कोकणातील गणेशोत्सवाच्या आठवणी सांगणारी खदीजा नाईक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
खदीजा नाईक
खदीजा नाईक

 

भक्ती चाळक

लालपरीतून वळणदार वाटेचा प्रवास अन् कौलारू घरांच्या पडवीत पसरलेला ओल्या मातीचा सुवास. हे सर्व अनुभवण्यासाठी कोकणी माणूस वर्षभर वाट पाहत असतो. गणेशोत्सव आला रे आला की लगेच चाकरमान्या कोकणकरांची पाऊले गावाच्या दिशेने वळतात. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेपेक्षा मनाला शांत करणारे नैसर्गिक वातावरण त्यांना हवेहवेसे वाटते. 

ना मोठमोठे देखावे ना कोणती मंडळे. तरीही कोकणातल्या गणेशोत्सवाचा थाट काही वेगळाच असतो. कोकणातील हा उत्सव तिथल्या प्रत्येक वस्तीचा, गल्लीचा आणि तिथल्या माणसांचा आहे. कोकणच्या याच गणेशोत्सवाचा अनुभव सांगतेय डिजिटल विश्वात आपल्या कोकणी अंदाजाने लोकप्रिय झालेली कंटेंट क्रिएटर खदीजा नाईक. ‘आवाझ-द-व्हॉईस’ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

कोकणाशी खास नाते
खदीजा आदिल नाईक ही मूळची रायगड जिल्ह्यातील निजामपूरची. तिचे लग्न रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे झाले आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य कोकणातील संस्कृती, बोलीभाषा आणि राहणीमान तिला अगदी जवळून अनुभवायला मिळाले.

सध्या ती कुटुंबासह पुण्यात राहते. दोन लहान मुलींचा सांभाळ, घरची जबाबदारी सांभाळत ती आयटी क्षेत्रात टेक्निकल कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आयटीसारख्या तणावपूर्ण कार्य क्षेत्रात काम करत असतानाच तिने आपल्या अंगभूत कलेला आणि कोकणी प्रेमाला वाट मोकळी करून दिली.

अशा सुरू झाल्या कोकणी रील्स
पुण्यात राहूनही कोकणातील गप्पा, बोलीभाषा आणि आठवणी खदीजाच्या मनात ताज्या होत्या. याच आठवणींमधून रील्स बनवण्याचा विचार पुढे आला. तिने कोणतीही मोठी पूर्वतयारी न करता दैनंदिन आयुष्यातील साधे-सोपे प्रसंग कॅमेऱ्यासमोर मांडायला सुरुवात केली.

आपल्या रील्सच्या प्रवासाबद्दल बोलताना खदीजा सांगते, “आमच्या दैनंदिन आयुष्यातले काही प्रसंग, गावाकडच्या लोकांच्या सवयी, त्यांची बोलण्याची पद्धत आणि घरोघरच्या छोट्या गोष्टी मला नेहमीच भावणाऱ्या होत्या. एक दिवस सहज वाटले की हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून मांडून बघुयात.”

तिने शेअर केलेल्या व्हिडिओजना अनपेक्षितपणे मोठा प्रतिसाद मिळाला. ती म्हणते, “सुरुवातीला लोक कमेंट्स करायचे की, हे तर अगदी आमच्याच घरात घडतं. किंवा आमची आई पण हुबेहूब अशीच बोलते. तेव्हा मला उमगलं की मी फक्त माझ्या आठवणी सांगत नाहीये, तर हजारो लोकांच्या मनातील आठवणींना व्यक्त व्हायला एक व्यासपीठ मिळवून देतेय.”

 
कोकणातील गणेशोत्सव 
कोकणातील गणेशोत्सवाची भव्यता ही तेथील प्रथापरंपरांमध्ये दडलेली आहे. कोकणातल्या या वातावरणाविषयी सांगताना खदीजा म्हणते, “आमच्या घरी गणपती बसत नसला तरी लहानपणापासून गावातला गणेशोत्सव खूप जवळून पाहिलाय. त्या दिवसांत संपूर्ण गावात होणारी रोषणाई, घराघरांतील सजावट, लोकांची पळापळ आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असायचा. शेजारी आवर्जून आमच्याकडे गरमगरम मोदक पाठवायचे.”

ती पुढे म्हणते, “गावातील लोकांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद थेट आपल्या घरापर्यंत पोहोचायचा. परगावी गेलेले लोक या दिवसांत आवर्जून एकत्र येतात, जुने मित्र-नातेवाईक भेटतात आणि संपूर्ण गाव काही दिवसांसाठी वेगळ्याच उत्साहात न्हाऊन निघते.”

बालपणीचे दिवस आणि बदलता काळ
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचे मनोरंजन मोबाईल, कॉम्प्युटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मपुरते मर्यादित झाले आहे. मात्र खदीजाचे कोकणातील बालपण यापेक्षा अगदी वेगळे आणि समृद्ध होते. लग्नकार्य असो वा कोणताही सण, एकमेकांना मदत करण्याची परंपरा तिथे आजही जपली जाते. 

आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना ती सांगते, “आमच्या वेळी गाव, अंगण, शेजारी, मित्र हेच आमचे मुख्य मनोरंजन असायचे. उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी पापड, फेण्या बनवण्याची घाई असायची. एका घरात काम असले तरी गल्लीतल्या सगळ्या महिला एकत्र जमायच्या. गप्पा, चहा आणि हसण्या-खिदळण्यात कामे कधी संपायची ते कळायचेच नाही.”

कोकणी आणि मराठीवर प्रभुत्व 
कोकणातल्या भाषेत जरा वेगळाच बाज आणि लय आहे. रायगडची भाषा आणि चिपळूणकडची रत्नागिरी कोकणी यात सूक्ष्म फरक आहे. खदीजाने हा फरक खूप जवळून अनुभवला आहे.

भाषेच्या या विविधतेबद्दल सांगताना खदीजा म्हणते, “माझ्यासाठी मराठी ही रोजच्या जगण्याची भाषा आहे, तर कोकणी ही माझ्या घराची भाषा आहे. एकाच कोकणात अवघ्या काही किलोमीटरवर शब्द, उच्चार आणि ॲक्सेंट बदलतो, हीच खरी या मातीची गंमत आहे.”

रील्स बनवताना ती मुद्दाम पुस्तकी भाषा वापरत नाही. लोक घरी जसे बोलतात, त्याच नैसर्गिक आणि बोलीभाषेत ती संवाद साधते. खदीजा बोलताना तिच्या टोनमध्ये आणि चेहऱ्यावरील हावभावांत तिचा खरा कोकणीपणा दिसून येतो. आपल्या कंटेंटच्या माध्यमातून नव्या पिढीला जुने कोकणी शब्द आणि प्रथा पुन्हा ऐकायला मिळतात, याचे तिला समाधान वाटते.

कोकण म्हणजे फक्त निसर्ग, समुद्र, आंबा किंवा मासे एवढेच मर्यादित नाही. तिथली साधी माणसे, त्यांचा निखळ विनोद, जगण्याची पद्धत आणि एकमेकांबद्दल असलेली ओढ हा खरा कोकण आहे. खदीजा नाईकसारख्या क्रिएटरमुळे कोकणातील ही संस्कृती आणि गणेशोत्सवासारख्या सणांमधील सामाजिक सलोखा आजच्या डिजिटल जगात अधिक ठळकपणे समोर येत आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter