Defence Aerospace Self Reliance: सार्वजनिक अन् खाजगी क्षेत्र स्पर्धक नाहीत; राजनाथ सिंह यांनी दिला समन्वयाचा मंत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

 

बंगळुरू

संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक प्रकल्पांना होणारा विलंब ही अत्यंत गंभीर बाब असून, यामुळे महत्त्वाच्या संरक्षण गरजांमध्ये तफावत निर्माण होते आणि प्रकल्पांचा खर्च अवाजवी वाढतो, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. शुक्रवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे भारतीय हवाई दलाला 'तेजस' (LCA Tejas) ट्विन-सीटर ट्रेनर, 'HTT-40' बेसिक ट्रेनर विमाने आणि पवन हंस लिमिटेडला 'ध्रुव नेक्स्ट जनरेशन' हेलिकॉप्टर सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी बोलताना त्यांनी नागरी आणि लष्करी अशा दोन्ही हवाई क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या एका एकात्मिक परिसंस्थेची (Integrated Ecosystem) गरज प्रतिपादन केली.

तंत्रज्ञानातील विलंब ठरतोय आव्हानात्मक

संरक्षण तंत्रज्ञानातील विलंबावर बोट ठेवताना राजनाथ सिंह म्हणाले, "प्रकल्पांना होणाऱ्या विलंबाकडे आपल्याला गांभीर्याने पाहावे लागेल. अनेकदा आपण एखादे तंत्रज्ञान विकसित करून त्याचे उत्पादन सुरू करेपर्यंत जगात त्याहून अधिक प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध झालेले असते. यामुळे जुने तंत्रज्ञान कालबाह्य ठरते. म्हणूनच प्रकल्पांच्या कालमर्यादा अधिक वास्तववादी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे."

युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत असल्याने भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील समन्वयाचा मंत्र

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांनी एकमेकांचे स्पर्धक म्हणून न पाहता एकमेकांना पूरक संस्था म्हणून कार्य केले पाहिजे, असा सल्ला संरक्षण मंत्र्यांनी दिला. पुढील पिढीच्या स्वदेशी एरोस्पेस क्षमता उभारण्यासाठी दोन्ही क्षेत्रांमध्ये परस्पर समन्वय आवश्यक आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), स्वायत्त आणि मानवरहित प्रणाली, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर तंत्रज्ञान आणि प्रगत प्रॉपल्शन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांना केले. 'तेजस' आणि 'एचटीटी-४०' विमानांची सुपूर्दगी हा देशाच्या एरोस्पेस क्षेत्रातील स्वयंपूर्णतेचा आणि 'आत्मनिर्भर भारताचा' एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.