भक्ती चाळक
व्यापाराच्या जगात कोट्यवधी रुपयांची कमाई करणारे अनेक उद्योगपती आपण पाहतो. परंतु आपल्या मिळकतीतील बहुतांश हिस्सा समाजातील वंचित घटकांच्या उद्धारासाठी आनंदाने दान करणारा एक दिलदार उद्योगपती भारतात आहे. ते नाव म्हणजे अझीम मोहम्मद प्रेमजी.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या ‘विप्रो’चे ते सर्वेसर्वा. २००१ मध्ये त्यांनी ‘अझीम प्रेमजी फाउंडेशन’ या बिगरसरकारी संस्थेची स्थापना केली. आपल्या अफाट संपत्तीचा मोठा भाग त्यांनी या फाउंडेशनच्या समाजोपयोगी कामांसाठी कायमचा देऊन टाकला. आज विप्रो लिमिटेड कंपनीची ६६ टक्के आर्थिक मालकी याच फाउंडेशनकडे आहे.
शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि देशातील प्रत्येक मुला-मुलीला शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे, हे या फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. याच ध्येयातून आकाराला आला आहे ‘अझीम प्रेमजी स्कॉलरशिप.’ वंचित समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाची वाट सुकर करण्यासाठी हे फाउंडेशन एका भक्कम ढालसारखे उभे ठाकले आहे.
मुलींच्या स्वप्नांना बळ देणारी ‘अझीम प्रेमजी स्कॉलरशिप’
अनेकदा आर्थिक परिस्थितीअभावी हुशार मुलींना १० वी किंवा १२ वीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थिनीला दरवर्षी ३० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. या रकमेचा उपयोग कॉलेजची ट्यूशन फी भरण्यासाठी किंवा शिक्षणाशी संबंधित इतर खर्चासाठी करता येतो. ही शिष्यवृत्ती पहिल्या पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी (२ ते ५ वर्षे) सातत्याने दिली जाते.
शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पात्रता
या योजनेचा लाभ थेट गरजू मुलींपर्यंत पोहोचावा, यासाठी काही सोपे आणि स्पष्ट निकष ठरवण्यात आले आहेत :
१. विद्यार्थिनीने आपली १० वी आणि १२ वीची परीक्षा मान्यताप्राप्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारी शाळा किंवा कॉलेजमधून नियमित विद्यार्थिनी म्हणून उत्तीर्ण केलेली असावी.
२. शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (कालावधी: २ ते ५ वर्षे) अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात नियमित प्रवेश घेतलेला असावा.
३. हा प्रवेश भारतातील कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील सरकारी अथवा अधिकृत व प्रामाणिक खासगी कॉलेज किंवा विद्यापीठात असावा.
‘या’ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुलींसाठी संधी
ही शिष्यवृत्ती देशातील ठराविक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरकारी शाळांमध्ये शिकलेल्या मुलींसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, राजस्थान, सिक्किम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. तसेच केंद्रशासित प्रदेश दिल्ली (NCT) आणि पुदुचेरी यांनाही लाभ घेता येतो.
अर्जाची मुदत आणि वेळापत्रक
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे.
पहिला टप्पा : १० ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६
दुसरा टप्पा : १० जानेवारी २०२७ ते ३१ जानेवारी २०२७
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही मध्यस्थाला किंवा संस्थेला पैसे देण्याची मुळीच गरज नाही. सर्व अर्ज केवळ फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाइटवरूनच स्वीकारले जातील.
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
ऑनलाइन अर्ज भरताना खालील कागदपत्रांची स्पष्ट, वाचता येईल अशी रंगीत स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
१. पासपोर्ट साईज फोटो : साध्या बॅकग्राउंडवरील, गेल्या ६ महिन्यांच्या कालावधीत काढलेला फोटो.
२. ओळखपत्र : भारतीय नागरिकत्वाचा दाखला / अधिकृत ओळखपत्र.
३. बँक खात्याचा तपशील : बँक पासबुकची प्रत किंवा गेल्या एका महिन्याचे बँक स्टेटमेंट.
४. १० वीची मूळ गुणपत्रिका (Original Marksheet).
५. १२ वीची मूळ गुणपत्रिका (Original Marksheet).
६. कॉलेज प्रवेशाचा पुरावा : कॉलेजचे बोनाफाइड प्रमाणपत्र किंवा ट्यूशन फी भरल्याची पावती.
सर्व अपलोड करायची कागदपत्रे PDF, JPG किंवा PNG फॉरमॅटमध्येच असावीत. एका फाईलची साईज ३० KB ते ५०० KB दरम्यान असावी.