काश्मीरच्या लेकीची कमाल! पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मारली बाजी; हदीया निसार ठरली जम्मू-काश्मीरची 'टॉपर'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 47 m ago
हदीया निसार
हदीया निसार

 

यंदाच्या NEET-UG २०२६ परीक्षेच्या निकालात जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्याने अक्षरशः डंका वाजवला आहे. अनंतनागच्या बून-डायलगाम गावात राहणाऱ्या 'हदीया निसार' या लेकीने थेट जम्मू-काश्मीरमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसरीकडे, झैदान वानी याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. विशेष आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे, राज्यात 'टॉप २०' मध्ये आलेल्या मुलांपैकी तब्बल ८ मुलं ही एकट्या अनंतनाग जिल्ह्याची आहेत!

कोण आहे हदीया आणि काय आहे तिचा रँक?
हदीया निसारने पहिल्याच प्रयत्नात हे उत्तुंग यश मिळवलं आहे. तिने ९९.९९३१ पर्सेंटाईल मिळवून संपूर्ण देशात ९९ वा (AIR 99) रँक मिळवला आहे. पेपरफुटीच्या आरोपांनंतर देशभरात गदारोळ झाला होता आणि ही परीक्षा पुन्हा (Re-test) घेण्यात आली. पुन्हा परीक्षा देण्याचं मोठं दडपण होतं, पण हदीयाने या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांना आपल्या मनावर हावी होऊ दिलं नाही.

हदीयाचा 'सक्सेस मंत्र' - मोबाईलमधून सोशल मीडिया गायब!
हदीयाच्या या यशामागे तिचं एक मोठं सिक्रेट आहे, ते म्हणजे सोशल मीडियापासून घेतलेला सन्यास. ती सांगते, "माझ्या फोनमध्ये कोणतंही सोशल मीडिया ॲप नाही, आणि याचा मला अभ्यासात खूप फायदा झाला."

तिने अभ्यासासाठी काय केलं?
तिने वेळेचं कोणतंही कडक वेळापत्रक बनवून स्वतःला बांधून घेतलं नाही, तर अभ्यासक्रमानुसार नियोजन केलं.उगाच पुस्तकांचे ढिगारे गोळा करण्यापेक्षा जे अभ्यासाचं साहित्य आहे, त्याचाच योग्य वापर करण्यावर तिने भर दिला.विशेष म्हणजे, NEET ची काठिण्यपातळी वाढल्याने तिने चक्क JEE चे जुने पेपर्सही सोडवले, ज्याचा तिला खूप फायदा झाला."टॉपर्सची आंधळेपणाने कॉपी करू नका, स्वतःच्या शिक्षकांवर आणि आई-वडिलांवर विश्वास ठेवा," असा मोलाचा सल्ला ती देते.

झैदान वानी राज्यात दुसरा:
तलोवानी (शानगस) गावच्या झैदान वानी याने ९९.७१ पर्सेंटाईल मिळवून देशात १२४ वा रँक (AIR 124) मिळवला आणि राज्यात दुसरा आला. "हा माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि आनंदाचा क्षण आहे," असं तो सांगतो. जे विद्यार्थी यंदा यशस्वी होऊ शकले नाहीत, त्यांना तो सांगतो की, "NEET म्हणजे आयुष्याचा शेवट नाही. पुन्हा प्रयत्न करा किंवा दुसरे मार्ग शोधा."

सोशल मीडिया डिलीट करा! (इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सल्ला)
याच अनंतनागच्या झारा मुश्ताक या विद्यार्थिनीने ६१० गुण मिळवले आहेत. तिचा सल्ला अगदी सोपा आणि स्पष्ट आहे - "मोबाईलमधून सोशल मीडियाचे सगळे ॲप्स डिलीट मारा आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा." तसेच, गांदरबलच्या अदनान मंजूरने ६४७ गुण मिळवत बाजी मारली आहे. त्याला पुढे जाऊन शास्त्रज्ञ व्हायचं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप:
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं, विशेषतः हदीया आणि झैदानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मुलांची जिद्द आणि आई-वडील व शिक्षकांची साथ यामुळेच हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. तसेच, जे पास होऊ शकले नाहीत, त्यांनी निराश न होता पुन्हा नव्या उमेदीने तयारी करावी, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

देशभरातील २० लाखांहून अधिक मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यातून काश्मीरच्या खोऱ्यातील या मुलांनी मिळवलेलं हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. "मेहनतीला कोणताही शॉर्टकट नसतो," हेच हदीया आणि तिच्यासारख्या इतर पोरांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवलं आहे!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter