलांना एकत्र आणले गेले. 'हैदराबाद महिला मंडळ' या स्थानिक संघटनेच्या सहकार्याने या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. बहुसंख्य महिला आजही जुनाट विचारांच्या सावटाखाली आयुष्य जगतात. त्यांच्यासमोर त्यांच्याच वैयक्तिक कायद्यातील विषम तरतुदी, पुरुषप्रधान मानसिकता आणि आजच्या काळात त्यांच्यावर होणारा अन्याय या विषयांवर सविस्तर संवाद साधण्यात आला.

या वेळी उपस्थित महिलांनी तोंडी तलाक आणि बहुपत्नीत्वाला जोरदार विरोध दर्शवला. या अन्यायाविरुद्ध स्वतःहून पुढे येत त्यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. या सत्रात डॉ. बेनझीर तांबोळी, नूरजहाँ शफी नियाज आणि झरीना खान यांनी महिलांना बोलते केले. त्यांच्या रोजच्या आयुष्यातील यातना समजून घेत त्यांना हक्कांची जाणीव करून दिली.
 
मुस्लीम समाजातील बहुपत्नीत्व विरोधी जनाधारावर चर्चा करताना 

सुंदरय्या केंद्रात बुद्धिमंतांचे वैचारिक मंथन
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २ ऑगस्टला सुंदरय्या विज्ञान केंद्र येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्रामुख्याने विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्राध्यापक, लेखक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींसाठी होता. या सत्राचे आयोजन हैदराबाद येथील 'दुनियादारी मुस्लिम सुधारणावादी चळवळ'चे पुढाकार घेणारे शेख युसूफ बाबा (स्काय बाबा) यांनी केले होते.

या उपक्रमाला 'कास्टलेस सोसायटी ऑफ इंडिया'चे मोहम्मद वहीद यांनी मोलाचे सहकार्य केले. मोहम्मद वहीद यांच्याच अध्यक्षतेखाली हा संपूर्ण परिसंवाद पार पडला. स्काय बाबा यांनी प्रास्ताविकात या मोहिमेमागची भूमिका मांडताना स्पष्ट केले, "सुधारणांच्या विषयाला जनाधार मिळवून देणे हाच आमचा मुख्य हेतू आहे."

'ब्रेकिंग द सायलेन्स' पुस्तकाचे उलगडले पान
भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या नूरजहाँ शफी नियाज आणि झरीना खान यांनी नुकताच एक व्यापक अभ्यास पूर्ण केला आहे. २५०० मुस्लिम महिलांच्या सहभागातून त्यांनी बहुपत्नीत्वाच्या समस्येवर संशोधन केले. त्या आधारे त्यांनी 'ब्रेकिंग द सायलेन्स' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा संदर्भ देत नूरजहाँ यांनी बहुपत्नीत्वाच्या प्रश्नाने मुस्लिम महिलांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त केले आहे, याबाबत सांगितले.

डॉ. झरीना खान यांनी यातील संख्याशास्त्रीय माहिती मांडली. देशातील बहुसंख्य मुस्लिम महिला बहुपत्नीत्वाच्या विरोधात आहेत आणि संपूर्ण भारतासाठी एकच कुटुंब कायदा (समान नागरी कायदा) असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे आणि हे त्यांनी आकडेवारीसह सिद्ध केले.

जगभरातील इस्लामिक देशांचा दाखला 
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या डॉ. बेनझीर तांबोळी यांनी जगभरातील इस्लामिक देशांमधील कायदेशीर बदलांचे दाखले दिले. ट्युनिशिया, तुर्कस्तान, बांगलादेश आणि अगदी शेजारच्या पाकिस्तानमध्येही मुस्लिम महिलांच्या संरक्षणासाठी कायदे बदलले आहेत. तिथे तोंडी तलाक बंद झालाय. बहुपत्नीत्वावर कडक मर्यादा आल्यात अन् हलालासारखी प्रथा पूर्णतः नष्ट केली गेली आहे.

