नुकतेच नवी दिल्ली येथे देशातील दिग्गज पत्रकारांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रतिष्ठेचा 'एक्स्चेंज फॉर मीडिया' पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यामध्ये 'आवाज-द-व्हॉईस'च्या काश्मीरमधील धडाडीच्या पत्रकार यास्मीन खान यांना उत्कृष्ट उर्दू पत्रकारितेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना यास्मिन म्हणाल्या, "उर्दू भाषा धोक्यात आहे असे ज्यांना वाटतेय, त्यांना मी सांगू इच्छिते की उर्दू ना कधी धोक्यात होती, ना कधी धोक्यात येणार आहे."
काश्मीरच्या खोऱ्यातून आलेल्या या खणखणीत आवाजाने उर्दू पत्रकारितेच्या भवितव्यावरील सर्व शंका-कुशंकांना एका फटक्यात पूर्णविराम दिला. मन मोकळे करताना यास्मीन यांनी सीमाभागातील पत्रकारितेचे वास्तव सर्वांसमोर मांडले. दिल्ली-मुंबईसारख्या शांत अन् सुविधांनी युक्त शहरांत बसून काम करणे आणि काश्मीरच्या खोऱ्यात प्रत्यक्ष जमिनीवर उतरून बातमीदारी करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.
माझ्यासोबत काश्मीरमधील अनेक पत्रकार आज इथे उपस्थित आहेत. आमची रिपोर्टिंग आव्हाने सामान्य पत्रकारांपेक्षा खूप वेगळी आणि कठीण असतात, असे यास्मीन प्रामाणिकपणे सांगतात.
त्या पुढे म्हणाल्या, "काश्मीरच्या सीमावर्ती भागात दुरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांशी जेव्हा आम्ही संवाद साधतो, तेव्हा ते अतिशय आपुलकीने आणि सहजतेने फक्त उर्दू भाषेतच आमच्याशी बोलतात. लोकांच्या सुख-दुःखाची, त्यांच्या दैनंदिन प्रश्नांची भाषा आजही उर्दूतच आहे. लोक स्वतःहून ज्या भाषेत आपले मन मोकळे करतात, ती भाषा संपणे निव्वळ अशक्य आहे. हाच या भाषेच्या जिवंतपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे."
नकारात्मकतेच्या बाजारात सकारात्मकतेचा शोध
आजघडीला प्रसारमाध्यमांमध्ये चढाओढ सुरू आहे ती फक्त आणि फक्त नकारात्मक बातम्यांची, हिंसेची आणि भीतीची. पण अशा गढूळ वातावरणातही प्रकाशाचा एक किरण शोधण्याचा प्रयत्न यास्मीन खान आणि 'आवाज-द-व्हॉईस' ही संस्था करत आहे.
'आवाज-द-व्हॉईस'बद्दल बोलताना यास्मीन म्हणतात, "मी 'आवाज-द-व्हॉईस' या मीडिया संस्थेचे प्रतिनिधित्व करते. आज चाहुबाजूला इतकी नकारात्मकता पसरली आहे. अशा वेळी देशभरातील चांगल्या, सकारात्मक आणि यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या संस्थेचा कायम प्रयत्न असतो."
टीम 'आवाज-द-व्हॉईस'
आपल्या बातमीदारीचे ध्येय सांगताना त्या म्हणाल्या, "काश्मीरमधून बातमी पाठवताना माझा भर नेहमी तिथल्या सकारात्मक गोष्टींवर असतो. तिथल्या सामान्य लोकांचे प्रश्न, मुस्लिम तरुणांचे यश आणि त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी जगासमोर आणण्याचा माझा प्रयत्न असतो. दुर्दैवाने या चांगल्या गोष्टींना राष्ट्रीय व्यासपीठावर फारशी जागा मिळत नाही. पण हीच दरी मिटवण्याचे काम मी करत आहे."
काश्मीरच्या पत्रकारांचा सन्मान
'एक्स्चेंज फॉर मीडिया' सारख्या प्रतिष्ठित मंचाने आपल्या कामाची दखल घेऊन सन्मानित केल्याबद्दल यास्मीन यांनी मनापासून आभार मानले. हा पुरस्कार फक्त माझा नसून काश्मीरमधील प्रत्येक पत्रकाराच्या संघर्षाचा सन्मान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
उर्दू ही फक्त काही लोकांची किंवा साहित्याची भाषा राहिलेली नसून ती सीमेवरील सामान्य माणसाच्या जगण्याची दिशा आहे. तोपर्यंत उर्दू पत्रकारिता पूर्ण ताकदीने जगणार, फुलणार आणि बहरणार असा ठाम विश्वास यास्मीन खान यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. काश्मीरच्या खोऱ्यातून आलेला हा सकारात्मक आणि आशेचा किरण खऱ्या अर्थाने नव्या पत्रकारितेला दिशा देणारा ठरतोय.