जगात इतरत्र मुस्लिम समाज पुढे जात असताना भारतात मात्र वैयक्तिक कायद्याच्या नावाखाली महिलांना मध्ययुगीन अन्यायात का ढकलले जात आहे, असा प्रश्न डॉ. तांबोळी यांनी उपस्थित केला.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे नबाब अल्तापहुसेन यांनीही चर्चासत्रात हमीद दलवाई आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले.
 
हैदराबाद येथे मुस्लीम महिलांशी संवाद साधताना जरीना खान, डॉ. बेनझीर तांबोळी,  डॉ. नुरजहान सफिया नियाज, मोहंमद इमाम तेहसीन.

धर्मवादी संघटनांच्या राजकारणाचा पर्दाफाश
परिसंवादात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी सुधारणावादी चळवळींसमोरील आव्हाने स्पष्टपणे मांडली. ते म्हणाले, "मुस्लिम वैयक्तिक कायद्यातील विषम तरतुदींमुळे महिलांवर सातत्याने अन्याय होतोय. इतर इस्लामिक देशांमध्ये ज्या कुप्रथा बंद झाल्या, मात्र त्या इथे टिकवून ठेवल्या जात आहेत."

विरोधी विचारांवर ताशेरे ओढताना तांबोळी म्हणाले, "हिंदुत्ववादी संघटना असोत, मुस्लिम जमातवादी संघटना असोत किंवा सामान्य नागरिक असोत, हे सर्वजण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहतात. आम्ही मूळ इस्लामकडे परत गेलो की सर्व प्रश्न सुटतील, अशी भूमिका घेऊन जमातवादी लोक मूळ प्रश्नाला बगल देतात. दुसरीकडे इतर धर्मांतही अशाच समस्या आहेत, असा युक्तिवाद करत सुधारणा पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो."

सर्वोच्च न्यायालयात द्विभार्या प्रतिबंधक याचिकेचा दणका
हैदराबादमधील या जनप्रबोधनासोबतच कायदेशीर लढाईही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. शमसुद्दीन तांबोळी, जाकिया सोमन, नूरजहाँ शफी नियाज आणि जावेद यांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. मुस्लिमांनाही द्विभार्या प्रतिबंधक कायदा (दोन लग्नांवर बंदी आणणारा कायदा) लागू करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारसह विविध संस्थांना नोटीस बजावली आहे.

देशव्यापी चळवळीचा संकल्प
हैदराबादमधील या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला सर्व स्तरांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. बहुपत्नीत्व आणि तोंडी तलाकविरोधात राबवलेल्या सह्यांच्या मोहिमेत शेकडो महिला आणि पुरुषांनी स्वतःहून सहभाग नोंदवला.

लोकांमध्ये जाऊन थेट संवादाच्या माध्यमातून सुधारणांचा विचार पोहोचवणे, हाच या चळवळीचा मूळ उद्देश आहे. हैदराबाद येथील यशानंतर आता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशाच पद्धतीचे मेळावे आणि परिसंवाद आयोजित करून मुस्लिम महिलांच्या कायदेशीर हक्कांची लढाई अधिक तीव्र करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.

सहभागी संस्थांविषयी...

दुनियादारी मुस्लीम सुधारणावादी चळवळ (तेलंगणा)
'दुनियादारी मुस्लीम सुधारणावादी चळवळ' ही तेलंगणातील विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. मुस्लीम समाजाच्या सामाजिक जीवनात सकारात्मक सुधारणा घडवून आणणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे.

आधुनिक शिक्षण, धार्मिक सलोखा, महिलांचे हक्क आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे. धार्मिक बाबी आणि सार्वजनिक व्यवहार हे दोन स्वतंत्र घटक आहेत. धर्म हा घर किंवा मस्जिदीपुरता मर्यादित असावा अन् सार्वजनिक जीवन हे धर्मनिरपेक्ष व संविधानिक मूल्यांवर आधारित असावे, अशी या संघटनेची ठाम धारणा आहे.

लेखक, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन या चळवळीची उभारणी केली आहे. मदरसा शिक्षणाचा सखोल अभ्यास करून त्यात आधुनिक विषयांचा समावेश करण्यासाठी या संघटनेने विशेष प्रयत्न केले आहेत. समता आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाऱ्या इतर सामाजिक संघटनांशी समन्वय साधत ही चळवळ पुढे जात आहे. प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार शेख युसूफ बाबा (स्काय बाबा) हे या चळवळीचे मुख्य प्रवर्तक आहेत.

हैदराबाद महिला मंडळ (जुना हैदराबाद परिसर)
'हैदराबाद महिला मंडळ' ही जुन्या हैदराबाद परिसरात तळागाळातील महिलांच्या हक्कांसाठी काम करणारी एक अत्यंत सक्रिय आणि संवेदनशील संघटना आहे. मुस्लिम महिलांवरील अन्याय व अत्याचारांचे निवारण करणे हा या मंडळाचा मुख्य कार्यध्यास आहे.

कौटुंबिक वाद आणि व्यक्तिगत जीवनातील समस्या सोडवण्यासाठी ही संस्था मार्गदर्शन, समुपदेशन आणि मदत केंद्र (काउन्सेलिंग सेंटर) चालवते. महिलांचे सबलीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मंडळामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात.

महिलांचे शिक्षण, कौशल्य विकास, मानवाधिकार साक्षरता आणि व्यवसाय मार्गदर्शनासारखे प्रशिक्षण वर्ग ही संस्था यशस्वीपणे चालवते. डॉ. मोहम्मद इमाम तहसीन हे या मंडळाचे अध्यक्ष असून इशरत बेगम, अतिया बेगम, सना सुलताना आणि आयशा बेगम या प्रमुख कार्यकर्त्या म्हणून या चळवळीचे नेतृत्व करत आहेत.

 

भारतीय मुस्लीम महिला आंदोलन
मुस्लीम समाजातील पुरूषप्रधान मानसिकता कमी करून मुस्लीम महिलांना समानाधिकार मिळवून देणारे हे महिलांचे आंदोलन आहे. मुस्लीम महिलांना मुंबई हाजी अली दर्गा प्रवेश, तलाक ए बिद्दत विरोधात, शायराबानो समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. महिलांना काझी बनवण्याचे प्रशिक्षण अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. इस्लामचा उदारमतवाद आणि इस्लामिक फेमिनिझम हे या आंदोलनाचे आधार आहेत.

कुल निर्मूलन संघम अर्थात कास्टलेस सोसायटी ऑफ एंडिया
१९७२ मध्ये स्थापन झालेली कुल निर्मूलन संघम अर्थात कास्टलेस सोसायटी ऑफ एंडिया ही डाॅ. राम मनोहर लोहिया आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीनिर्मूलनाच्या विचारावर आधारित तेलंगणातील संघटना आहे. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचे समर्थन, मार्गदर्शन व मदत करण्यात येते. आतापर्यंत असे हजारो विवाह करून दिले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या प्रचारार्थ संघटना कार्य करते. प्रजासत्ताक दिनी अशा विवाहितांचा मेळावा आयोजित करण्यात येतो. यांच्या प्रयत्नातून तेलंगणातील जनगणनेत No Caste- No Religion हा एक पर्याय देण्यात याचा असा प्रयत्न केला आणि तो तेलंगणा शासनाने मान्य केला आहे. राष्ट्रीय जनगणनेत असा पर्याय देण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुस्लीम सत्यशोधक मंडळ
हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळासाठी मुस्लीम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा किंवा समान नागरी कायदा अस्तित्वात यावा ही प्रमुख मागणी आहे. शहाबानो, शबानाबानो ते शायराबानो प्रकरणात मंडळाने समर्थन दिले आहे. आधुनिक शिक्षण, धर्मनिरपेक्ष एकात्म समाज, भारतीय समाजाचे आधुनिकीकरण, संविधानिक मूल्यांसाठी ही संघटना गेली 56 वर्षे कार्यरत आहे. मुस्लीम महिला मदत केंद्र, मुस्लीम सत्यशोधक पत्रिका, आंतरधर्मीय विवाह, हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रम मंडळामार्फत चालवण्यात येतात.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter